गणेश विशेष
प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com

झमगमती मखरे, लायटिंगचा लखलखाट, डीजेचा दणदणाट आणि महागडा नैवेद्य यापासून कोकणातला गणपती आजही अलिप्त आहे. माळावर, परसबागेत उगवणारी फळे, फुले, पत्री, घरगुती पक्वान्न आणि भजनाच्या सुरांवर तो समाधानी असतो, ५-१० दिवस अगदी घरचाच असल्यासारखा राहतो.

jotiba yatra kolhapur 2024 marathi news
जोतिबाचा डोंगर तीन लाख भाविकांनी फुलला; मंगळवारी मुख्य यात्रा
Shri Ram Navami, Celebration in Shegaon, Grandeur and Devotion, gajanan maharaj shegaon, ram navami 2024, ram navami celebration in shegaon, ram navami,
‘श्रीराम नवमी’निमित्त ६७० दिंड्या दाखल, शेगावनगरी भाविकांनी फुलली
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन
Mukh Darshan Arranged for Devotees on Gudhi Padwa at Pandharpur Temple due to Conservation Work
मराठी नववर्ष आणि गुढीपाडवा दिवशी विठ्ठलाचे मुख दर्शन दिवसभर : औसेकर महाराज

कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे गौरी-गणपती. त्यासाठी दिवाळीपेक्षाही जोरदार तयारी केली जाते. मुंबईकरांनी चार-पाच महिने आधीच रेल्वे-एसटीचे आरक्षण केलेले असते. चतुर्थीच्या १५ दिवस आधी घरोघरी साफसफाई, रंगरंगोटी सुरू होते. सुट्टय़ांचे नियोजन करून बाप्पाच्या स्वागताचे साहित्य घेऊन मुंबईकर एखादा दिवस आधीच गावी हजर होतात. कौलारू छताखाली बांधलेल्या रंगीत पताका उत्सवी माहोल तयार करतात. दारावर तोरणे बांधली जातात. देवघरातल्या भिंतींवर उठावदार रंगांनी चित्रे रंगवली जातात. अलीकडे काही जण तयार चित्रे चिकटवतात. काही घरांत गणपतीच्या मागे रंगीत पडदाही लावला जातो.

आगमनाच्या दिवशी सगळे वाडेकरी एकत्रच गणपती आणायला निघतात. भक्तांनी डोक्यावर ठेवलेल्या पाटावर बसून हिरव्यागार पाऊलवाटांवरून लाडके गणराय घरी येतात. मूर्ती मोठी असेल, तर झुल्यासारख्या कवाडीत ठेवून ती कवाड दोघांच्या खांद्यावर पेलून गणरायांना घरी आणले जाते. त्यांच्या स्वागतासाठी दारी पिठाच्या रांगोळ्या काढल्या जातात. मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते, त्या ठिकाणी मूर्तीच्या डोक्यावर माटवी बांधली जाते. गणपतीने आपल्यावर कोपू नये, त्याचे डोके शांत राहावे, यासाठी माटवीला शीत प्रवृत्तीची विविध पाने, फुले, फळे बांधली जातात. हरणं, तेरडा, शेरवडा, कांगला, काकडी, कवंडळे, नारळ यांचा त्यात समावेश असतो. यातले काहीही विकत आणावे लागत नाही. पावसाळ्यात या पत्री आणि ही फुले माळरानावर मुबलक प्रमाणात उगवतात. परसात ताजी काकडी लगडलेली असते. नारळही दारात असतोच. या सर्व पत्रींमुळे गणराय शांत आणि प्रसन्न राहतात, असा कोकणवासी भक्तांचा विश्वास असतो.

पहिल्या दिवशी पाच भाज्या आणि मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. दारातल्या केळीच्या पानावर वरण, भात, भाज्या, मोदक, कोशिंबिरीचा नैवेद्य वाढला जातो. कोणाच्याही घरातील आरती असो, वाडीत राहणारे सगळे हजर असतात. टाळ-टाळ्यांच्या गजरात आरती होते. वातावरण एवढे शांत असते की, कोणाच्या घरात आरती सुरू आहे हे आपल्या घरात बसून अचूक ओळखता येते.

प्रत्येकाच्या घरी एकदा तरी भजनी मंडळ आमंत्रित केले जाते. कधी गावातील तर कधी आजुबाजूच्या गावांतील भजनी मंडळांना सुपाऱ्या दिल्या जातात. टाळ-मृदंगाच्या ताला-सुरांत सर्वजण मग्न होतात. विसर्जनाच्या दिवशी ‘म्हामदं’ घातले जाते. ‘म्हामदं’ म्हणजे परिचितांना आपल्या घरी जेवायला बोलावणे. कोणी कोणाच्या घरी जेवायला जायचे हे आदल्याच दिवशी ठरवलेले असते. म्हामद्यालाही पाच भाज्या केल्या जातात. त्यात उसळ आणि वडे हमखास असतात. पडवळ, भेंडी, कोबी अशा भाज्या केल्या जातात. खिर किंवा तत्सम गोडाचा पदार्थ केला जातो.

विसर्जन सोहळा प्रेक्षणीय असतो. यातही क्रमाने एकेकाच्या घरी पूजा, आरती होते. घरादाराच्या भरभराटीसाठी, सुखशांती, लग्नकार्यासाठी, संततीसाठी गणरायाला साकडे घातले जाते. तो आपली इच्छा पूर्ण करेल, असा गाढ विश्वास त्यात असतो. वाडीतील सगळे गणपती एकाच वेळी घराबाहेर पडतात. लाडक्या गणरायांना डोक्यावरील पाटावर बसवून नदीकडे नेले जाते. नेताना गणपतीचा चेहरा मात्र घराच्या दिशेने असतो. त्याची कृपादृष्टी घरावर राहावी, अशी त्यामागची श्रद्धा. नदीकाठी सर्व मूर्ती रांगेत मांडल्या जातात. पुन्हा आरती होते. निरांजने लागतात, अगरबत्त्या दरवळतात, गूळ, खोबरे, फळे, काकडय़ांचा नैवेद्य वाटला जातो आणि एवढे दिवस ज्याच्यामुळे घर गजबजून गेलेले असते त्या गणरायाला निरोप दिला जातो.

कोकणातील गणेशोत्सवाला अद्याप प्लास्टर ऑफ पॅरिसचा तितकासा प्रादुर्भाव झालेला नाही. इथल्या मूर्ती शाडूच्याच असतात. झळाळी थोडी कमी असली, तरी रूप फार सुंदर असते. प्रदूषणापासून अद्याप दूर असलेल्या इथल्या नद्या, ओहोळ इतके नितळ असतात, की विसर्जित केल्यानंतरही पाण्याखालील मूर्ती स्पष्ट दिसतात. अवघ्या काही मिनिटांतच त्या विरघळू लागतात.

मुंबईत तासाभराच्या अंतरावर राहूनही महिनोन महिने भेट न झालेले सगळे नातेवाईक गणपतीत चार-पाचशे किलोमीटरवर असलेल्या गावात मात्र नक्की भेटतात. एरव्ही एकटय़ा-दुकटय़ा भासणाऱ्या शांत वाडय़ा त्या चार-पाच दिवसांत गजबजून गेलेल्या असतात. पडव्यांमध्ये गप्पांचे फड रंगतात. पाहुण्यांचा राबता असतो. चुलीवर सतत चहा उकळत असतो. ऐन गणपतीत दरड कोसळली, मुंबई-गोवावरील कोंडी, गावी येण्यासाठी किती महागडे तिकीट काढले, सुट्टी मिळवणे किती कठीण आहे, लग्नकार्य, मृत्यू, नोकरी, आंब्याच्या बागेवरचा खर्च, वाटण्या, भाऊबंदकी अशा कोणत्याही विषयावर चर्चा सुरू राहतात. पाच-सात दिवस रंगलेल्या या उत्सवाची सांगता मात्र चटका लावून जाते. वयोवृद्ध, एकटय़ा-दुकटय़ांना मागे सोडून शहराच्या धबडग्यात परतणे फारच क्लेशदायक असते. मागे राहिलेल्यांना घरातील शांतता भयाण भासू लागते. पुढच्या गणपतीत सगळे पुन्हा एकत्र येणार आणि असेच गप्पांचे फड रंगणार हे मात्र प्रत्येकालाच माहीत असते.

लाडाच्या गौरी

मुखवटय़ाच्या, साडी नेसवलेल्या गौरी कोकणात फारशा दिसत नाहीत. इथल्या गौरीही निसर्गाशी नाते सांगतात. इथे खडय़ाच्या गौरी पुजल्या जातात. नदी किंवा विहिरीजवळचे दगड घेऊन त्यांची गौरी म्हणून पूजा केली जाते. बांबूची रोवळी घेऊन त्यात थोडे तांदूळ पसरवले जातात. हरणे, तेरडा, आघाडा, एखादी पालेभाजी आणि हळद अशा सगळ्या वनस्पतींची रोपे घेऊन ती दोऱ्याने बांधून रोवळीत ठेवली जातात. ही रोवळी विहिरीवर किंवा नदीवर नेऊन त्यात तिथलेच खडे ठेवून त्यांची पूजा केली जाते. घरातील जी महिला गौरीची पूजा करून तिला घरी आणणार असते, तिच्याशी गौरी घरी येईपर्यंत कोणीही बोलत नाही. ती अतिशय शांतपणे पूजा करून गौरी घरी आणते. गौरी आगमन, पूजन आणि विसर्जन असे तीन भाग असतात. काही वेळा हे तिन्ही विधी तिथीनुसार तीन स्वतंत्र दिवशी असतात तर काही वेळा आगमन आणि पूजन एकाच दिवशी असते. पूजनाच्या दिवशी ओवसे भरले जातात. यात सुपांमध्ये सुकामेवा, फळे भरून पतीला आणि जवळपासच्या महिलांना ही सुपे दिली जातात. ओवसा दिल्यानंतर पती एखादी भेटवस्तू किंवा पैसे त्यावर ठेवतो. या दिवशी गौरीसाठी पाच भाज्यांचा नैवेद्य केला जातो. त्यात काही रानभाज्यांचाही समावेश असतो. गौरीच्या पूजेत वापरल्या जाणाऱ्या पत्री, नैवेद्यातील भाज्या सगळ्यातच वापरली जाणारी पाने औषधी गुणधर्माची असतात. अवाजवी सजावट आणि महागडय़ा नैवेद्यांपासून कोकणातील गौरी आजही दूर आहेत, हे विशेष.