lp04इतर सर्व देवतांच्या तुलनेत गणपती ही देवता मानवाच्या सर्वात जवळ, थेट त्याच्या घरीच येणारी, त्याच्याबरोबर राहून उत्सव साजरे करणारी आहे. अशा या भोगप्रधान देवतेची योगप्रवण भूमिका उलगडण्याचा प्रयत्न-

ॐ नमोजी आद्या। वेदप्रतिपाद्या।।
जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।
देवा तूचि गणेशु। सकल मतिप्रकाशु।
म्हणे निवृत्तिदासु। अवघारिजो जी।।

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
loksatta Health Special article, nutrition, food, pregnancy period
Health Special: गरोदरपणात किती खावं? काय खावं?
Why is neem and jaggery consumed during Gudi Padwa 2024
गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचे सेवन का करतात? काय आहे कारण, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….

ज्ञानदेवांचे हे अमृतोपम शब्द आपल्या अत्यंत परिचयाचे आहेत. हे शब्द जितके मधुर वाटतात तितकेच आशयगर्भ आहेत. किंबहुना, या मंगलाचरणाच्या प्रारंभीच्या ओव्यांमध्ये ‘स्वसंवेद्या’ या एका शब्दात माऊली त्यांच्या परंपरेचा वारसा सांगून जातात.
ज्ञानेश्वर महाराज नाथ संप्रदायातील थोर सिद्धपुरुष होते. नाथ संप्रदाय हा मूलत: योग मार्गावर आधारित असून त्याचे तत्त्वज्ञान काश्मिरी शैव मताचे आहे. या मतानुसार निर्विकार आत्मतत्त्वाला जेव्हा स्वत:च्याच अस्तित्वाची जाणीव होते, तेव्हा ते स्वसंवेद्य बनते. स्वत:च्या अस्तित्वाचे आस्वादन म्हणजे आत्मानंद इथे प्रकट होतो. कोणत्याही आश्रयाशिवाय जो ‘अहं’ असतो याला प्रकाशरूपी शिव म्हणतात, तर हे अस्तित्व जाणण्याच्या क्रियेला विमर्शरूपी शक्ती म्हणतात. या शिव आणि शक्तीच्या निर्माण होणाऱ्या स्वसंवेद्य आत्मानंदाचा अंकुर म्हणजेच गणेश. हा गणेश पारमार्थिक बुद्धीला प्रकाशित करणारा आहे. म्हणूनच त्याला वंदन करून ज्ञानदेव ज्ञानेश्वरीचा आरंभ करतात. ज्ञानेश्वरीच्या या मंगलाचरणातून योगमार्गाशी प्रकट झालेला गणेशाचा संबंध किती दृढ आहे हे आपण पाहणार आहोत.
वेदातील गणपती-अथर्वशीर्षांत योगमार्गाशी गणपतीच्या संबंधाबद्दल काही संकेत मिळतात. वेदप्रतिपाद्य ब्रह्म आणि गजानन यांचे अभिन्नत्व हा याचा प्रारंभीचा विषय आहे. नंतर,
‘त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं।
त्वं शक्तित्रयात्मक:।
त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं।’ असे म्हटले आहे. हा दुवा महत्त्वाचा आहे.
त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं :
कुंडलिनी योगानुसार मानवी शरीरात सहा शक्तिकेंद्रे आहेत. प्रकृतीतील पंचमहाभूतांना इथे विशिष्ट स्थान बहाल केलेले आहे. पृथ्वी तत्त्वाचे स्थान मेरुदंडाच्या तळाशी असलेल्या मूलाधार चक्रात आहे. हे प्राणशक्तीचे ठाणे आहे. इथल्या शक्तीच्या तीव्रतेवर मानवाच्या जीवनातील उत्साह आणि जिजीविषा अवलंबून असते. अशा या मूलाधारात गणेशाचे वास्तव्य आहे असे ऋषी म्हणत आहेत.
त्वं शक्तित्रयात्मक:
आगमशास्त्रात इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती या तीन शक्तींच्या साहाय्याने परमेश्वर सृष्टीसंचालन करतो. सृष्टी, स्थिती आणि लय या तीन शक्ती क्रियाशक्तीचा भाग असून तिरोभाव आणि अनुग्रह अशा आणखी दोन शक्ती क्रियाशक्तीत आहेत. जीवांना पुनर्जन्माच्या रहाटगाडग्यात तिरोभावशक्ती अडकवते. अनुग्रहशक्ती ही जीवामध्ये स्वस्वरूपाची जिज्ञासा जागवते आणि त्याला मोक्ष मिळविण्यास उद्युक्त करते. गणेश या सर्व शक्तींच्या रूपाने अभिव्यक्त होत असतो असे अथर्वशीर्ष सांगते.
त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं :
मोक्षाची प्राप्ती करून घेण्यास उत्सुक असणाऱ्या योगीजनांचे ध्येय अर्थात ध्यानाचा विषय म्हणजे ब्रह्म म्हणजेच गजानन आहे. मुद्गल पुराणाच्या नवम खंडात या विषयी विस्ताराने वर्णन आहे. अष्टांगयोग, कुंडलिनीयोग आणि भक्तियोग यांपैकी कोणत्याही मार्गाने चित्त निरोधित करून ब्रह्मसाक्षात्कार करून घेण्याची सूत्रे यात उलगडली आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असा अष्टांग योगाचा क्रम आहे. मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत करून, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा या चक्रांचा भेद करून मस्तकातील सहस्रर चक्रात ही शक्ती शिवाशी एकरूप होणे, याला कुंडलिनी योग म्हणतात. या दोन्ही योगांत ईश्वराबद्दल भक्ती असेल तर पतन होत नाही. अन्यथा अहंकाराने साधकाची अधोगती होऊ शकते. तो मोहात अडकू शकतो. त्यामुळे, गजाननाचे प्रेमादरयुक्त अंत:करणाने नामस्मरण करावे असा उपदेश मुद्गल पुराणात आहे.
गणपती म्हणजेच प्राण : काश्मिरी शिवाद्वय वादाचा दहाव्या शतकातील पुरस्कर्ता अभिनवगुप्त आपल्या देहस्थदेवताचक्रस्तोत्रात असे म्हणतो की, ‘प्राणरूपी देह असणाऱ्या गणेशाला मी वंदन करतो.’ इथे प्राण म्हणजे शरीरस्थ वायू.
मेरुदंडाच्या मुळाशी असलेल्या मूलाधार चक्रातून दोन भुवयांच्या मध्ये असणाऱ्या आज्ञा चक्रापर्यंत तीन नाडय़ा शरीरात प्राणशक्ती वाहून नेतात. डावी इडा, उजवी पिंगला आणि मध्य नाडी सुषुम्ना. जेव्हा उजव्या आणि डाव्या नाकपुडीतला श्वास समान होतो तेव्हा सुषुम्ना कार्यरत होते. ही सुषुम्ना आध्यात्मिक उत्क्रांतीचा मार्ग आहे. प्राण जेव्हा सुषुम्नेत प्रवेश करतो तेव्हा ध्यान करण्याची इच्छा अथवा ध्यानात प्रगाढता वाढते. आनंदाचा अनुभव येतो. सुषुम्नेत प्राणाचे संचालन करणे ही कुंडलिनीशक्तीच्या जागृतीच्या अगोदरची अवस्था आहे असे योगसूत्र सांगतात. रामदासांनी मनाच्या श्लोकात मंगलाचारणात ‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा.. गमू पंथ आनंत त्या राघवाचा।।’ यात गणेशरूपी प्राण आणि निर्गुण आत्मारामाच्या साधनेचा सुषुम्ना मार्ग यांचे सांगड घातली असावी असे वाटते. मुद्गल पुराणातसुद्धा प्राणायामाचे असाधारण महत्त्व विषद करून धारणा, ध्यान आणि समाधी यांची सिद्धी प्राणायामाने होते असे म्हटले आहे.
गणेशाचा नादयोग : मुद्गल पुराणातील आठव्या खंडातील गणेशहृदय स्तोत्रात आणि नवव्या खंडातील योगगीतेत ‘गं’ या एकाक्षर गणेश मंत्राचे वर्णन आहे. याला गणेश बीज असे म्हणतात. जसे लहानशा बीजातून महाकाय वृक्ष निर्माण होतो तसे बीज मंत्रातील निहित शक्ती देवतेचा साक्षात्कार घडवते.
गणपती-अथर्वशीर्षांत या मंत्राचे वर्णन असे आहे –
‘गकार: पूर्वरूपं। अकारो मध्यमरूपं। अनुस्वराश्चन्त्यरूपम्। बिंदुरुत्तररूपं।
नादसंधानम्। संहितासंधि:।’
गणेशहृदयात त्याचे स्पष्टीकरण असे आहे – गकार हा ब्रह्मा, अकार विष्णु, अनुस्वार शिव, बिंदू हा सूर्य, यांच्या संधीतून निर्माण होणारा नाद म्हणजे शक्ती आणि ‘गं’ या वाचक मंत्रातून गणेश (ब्रह्म) हा वाच्य अर्थ निघतो.
याचा सूक्ष्म विचार विज्ञानभैरव या आगम ग्रंथात सापडतो.
पिण्डमंत्रस्य सर्वस्य स्थूलवर्णक्रमेण तु। अर्धेंदुबिंदुनादान्त:शून्योच्चाराद्भवेच्छिव:।।
(श्लोक ४२)
पिण्डमंत्र म्हणजे एकाक्षर मंत्र. ज्या एकाक्षर मंत्रात स्थूल शब्दापासून बिंदू, अर्धचंद्र, नादांत इत्यादी स्पंदने असतात आणि ज्यांचे पर्यवसान शून्य किंवा उन्मना अवस्थेत होऊन त्यांच्या उच्चाराने साधक शिव होतो.
या प्रक्रियेतील काही संज्ञा आपण समजून घेतल्या पाहिजेत.
बिंदू : ‘गं’ किंवा ॐ या मंत्रातील मकाराचे उच्चारण झाल्यावर नाकात जे स्पंदन निर्माण होते आणि जे भ्रूमध्यात सरकते त्याला बिंदू म्हणतात. इथे उच्चार नसतो केवळ त्याचे स्पंदन असते. हे कधी कधी प्रकाशमान बिंदूच्या रूपात भुवयांमध्ये दिसते. हे सर्व स्वर आणि व्यंजनांचे विश्रांतिस्थान असते.
अर्धचंद्र : बिंदूचे पुढील स्पंदन अर्धचंद्र असते, जे चंद्रकोरीप्रमाणे कपाळाच्या मध्ये दिसते अथवा जाणवते.
निरोधिनी : कपाळाच्या वरील बाजूस आडव्या रेषेप्रमाणे प्रतीत होणारी निरोधिनी शक्ती असते. जो योगी साधनेत सातत्य ठेवतो त्याला ती नादामध्ये प्रवेश करू देते आणि खाली येऊ देत नाही. पण अनधिकारी योग्याला ती आणखी अभ्यास करायला भाग पाडते.
नाद : ही अहंतेची जाणीव करून देणारी शक्ती आहे. हा आत्मासाक्षात्काराचा उंबरठा आहे.
नादांत : नाद जिथे संपतो त्याला नादांत म्हणतात. इथे जाणीव आणि अस्तित्व एक होते.
शक्ती : या अवस्थेत शरीरात आनंदाची अनुभूती होते. ही आनंदानुभूती सर्व शरीरभर जाणवते.
व्यापिनी : हा आनंद जेव्हा आकाशवत् व्यापून राहिल्यासारखा वाटतो तेव्हा त्या अवस्थेला व्यापिनी म्हणतात.
समना : इष्ट-अनिष्ट अशा सर्व संकल्पनांचा लय जिथे होतो आणि केवळ आत्मस्थितीची जाणीव उरते तेव्हा तिला समना स्थिती म्हणतात.
उन्मना : या आत्मभानाच्याही पलीकडे जेव्हा जाणीव पोहोचते तेव्हा योगी उन्मनावस्थेत पोहोचतो. तो शिवरूप होतो.
या श्लोकाच्या भाष्यात शिवोपाध्याय असे प्रतिपादित करतात की प्रणवाच्या उच्चाराने प्राणशक्ती नाभीपासून द्वादशांतापर्यंत (मस्तकाच्या वरील अवकाश) उत्क्रांत होत जाते.
अकाराचे ध्यान नाभीवर करून, उकार हृदयात, मकार मुखात किंवा टाळूमध्ये, बिंदू भ्रूमध्यात, भालप्रदेशात अर्धचंद्र, कपाळाच्या वरील भागांत निरोधिनी, मस्तकात नाद, ब्रह्मरंध्रात नादांत, त्वचेमध्ये शक्ती, शिखेच्या मुळाशी व्यापिनी, शिखेत समना, शिखेच्या टोकाशी उन्मना आणि त्या पलीकडील अवकाशात अनंत संवित् म्हणजे शिव असे ध्यान करावे. असे केल्याने योगी शिवरूप होतो.
जसा प्रणवात आकार उकार मकार आहे तसा गणेश मंत्रात गकार, अकार आणि मकार आहेच. त्यामुळे ॐ आणि ‘गं’ यांच्यात साधम्र्य आहे.
ज्ञानदेव आणि तुकाराम यांच्या साहित्यातून गणेशाचे प्रणव रूप प्रकट होते ते असे –
अकार चरण युगुल। उकार उदर विशाल।
मकार महामंडल। मस्तकाकारे।।
हे तिन्ही एकवटले। तेथ शब्दब्रह्म कवळले।
ते मिया श्रीगुरुकृपा नमिले। आदिबीज।।
असे ज्ञानोबा म्हणतात. तर तुकोबा म्हणतात-
ओंकार प्रधान रूप गणेशाचे।
हे तिन्ही देवांचे जन्मस्थान।।
अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णु।
मकार महेश जाणियेला।।
ऐसे तिन्ही देव जेथोनि उत्पन्न।
तो हा गजानन मायबाप।।
तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी।
पहावी पुराणीं व्यासाचिया।।
मोरेश्वर क्षेत्रवर्णन या ग्रंथात असे म्हटले आहे की ब्रह्मा, विष्णू, शिव, सूर्य आणि शक्ती जेव्हा स्वत:च्या उत्पत्ती स्रोताबद्दल अन्वेषण करू लागले तेव्हा त्यांच्या हृदयात हा एकाक्षर गणेश मंत्र प्रकट झाला. त्यांनी त्याचे अनुसंधान केले तेव्हा त्यांच्या हृदयात स्वसंवेद्य गजानन प्रकट झाला असे वर्णन आहे. एकाक्षर मंत्राच्या साधनेने ईश्वरी साक्षात्कार होतो असे याचे इंगित आहे.
प्राणगजाननाचे संगीत : हठप्रदीपिका या योगमार्गातील ग्रंथांत प्राणायामाद्वारे नादानुसंधान करण्यासंबंधी निर्देश आहेत. समुद्राची गाज, मेघांची गर्जना, नगाऱ्याची पडघम असे स्थूल शब्द योग्याला सुषुम्ना नाडीतून ऐकू येतात. पुढे पुढे हे नाद अधिकाधिक सूक्ष्म होत जातात. मृदंगाचा आवाज, शंखध्वनी, घंटा नाद, क्षुद्रघंटिकांची किणकिण, झांजांचा आवाज, वीणेचा आवाज, बासरीचा आवाज, आणि भ्रमराचा गुंजारव. या ध्वनींपैकी सूक्ष्म सूक्ष्मतर ध्वनींवर लक्ष केंद्रित केले असता योग्याला समाधिस्थिती प्राप्त होते असे म्हटले आहे.
वरील विवेचनात प्राणरूपी गणेशाचा उल्लेख आलेला आहेच. प्राणाच्या अवरोधाने हे ध्वनी ऐकू येत असतात. त्यामुळे गजाननाचा हातातील विविध वाद्ये शरीरस्थ नादाची द्योतक असावीत असे वाटते.
नमस्तस्मै गणेशाय यत्कंठ: पुष्करायते।
मदभोगघनध्वनो निलकंठस्य तांडवे।।
नाटय़ाशी निगडित धनंजयाच्या ‘दशरूपकम्’ या दहाव्या शतकातील ग्रंथांत हा श्लोक आहे. ‘शंकराच्या तांडवाच्या प्रसंगी ज्याचा आवाज मेघगर्जनेसारखा किंवा मृदंगासारखा उमटतो आहे त्या गणेशाला वंदन असो,’ असा या श्लोकाचा अर्थ आहे. यात मेघ आणि मृदंग हे नाद लक्षात घेण्यासारखे आहेत.
सदाशिवप्रोक्त गणेशाष्टकात रत्नांसह सुवर्ण घंटिका गणेशाच्या पायात आहेत, ज्यांचा निनाद गणेश नृत्य करताना होतो असे वर्णन येते.
काही शिल्पात गजानन बासरी वाजवताना तसेच वीणा वाजवताना साकारला आहे. त्याच्या गंडस्थळातून गळणाऱ्या मदाच्या गंधाने भ्रमर आकृष्ट होतात आणि त्यांना उडविण्यासाठी आपले कान तो फडकवीत आहे असेही वर्णन आहे. या सर्व वर्णनावरून आपले आराध्य श्रीगणेश हाच प्राणरूपाने आपल्या शरीरात दिव्य नाद निर्माण करीत आहे अशी धारणा करून योगी नादामध्ये तल्लीन होऊ शकतो.
नृत्ययोगी गणेश : अनेक शिल्पांत गणेशाच्या नृत्य मूर्तीचे दर्शन होते. उदाहरणार्थ सहाव्या शतकातील कर्नाटकातल्या बदामीच्या गुंफा क्र. १ मध्ये शिवाच्या नृत्याचे अनुसरण करण्याचा प्रयास करणारा बाल गणेश पाहावयास मिळतो. इतकेच नव्हे तर गणांबरोबर आणि सप्त मातृकांबरोबरसुद्धा नृत्यगणपती पाहायला मिळतात. आठव्या शतकापासून नृत्यगणेशाच्या केवल मूर्ती (एकटा गणेश) सुद्धा पाहायला मिळतात. केवळ कलांचा अधिपती म्हणून हा संबंध आला असेल, की नृत्याला काही वेगळा अर्थ आहे?
या प्रश्नाचे उत्तर गणपतीच्या उगमात असावे. देबीप्रसाद चट्टोपाध्याय यांच्या ‘लोकायत’ या ग्रंथांत त्यांनी गणपतीवर विस्तृत भाष्य केले आहे. त्यांचे मत मांडले आहे की गण म्हणजे भारतातील आदिम आणि प्राकृत लोक. शिवाचे एक नाव गणपतीदेखील आहे. म्हणजे शिव आणि गणपती दोघेही प्राकृत लोकांशी नाते राखून होते.
नृत्य हा प्राकृत जनजातींच्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा घटक आहे. या जनजातींचा निसर्गाशी थेट संबंध आहे. त्यामुळे पशू, पक्षी आणि कीटकांच्या हालचाली, त्यांचे ध्वनी वगैरेचे निरीक्षण त्यांच्याकडून घडते. प्राकृत जीवनातील बहुतेक सर्व महत्त्वाच्या घटनांच्या वेळी नृत्य केले जाते ज्यात या सर्व प्राणिचर्याचा अंतर्भाव होतो तसेच ग्राम्य आणि वन्य जीवनातील क्रियांचे कलात्मक रूपांतर दिसते.
वयात आलेले तरुण-तरुणीं एकमेकांचे जोडीदार निवडायच्या वेळी सामूहिक नृत्य करतात. तसेच लग्नाच्या वेळी, मुलांचे जन्म, देवतांचे उत्सव, सुगीनंतर, शिकारीच्या आधी आणि नंतर, युद्धाच्या आधी आणि नंतर, तसेच मर्तिकाचे संस्कार होत असताना किंवा झाल्यावरसुद्धा नृत्य करण्याची आदिम आणि प्राकृत लोकांत पद्धत आहे.
अशा जनजातींचे देवसुद्धा नर्तनप्रिय असावेत यात आश्चर्य नाही. डॉ. देवांगना देसाई यांनी त्यांच्या ‘आर्ट अॅण्ड आयकन’ या पुस्तकात नृत्य गणेशावर एक लेख लिहिला आहे. त्यात त्या लिंग पुराणातला दाखला देतात – ‘जेव्हा असुरांपासून देवांचे रक्षण करण्यासाठी शिव आणि पार्वतीने गणेश निर्माण केला तेव्हा तो मंगलालय त्याच्या मातापित्यांसमोर नृत्य करीत प्रकट झाला.’ असुरांपासून रक्षण करण्यासाठी गजाननाचे नृत्य हे युद्धापूर्वीचे वीर नृत्य असावे असे मला वाटते.
तसेच गणेश पुराणाच्या क्रीडा खंडाच्या १०५व्या अध्यायाचा संदर्भ देऊन त्या लिहितात की ‘विश्वदेव नावाचा राक्षस गणेशाच्या तेराव्या जन्मदिवशी त्याला भेटायला आला. परंतु भगवान विष्णूंचे दर्शन झाल्याखेरीज आपण अन्न ग्रहण करणार नाही अशी अट त्याने घातली. तेव्हा गणेशाने विष्णूचे रूप घेतले. त्या वेळी तेथे तयार केलेल्या गणेशाच्या पार्थिव मूर्तीसुद्धा सजीव होऊन नाचू लागल्या आणि त्या मूर्तीमध्येसुद्धा विश्वदेवाला विष्णूचे (कृष्णाचे) दर्शन झाले.’
दुसऱ्या गोष्टीतले विष्णुरूप नृत्य हे कृष्ण आणि गणेश यांची एकरूपता दाखवणारे आहे. तांडव करणाऱ्या नृत्यगोपालाप्रमाणे गणेशाच्याही मूर्ती घडवल्या गेल्या आहेत. वैष्णव सांप्रदायात नृत्याला विशेष महत्त्व आहे. श्रीकृष्णाची रासलीला तर सुप्रसिद्ध आहे. बंगालमधील प्रसिद्ध संत श्रीचैतन्य महाप्रभू दिव्य उन्मादाने नृत्य करीत असत. वारकरी संप्रदायाचे संत नामदेवसुद्धा म्हणतात, ‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।’ नृत्यगणेश आणि उपासनेचा संबंध अशा रीतीने प्रस्थापित होत आहे.
सौंदर्यलहरी स्तोत्राच्या ४१व्या श्लोकात पराशक्तीच्या मूलाधार चक्रात समया देवी लास्य नृत्य करीत आहे आणि नवात्मा म्हणजे शिव नवरसयुक्त तांडव करीत आहे असे वर्णन आहे. या उभयंतांच्या नृत्यामुळे सृष्टीचे सर्जन होते. मूलाधार चक्रातील हे तांडव आणि गणेशाचे मूलाधारातील वास्तव्याचा काही संबंध असावा. कारण काही विद्वान असे म्हणतात की गणेश हे शिवाचे रूप आहे. वेदातील काही गणेश गायत्री मंत्र, गणेश आणि शिवाचे ऐक्य दर्शवितात. त्यामुळे शिवाचे तांडवप्रिय रूप गणेशाच्या विग्रहात आपसूकच सामावले. नेपाळ आणि तिबेट येथल्या गाणपत्य मूर्तीमध्ये सौम्य आणि उग्र रूप घेतलेल्या नृत्यगणेशाची पूजा होते.
आजही भारतात आणि भारताबाहेर बऱ्याच ठिकाणी देवतेप्रमाणे शृंगार करून तिच्या संचाराने उन्मत्त नृत्य केले जाते. याचा अर्थ असा होतो की नृत्य, गायन, वादन, लय, ठेका इत्यादीमुळे शरीराची पातळी ओलांडून, मनाच्या पल्याड एका उन्मनीय अवस्थेत जाणे शक्य आहे. शिव, गणपती आणि कृष्ण या देवतासुद्धा प्राकृत लोकांशी संबंधित असल्यानेच नृत्याशी संबंधित असल्या पाहिजेत. पाशुपत संप्रदायात नृत्य हा उपासनेचा भाग होता. नृत्य करीत करीत मध्येच जमिनीवर बसून हुडुक्कार करायचे आणि मनोनाश साधायचा असे त्यांचे तंत्र होते.
शिव, गणेश या देवतांप्रमाणे सप्त मातृकासुद्धा नृत्य करताना दिसतात. याचे कारण मातृदेवता जनन, रक्षण, संहारात्मक कार्ये करतात. यांपैकी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रियांचा नृत्याशी संबंध आहे हे आपण पाहिले आहे.
निसर्गात प्रजनन काळात सहचर मिळवण्यासाठी मोर, मधमाश्या आणि काही अन्य जीव नृत्य करतात. स्त्री आणि निसर्ग यांचा अन्योन्य संबंध पुरातन आहे. पृथ्वीला अदिती म्हणजेच स्त्री रूपात कल्पिले आहे. तिच्यात रुजणारी विविध बीजे म्हणजे आकाशाने तिला दिलेले गर्भ आहेत. म्हणून प्रजनन हे सुबत्तेचे द्योतक आहे. सप्त मातृका हे लोकमातांचे परिष्कृत रूप असल्याने त्या नृत्यप्रिय आहेत आणि पृथ्वी तत्त्वाशी निगडित असणारा गणेश त्यांच्या सोबत नृत्य करतो. गुजरातेत आजसुद्धा गरबा हे नवरात्रीच्या देवी उपासनेचे अविभाज्य अंग आहे.
पुढील काळात ज्या वेळी प्राकृत लोकांना सामाजिक हीनत्व प्राप्त झाले तेव्हा त्यांची दैवते आणि उपासना पद्धती परिष्कृत करून त्यांचा पुरस्कार केला गेला. म्हणून शिवाच्या उत्स्फूर्त पदाविन्यासाचे नाटय़शास्त्र झाले. शिवाचा नटराज झाला आणि कृष्णाला नटवर म्हटले गेले. उपासनेमधील नृत्याचा अंतर्भाव मात्र कमी झाला. हे नृत्य उपासकांकडून न केले जाता ते देवदासी करू लागल्या. काही कुलाचारामध्ये मात्र नृत्योपासना टिकून राहिली.
सांप्रतच्या काळात मात्र डान्स मेडिटेशन, ट्रान्स डान्स, सूफी डान्स मेडिटेशन याद्वारे नृत्य आणि उन्मनी अवस्था यांचा प्रचार आणि प्रसार जगभर केला जात असल्याने गणेशभक्तांमध्ये नृत्यगणेशाच्या स्वरूपाचा नव्याने विचार होऊ लागेल असे वाटते.
भोगातून योगाकडे :
गणेशाच्या बहुतांश रूपांत शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पाच विषयांची तृप्ती करणारी आयुधे, उपकरणे असतात. ज्या तंत्रांमध्ये गणेशाला महती प्राप्त झाली त्यात त्याच्या उपासना मुख्यत: ऐहिक सुखप्राप्तीसाठी आहेत. काळाच्या ओघात गाणपत्य संप्रदाय शाक्त अथवा शैव संप्रदायात विलीन झाला. असे असले, तरी मोक्षदायी योगाची एक समांतर परंपरा गणेश उपासकांसाठी सदैव कार्यान्वित होती. महाराष्ट्रात स्मार्त गाणपत्य संप्रदायाचे पुनरुज्जीवन मोरया गोसावी यांनी केले. अद्याप मोरगाव येथे त्यांच्या गाणपत्य मठाची परंपरा जागृत आहे. गणपती या मुख्यत: भोगप्रधान देवतेची योगप्रवण भूमिका उलगडण्याचा अल्पसा प्रयत्न मी केला आहे .
चंद्रशेखर खांडाळेकर
response.lokprabha@expressindia.com