८ नोव्हेंबर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजारच्या नोटा बुधवार मध्यरात्रीपासून चलनातून रद्द, अशी घोषणा केली. या घोषणेबरोबरच केवळ पेट्रोलपंप, रेल्वे, बसस्थानके, विविध धर्मीयांची अंत्यविधी स्थळे आणि सरकारी रुग्णालये या ठिकाणी जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा स्वीकारल्या जातील, असे स्पष्ट केले. या निर्णयानंतर ठिकठिकाणच्या पेट्रोल पंपांकडे नागरिकांनी धाव घेतली. दुसऱ्या दिवशी बँका आणि एटीएम बंद असल्याची घोषणा झाली आणि रात्री एटीएममध्येही प्रचंड गर्दी झाली. पाचशे आणि दोन हजारच्या नव्या नोटा पुढील दोन दिवसांत चलनात येतील, अशी महत्त्वपूर्ण माहिती पंतप्रधानांच्या भाषणात होती.

९ नोव्हेंबर

काळ्या पैशाला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र सरकारने पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा वापरावर बंदी आणताच मुंबई-ठाण्यासारख्या बडय़ा शहरांमध्ये सोने खरेदीत तेजी आल्याचे चित्र दिसले. नोटा बंदीचा फटका पर्यटकांनाही बसल्याचं दिसून आलं. दिवाळीच्या सुट्टय़ांमध्ये देशाच्या विविध ठिकाणी फिरत असलेल्या लाखो पर्यटकांना रोख रकमेचा प्रश्न भेडसावू लागला. पाचशे आणि एक हजारच्या नोटा बँकेत भरताना रक्कम जर अडीच लाखांच्या वर असेल तर त्या व्यक्तीला कर भरण्याची तयारी ठेवावी लागेल आणि त्या रकमेबद्दल समाधानकारक माहिती मिळाली नाही आणि घोषित उत्पन्नाशी त्याचा मेळ बसला नाही तर रकमेच्या २०० टक्के दंड आकारला जाईल, अशी घोषणा केंद्र सरकारने केली.

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यामुळे टोल नाक्यावर प्रचंड रांगा लागल्या. टोल देणाऱ्या आणि घेणाऱ्यांकडे सुट्टे पैसे नसल्याने तणाव निर्माण होऊ लागला. त्यामुळे राज्य सरकारने दोन दिवस टोल नाके बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. राज्यातील सर्व राष्ट्रीय व राज्य महामार्गावर टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे देशभरात सर्व टोल नाके बंद दिसत होते. या बदलामुळे वाहतुकीची कोंडीही टाळता आली.

१० नोव्हेंबर

चलनातील पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून वीज, पाणी बिल, मालमत्ता कर आणि अन्य शासकीय देयके भरण्यासाठी महापालिकांनी तसंच शासकीय आस्थापनांनी ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत या नोटा स्वीकाराव्यात, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्दबातल ठरवल्यानंतर ११ नोव्हेंबपर्यंत सर्व अत्यावश्यक सेवांना या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले होते. सरकारचा हा आदेश ११ नोव्हेंबर रात्रीपर्यंत होता. असं असूनही जुन्या नोटा घेऊन पेट्रोल पंपावर येणाऱ्या लोकांसोबतचा वाद टाळण्यासाठी ११ नोव्हेंबर मध्यरात्री १२ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी म्हणजे १२ नोव्हेंबर सकाळी सात वाजेपर्यंत पेट्रोलपंप बंद करण्याचा पेट्रोल पंप असोसिएशनने निर्णय घेतला.

११ नोव्हेंबर

केंद्र सरकारने शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत दिलेली टोलमाफीची मुदत सोमवार मध्यरात्रीपर्यंत वाढवल्यावर राज्य शासनानेही १४ नोव्हेंबपर्यंत टोलमाफी जाहीर केली. जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा बदलण्यासाठी नागरिक बँकांमध्ये रोज गर्दी करीत होते. त्यामुळे बँकांमध्येच नोटांची चणचण भासू लागली. एटीएमची संख्याही कमी असल्यामुळे अनेकांनी बँकांमध्ये जाण्याचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे बँकांमध्येही पैशांची अडचण भासू लागली.

पाचशे आणि हजाराच्या नोटा असूनही सामान्यांना सुट्टय़ा पैशांसाठी वणवण करावी लागत असतानाच या नोटांच्या बदल्यात १०० च्या नोटा द्यायच्या, मात्र त्या देताना २० ते ३० टक्के कमिशन उकळायचे, असा काळा बाजार मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे सुरू झाला.

१२ नोव्हेंबर

देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा वापरातून रद्द करण्याच्या निर्णयानंतर ३० डिसेंबरनंतर अशाच एका निर्णयाची अंमलबजावणी केली जाऊ शकते, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. ‘काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आणखी अशीच काही योजना अचानक जाहीर केली जाणार नाही, असे नाही. ३० डिसेंबरनंतर पुन्हा अशीच एखादी कारवाई होऊ शकते,’ असं त्यांनी सांगितलं. जपानला गेलेले असताना  त्यांनी तिथून भारतीयांशी संवाद साधला. वर्षांखेरीस पुन्हा एकदा लक्ष्यभेद करण्याचा इशारा पंतप्रधानांनी दिला.

काळा पैसा आणि बनावट नोटांवर मात करण्यासाठी पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या या योजनेमुळे मुंबई महानगरपालिकेत दोन दिवसांत २८ कोटी रुपयांहून अधिक महसूल जमा झाला. बेस्टने वीज बिल भरणा केंद्रावर पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचे धोरण ठेवल्यामुळे बेस्टचाच फायदा झाला आहे. एका दिवसात बेस्टच्या वीज बिल भरणा केंद्रावर तब्बल १८.९८ कोटी रुपये जमा झाले. साधारणपणे वीज बिल भरणा केंद्रावर दर दिवशी अडीच ते तीन कोटी रुपयेच जमा होतात.

१३ नोव्हेंबर

नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरून अनेकांनी पंतप्रधान मोदींवर सर्व स्तरांतून टीका केली. पण, ‘आणखी ५० दिवस सहन करा. या बदलाचे परिणाम नक्कीच जाणवतील,’ असं म्हणत बेनामी मालमत्ता हे त्यांचं पुढचं लक्ष्यही त्यांनी स्पष्ट केलं.

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा वापरातून हद्दपार केल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होतेय, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने पैसे काढण्याची मर्यादा वाढवली. एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा दर दिवसाला दोन हजारावरून अडीच हजारावर नेली. तर प्रत्यक्ष पैसे काढण्याची मर्यादा २० हजारावरून २४ हजारावर नेली. जुन्या नोटा बदलून घेण्याची आधीची दिवसाची मर्यादा चार हजार होती; नंतर ती साडेचार हजार इतकी वाढवण्यात आली.

१४ नोव्हेंबर

उत्तर प्रदेशातील गाझिपूर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधतानाच विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर केंद्राने केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला. नोटाबंदीच्या निर्णयाचे जोरदार समर्थनही केले. ‘काँग्रेसने १९ महिन्यांसाठी आणीबाणी लागू करून हजारो लोकांना तुरुंगात पाठवले होते. आणीबाणीच्या काळात काँग्रेसच्या नेत्यांनी वृत्तपत्रांवर बंदी घातली होती. काँग्रेसने हे सर्व गरिबांच्या भल्यासाठी केले होते का, असे प्रश्न उपस्थित करुन, संपूर्ण देशाला तुरुंग बनवणारी काँग्रेस आता मला प्रश्न विचारत आहे,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

राष्ट्रीय महामार्गावरील टोलमाफीची मुदत आणखी वाढविण्यात आली आहे. ही मुदत १४ नोव्हेंबरला संपणार  होती. मात्र, आता १८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत विनाटोल प्रवास करता येणार आहे.

सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर दुसऱ्याच दिवसापासून ग्राहकांची संख्या कमी झालेली जाणवली. त्या निर्णयाचा दैनंदिन व्यवसायावर निश्चितच परिणाम झाला. ग्राहक आले तरी त्यांच्याकडे सुट्टे पैसे नसतात. अशा वेळी नेहमीच्या ग्राहकांची नावे आणि त्यांचा हिशेब लिहून त्यांना ‘पैसे नंतर द्या’ असं सांगितलं. सुरुवातीला ग्राहक पाचशे आणि हजारची नोट घेऊन वस्तू विकत घ्यायला यायचे. आता दोन हजाराची नोट घेऊ येतात. अशांना सुट्टे पैसे देण्यासाठी माझ्याकडेही सुट्टे पैसे नाहीत. सुट्टे पैसे घेण्यासाठी मला बँकेत मोठमोठाल्या रांगेत उभं राहणं आता तरी शक्य नाही. त्यामुळे अशा अनेक अडचणी येत आहेत. हा त्रास होत असला तरी तो काही दिवसांपुरताच आहे हेही मी जाणतो. चांगल्या गोष्टी घडायला थोडा वेळ लागणारच.
सुरेंद्र कदम, दुकानदार

सुट्टे पैसे नसल्यामुळे गेल्या आठवडय़ात खूप अडचणींना सामोरं जावं लागलं. कोणी पाचशे, कोणी शंभर तर कोणी हजाराची नोट देत होते. सुटय़ा पैशांची सगळ्यांकडेच चणचण आहे. त्यामुळे कोणी अशा मोठय़ा नोटा दिल्या तर आम्हीसुद्धा काही बोलू शकत नाही. मग अशा वेळी पैसे नंतर द्या असं मी त्यांना सांगतो. नंतर पैसे देण्यासाठी काहींनी माझा मोबाइल नंबरही घेतला आहे. या आठवडय़ात गिऱ्हाईकांची गर्दी कमी झाली आहे, हे मात्र निश्चितपणे सांगता येईल. खूप जण सुट्टे पैसे नाहीत म्हणून रिक्षेत बसत नाही. यामुळे दैनंदिन व्यवसायावर प्रचंड परिणाम झाला आहे. असं सगळं असलं तरी मी मोदी सरकार यांच्या निर्णयाला पाठिंबा देतो. हा होणारा त्रास काही काळासाठीच आहे. या निर्णयाचा कालांतराने होणारा फायदा लक्षात घेता आता थोडा संयम दाखवण्यास मी तयार आहे.
गिरीश कुलकर्णी, रिक्षाचालक

सुट्टे पैसे नसल्यामुळे ग्राहक आणि भाजीविक्रेते अशी दोघांचीही कोंडी होतेय. ग्राहकांनी मोठी नोट दिली तर त्यांना सुट्टे पैसे देताना अडचण होतेय. म्हणून ग्राहकही कमी पैशांची भाजी घेतात. त्यामुळे आमच्या दैनंदिन व्यवसायावर परिणाम झाला. दिवसाला दोन हजार रुपयांची भाजीविक्री होत असेल तर ती आता ७००-८०० रुपयांवर आली आहे. ज्यांचं दुकान भाडय़ाच्या जागेवर आहे त्यांना भाडं भरणंही कठीण झालं आहे. आम्ही भाजीविक्रेते ज्यांच्याकडून भाजी विकत घेतो ते ५००-हजारची नोट घेत नाहीत, त्यामुळे आम्हीही आमच्या ग्राहकांकडून त्या नोटा घेऊ शकत नाहीत. पण हा सगळा त्रास आणखी एक महिनाभर असेल. त्यानंतर सगळं सुरळीत सुरू होईल असं वाटतं.
मंदार अंबोले, भाजीविक्रेता

५०० आणि हजारच्या नोटा दोन दिवसात बदलायच्या होत्या. रोजच्या कामात आता हे आणखी एक काम वाढलं होतं. खरं तर रोजच्या व्यवहारात ५००-हजारच्या नोटाच चालू शकतात. ५०० ची जुनी नोट कोणीच घ्यायला तयार नव्हतं. भाजी, वाणी, सगळीकडे फार पंचाईत झाली होती. मोदी सरकारचा निर्णय कितीही चांगला असला तरी गरीब लोकांना त्याचा किती त्रास होतोय, याचा विचारच केला गेला नाही. काळा पैसा बाळगणारे त्यातून मार्ग काढतात. त्यांना त्याची फारशी झळही पोहोचत नाही. आमच्यासारखी गरीब माणसं मात्र भरडली जातात. निर्णय घेण्यापूर्वी १०० रुपयांच्या नोटा जास्त छापण्याची गरज होती.
छाया शिंदे, घरकाम करणारी महिला

इस्त्री करण्याचे फारसे पैसे लागत नाही. त्यामुळे माझ्याकडे येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली नाही. पण काही जणांकडे सुट्टे पैसे नसल्यामुळे त्यांना नंतर पैसे देण्याची मी सूट दिली. त्यामुळे ग्राहकांची संख्या कमी झाली नसली तरी सुटय़ा पैशांच्या अडचणींमुळे दैनंदिन व्यवसायावर अगदी थोडा परिणाम होतो. या निर्णयाच्या घोषणेनंतर अनेक जणांनी ‘५००-हजार’चे सुट्टे पैसे आहेत का, असं विचारलं होतं. पण त्यानंतर विशेष त्रास झाला नाही.
कमलेश कनोजिया, इस्त्रीवाला

५०० आणि हजारच्या नोटा बंद केल्यामुळे व्यवसायावर परिणाम होतोय. अनेकांची बिलं थकली आहेत. सुट्टे पैसे नसल्यामुळे ते बिल भरू शकत नाहीत आणि आम्हीही त्यांना काही बोलू शकत नाही. ज्यांच्याकडे दोन हजारची नवीन नोट आहे त्यांच्या बिलांची रक्कम हजार-पंधराशे इतकी आहे. त्यामुळे पुन्हा त्यांना उर्वरित रक्कम द्यायला माझ्याकडे तितकेसे सुट्टे पैसे नाहीत. दूधविक्री होतेय, पण त्याचे पैसे लगेच मिळत नाहीयेत. सुटय़ा पैशांच्या अडचणीमुळे पैसे नंतर देण्याची सूट ग्राहकांना दिली आहे. बँकेतून सुट्टे पैसे काढण्यासाठी रोज लांब रांगेत उभं राहणं परवडणारं नाही. एका दिवसात मिळणारी दोन हजारइतकी मर्यादित रक्कम किती दिवस पुरणार. त्यामुळे बँकेत रोज जावंच लागणार. पण हे शक्य नाही.
विजय जगताप, दूधविक्रेता
(संकलन : चैताली जोशी)
response.lokprabha@expressindia.com