कारागृहात कैद्यांचे मृत्यू होण्याची प्रकरणं नवीन नाहीत. पण मंजुळा शेटय़ेच्या मृत्यूमुळे या वास्तवाचे वेगवेगळे कंगोरे पुढे येत आहेत. त्यासाठी कारणीभूत ठरलेल्या या प्रकरणात नेमकं काय घडलं?

‘‘भायकल्लामे कुछ करो, ना करो, फोकटका मार तो खानेकाच. गाली अल्लगसे.. वो भी रोजका.. लेकीन उस दिन मंजू के साथ जो हुवा वो ना कभी देखा, ना सुना. दिमाग के बाहर था.. हम छत पे नय चढते तो शायद भायकल्लावाले मॅटर दबा देते.. आपको पता भी नय चलता, जेल मे खून हुवा है..’’

PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
shree ram mandir
१२वीच्या पुस्तकातून बाबरी पतनाचा उल्लेख गायब…

खटल्याच्या सुनावणीसाठी भायखळा कारागृहातून सत्र न्यायालयात आणण्यात आलेली हुमा (नाव बदललंय) त्वेषाने सांगत होती. अंमली पदार्थ तस्करीचे गुन्हे, दारिद्रय़ किंवा मजबुरीमुळे या धंद्यात आल्याचं शल्य, आधी अटक मग कारागृहातला बंदिवास यातून कुटुंबाची झालेली वाताहत हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. पण मंजुळा शेटय़ेचा विषय काढताच ती उसळली. खटला गेला खड्डय़ात, या आवेशात तिने आधी कारागृहाची जेलर मनीषा पोखरकर, गार्ड वसीमा शेखला शिव्या हासडायला सुरुवात केली. भानावर येताच तिने मंजुळासोबत घडलेल्या प्रसंगाचं वर्णन केलं. अधेमधे ती चुकचुकत होती. एका क्षणी तिच्या डोळ्यात टच्कन पाणीही आलं. हुमाच्या चुकचुकण्यात मंजुळाबद्दलचं प्रेम, आपुलकी जाणवली. मंजुळाच्या मृत्यूने हुमा हळहळत होती.

कोण, कुठली मंजुळा, जन्मठेपेची शिक्षा भोगणारी, दोन महिन्यांपूर्वी पुण्याच्या येरवडय़ातून भायखळ्यात आलेली एक सहकैदी. ना ओळख ना नातं. धर्मही वेगळा आणि केलेल्या गुन्ह्य़ाचं स्वरूपही. पण तरीही मंजुळाच्या मृत्यूने हुमा का हळहळते?

मंजुळाच्या मृत्यूनंतर भायखळ्याच्या कारागृहात सर्वच्या सर्व २९१ महिला कैदी एकजात का पेटून उठल्या? अंगावरल्या तान्ह्य़ा मुलांना पोटाशी कवटाळत जाळपोळ, तोडफोड आणि आडव्या येणाऱ्या पोलिसांशी दोन हात का केले गेले? मसाल्याचं पाणी, िभतीतल्या विटा काढून पोलिसांवर का भिरकावल्या गेल्या? गच्चीत पोहचून पोलिसांविरोधात का घोषणा ठोकल्या गेल्या? अधिकचं मनुष्यबळ आल्यानंतर, बळाचा वापर केल्यानंतरही महिलांनी अन्नत्याग करत आपला उठाव जिवंत का ठेवला? एका सहकैद्यासाठी? असं काय घडलं मंजुळासोबत की सर्वच्या सर्व महिलांनी भायखळा कारागृह दणाणून सोडलं? पुण्याच्या मुख्यालयातून अतिरिक्त पोलीस महासंचालक भूषण कुमार उपाध्याय, पोलीस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांना धावपळत भायखळा कारागृह का गाठावं लागलं?

13-lp-indrani

आई गोदावरी तसंच पाच थोरल्या भावंडांसह भांडुपच्या चाळीत राहाणारी मंजुळा साधी, सर्वसामान्य मराठी तरुणी. महापालिकेच्या शाळेत शिकलेली मंजुळा अभ्यासात तशी सुमारच. दहावीत नापास झालेली. पण कलाकुसर, हस्तकला, योगाभ्यास आणि वाचनाची तिला भयंकर गोडी. दहावीनंतर मंजुळाने खासगी प्रशिक्षण घेत लहान मुलांची शिकवणी सुरू केली. १९९४ पर्यंत सर्व काही ठीकठाक सुरू होतं. मोठा भाऊ प्रकाश वगळता घरात आलबेल होतं. प्रकाश ऊर्फ बबन वाईट संगतीतला. कुख्यात गँगस्टर विलास मानेचा नंबरकारी. जुगार, दारूचं प्रचंड व्यसन. शिवाय बाहेरख्यालीही. दारू ढोसून घरी आल्यावर बायकोला बुकलून काढणं, त्याच्या व्यसनांवरून दोघांमधली भांडणं, वाद मंजुळाच्या हळूहळू अंगवळणी पडत गेलं. प्रकाशच्या जाचाला कंटाळून पोटच्या दोन मुलांचा विचार न करता आत्महत्येसाठी विहिरीकडे धाव घेतलेल्या वहिनीला मंजुळाने दोनदा सुखरूप माघारी आणलं. पण जाच सहनशक्तीच्या पलिकडे गेला आणि वहिनीने जाळून घेतलं. तो आळ मंजुळा आणि तिच्या आईवर आला. १९९४ मध्ये दोघींना भांडुप पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. वहिनीच्या मृत्युपूर्व जबाबाचा भक्कम पुरावा दोघींविरोधात उभा ठाकला.

मारायचीच होती तर दोनदा आमच्या वहिनीला मंजुळाने, आईने बाबापुता करून परत आणलं नसतं.. प्रकाशनंतरचा भाऊ अनंत कळवळून सांगतो. वहिनीने प्रकाशच्याच जाचाला कंटाळून जाळून घेतलं. पण प्रकाशला काहीही पडलेलं नव्हतं. त्याचा डोळा आमच्या घरावर होता. आम्ही अन्य भावंडं कामानिमित्त बाहेर पडलेलो. घरी प्रकाश, वहिनी, त्यांची दोन मुलं, आई आणि मंजुळा. वहिनी आणि या दोघी त्याच्या आड येत होत्या. जाळून घेत वहिनी स्वत:च बाजूला झाली. उरल्या दोघींना बाजूला करण्यासाठी प्रकाशने मृत्यूशी झुंजणाऱ्या वहिनीला दोघींची नावं घ्यायला भाग पाडलं. म्हणे तू तसं नाही केलंस तर मुलांना मारून टाकेन. आईच ती. त्या परिस्थितीत मुलांसाठी तिने हा जाचही सहन केला. झालं. आमची माऊली आणि मंजुळा आरोपी झाल्या.

या आरोपात तीन महिने अटकेत राहिल्यानंतर मंजुळा व आई गोदावरी यांना जामीन मिळाला. न केलेल्या गुन्ह्य़ासाठी. तोही खुनाचा. आयुष्य उद्ध्वस्त होणार याची कल्पना असूनही मंजुळाने नवी सुरुवात केली. शिकवण्या पुन्हा सुरू केल्या. भांडुपमधल्या एका नावाजलेल्या शाळेत, प्राथमिक विभागात मंजुळाला शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली. मुलांना शिकवता शिकवता ती कपाळावर खुनी म्हणून लागलेला शिक्का पुसू पाहात होती. सर्वसामान्य तरुणीप्रमाणे लग्न, संसाराची स्वप्न मंजुळा पुन्हा पाहू लागली. पण काळ निष्ठुर असतो. नोकरी मिळाल्यानंतर दुसऱ्याच वर्षी खटल्याचा निकाल लागला. वहिनीने दिलेला मृत्युपूर्व जबाब मंजुळाने नव्या उमेदीने सावरलेलं आयुष्य बेचिराख करून गेला. आई गोदावरीसह मंजुळा जन्मठेपेची शिक्षा घेऊन येरवडा कारागृहात येऊन पडली.

कारागृहात आल्यानंतर सुरुवातीचा काही काळ जुळवून घेण्यात गेला. न केलेल्या गुन्ह्य़ाची शिक्षा भोगण्यापेक्षा मेलेलं बरं, असा विचार दोघींच्या मनाला शिवला. पण दिवस जात होते तशी मंजुळा खंबीर, कणखर होत होती. भूतकाळ विसरून जायचा. पदरी पडलेलं आयुष्य हसत, हसवत घालवायचं तिने मनोमन ठरवलं आणि सुरुवातही केली. ती कारागृहात शिक्षिका झाली. सहकैद्यांच्या मुलांची शिकवणी तिने सुरू केली. निरक्षर महिलांना शिकवण्याचा प्रयत्न तिने केला. शिस्त, सुस्वभाव आणि दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा यातून तिने क्षणाक्षणाला माणसं जोडली. योगाभ्यासाची आवड आणि शरीर सुदृढ ठेवण्यासाठीचा प्रयत्न सुरुवातीपासून मंजुळा करत होती. त्यामुळे तिने कारागृहात सहकैद्यांना योगाचे धडे दिले. व्यायामप्रकार शिकवले. मग हळूहळू सहकैद्यांचं पत्रलेखन सुरू झालं. न्यायालयीन पत्रव्यवहार सुरू झाला. न्यायालयातून आलेला, करायचा पत्रव्यवहार, तक्रारी, अर्ज त्यातला मायना, अर्थ मंजुळा सहकैद्यांना समजावून सांगू लागली. सगळयात महत्त्वाचं म्हणजे तू इथे कशी हे जाणून घेत प्रत्येक कठीण प्रसंगांमध्ये मंजुळा सहकैद्यांसोबत खंबीरपणे उभी राहिली, त्यांना मदतीचा हात देत गेली. त्यातून येरवडा कारागृहातल्या महिला कैद्यांसाठी ती हक्काची मंजू, मंजूताई, मंजूदीदी बनली.

चांगली वर्तणूक, सहकैद्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या मंजुळाची येरवडा कारागृहात वॉर्डन म्हणजेच मदतनीस म्हणून नेमणूक करण्यात आली. दुसऱ्या बाजूला तिचं वाचन सुरूच होतं. सहकैद्यांचे अनुभव, त्या त्या परिस्थितीत जाणते-अजाणतेपणी सहकैद्यांच्या हातून घडलेले गुन्हे या जोरावर तिने एक सुरेख कविता लिहिली. या कवितेला सामाजिक बाजू होती. तिनेक वर्षांपूर्वी येरवडा कारागृहातून प्रसिद्ध झालेल्या कवितासंग्रहात मंजुळाची ती कविता आवर्जून घेतली गेली. कवितासंग्रहाच्या प्रकाशनासाठी मुंबई-पुण्यातून कारागृहात गेलेल्या साहित्यिकांनी मंजुळाच्या कवितेचं तोंडभरून कौतुकही केलं.

बघता बघता मंजुळाने १२ र्वष येरवडयात काढली. वर्षभरात तिच्या शिक्षेची मुदत पूर्ण होणार होती. ती सुटणार होती. बाहेर पडल्यावर काय हे तिने आधीपासूनच ठरवून ठेवलं होतं. संसारात अडकून न पडता महिला कैद्यांसाठी, अत्याचारग्रस्त महिलांसाठी आयुष्य वेचायचं. पण काळाने मंजुळाचा पाठलाग सोडला नव्हता. सहा महिन्यांपूर्वी आई गोदावरीचं कारागृहात वृद्धापकाळाने निधन झालं. आईच्या निधनाचा मंजुळाला धक्का बसला. आतापर्यंत कारागृहात का असेना; पण आईची सावली मंजुळासोबत होती. आई गेल्यानंतर मंजुळाचं मन येरवडय़ात रमेना. घर भांडुपला, कल्याणला भाऊ राहतो, शिक्षाही सहा महिन्यात संपेल हा सर्व हिशोब करून मंजुळाने मुंबईत बदली मागितली. त्याच काळात भायखळा कारागृहात वॉर्डनची कमतरता असल्याने मंजुळा दोन महिन्यांपूर्वी भायखळ्यात आली.

२३ जूनची पहाट उगवली. नेहमीप्रमाणे पहाटे मंजुळाने सहकैद्यांचा योगा, व्यायामाचा तास आटोपला. न्याहारी झाली. दुपारच्या जेवणाची वेळ झाली. शुक्रवारचा दिवस होता. जेवणात अंडी आणि पावांचा बेत होता. ठरल्याप्रमाणे बॅरेक नंबर पाच मधल्या ५१ कैद्यांचा भत्ता म्हणजे जेवण आलं. त्यात दोन अंडी, पाच पाव कमी पडले. बराकीतल्या कोणीतरी मला फुटलेलं अंड मिळालं, आणखी कोणी पाव मिळाला नाही, अशी तक्रार केली. कारागृहाच्या आवारात पोलीस महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांचे कार्यालय आहे. ते त्या दिवशी मुंबईत नव्हते. कारागृहाचे अधीक्षक नातेवाईक आजारी असल्याने सुटीवर होते. वरिष्ठांपकी कोणीही नाही ही संधी साधून जेलर पोखरकर, गार्ड शेखसह सहा जणी बॅरेकजवळ आल्या. सर्वादेखत त्यांनी मंजुळाला शिव्या हासडल्या, अंडीपावांचा हिशोब लागत नसल्याचा जाब विचारला. मंजुळाला धरून कारागृह कार्यालयात नेण्यात आलं. काही सेकंदात मंजुळाच्या किंकाळ्या, विव्हळणं कारागृहात पसरलं. बेदम मारहाण सुरू झाली. पोखरकर, वसिमा या मारहाणीत आघाडीवर होत्या. गळ्यात साडीचा फास अडकवून या सहा जणींनी मंजुळाला फरफटत आणलं. नागपाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्य़ासोबत जोडण्यात आलेला प्रत्यक्षदर्शीचा जबाब सांगतो, तासाभराने पोखरकर आणि त्यांचं पथक पुन्हा बॅरेकमध्ये आलं. मंजुळाला नग्न केलं गेलं. लाथा बुक्क्यांनी तिच्या नग्न देहावर अगणित प्रहार झाले. दातओठ खात वसिमा किंचाळली, तुझे अंडे खाने का शौक है ना, अब दण्डा खा..हे म्हणत तिने लाकडी दंडुका मंजुळाच्या शरीरात घुसवला. हा अमानुष, जीवघेणा प्रकार बॅरेकमधले सहकैद्यांसमोर सुरू होता. मंजुळा विव्हळत होती. तिला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्यांना गुमान मागे व्हा नाही तर तुमचीही मंजुळा करू, अशी धमकी दिली गेली. त्या बिचाऱ्या मागे हटल्या. पर्यायच नव्हता. काही वेळाने मंजुळाला तसंच सोडून या क्रूरकर्मा निघून गेल्या. संध्याकाळी सातपर्यंत मंजुळा ग्लानीत तशीच पडून होती. सातच्या ठोक्याला तिने कारागृहाच्या  शौचालयात प्राण सोडला. सहकैद्यांनी बेशुद्ध पडली असा समज करून घेत चेहऱ्यावर पाणी मारलं, पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. मंजुळा काही केल्या उठत नाही हे लक्षात येताच त्यांनी कारागृहातील अन्य गार्डना बोलावून घेतलं. पण अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. बऱ्याच वेळाने कारागृहातील डॉक्टर आले. त्यांच्या सूचनेनुसार मंजुळाला जेजे रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे तिचा मृत्यू झाला हे जाहीर करण्यात आलं.

सुरुवातीला मंजुळाला मेडिकल हिस्ट्री होती, फुफुसाला सूज आल्याने, हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला, तिला मारहाण वगरे काहीही झालेली नाही, असे सांगून कारागृहातून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. पण मंजुळाचा छळ पाहून पेटून उठलेल्या महिला कैद्यांनी छत गाठलं, त्यांनी केलेल्या जाळपोळीचा धूर कारागृहातून बाहेर पडला, याचं चित्रण अवघ्या काही क्षणात व्हायरल झालं आणि माध्यमांसह सर्व मुंबईकरांचं लक्ष भायखळा कारागृहाकडे गेलं. महिला कैद्यांचा उद्रेक ऐकून उपाध्याय, साठे यांनी भायखळा कारागृह गाठून तातडीने चौकशी सुरू केली. सर्वच महिलांनी मंजुळावरील अत्याचार सांगितले. पाठोपाठ जेजे रुग्णालयातून शवविच्छेदनाचा अहवाल आला.  वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने जेलर पोखरकरसह सहा जणींना निलंबित केलं. त्याच रात्री नागपाडा पोलिसांनी या सहा जणींवर हत्येचा गुन्हा नोंदवला. घटनेच्या चौथ्या दिवशी मंजुळावर लंगिक अत्याचार घडल्याच्या बातम्या वर्तमान पत्रांमधून झळकल्या तेव्हा महिला आयोगाने दखल घेतली. स्वाधिकारात याचिका दाखल करून घेत कारागृह विभागाकडून अहवाल मागवला. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला. जनहित याचिकाही दाखल झाल्या.

हे सर्व सुरू असताना आधी मंजुळाची बदनामी करून, तिच्याबाबत खोटी माहिती पसरवून संभ्रम निर्माण करण्याचा आणि पर्यायाने आरोपी पोलिसांबद्दल सहानुभूती मिळावी, असे प्रयत्न विविध पातळ्यांवरून करण्यात आले. बारा र्वष कारागृहात काढल्याने मंजुळा सरावलेली होती. ती बॅरेकमधल्या अन्य कैद्यांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करे. त्यांना मारहाण करे. मंजुळा गरीब कैद्यांचं अन्न चोरून श्रीमंत कैद्यांना देत असे. मुलाखत कक्षात जातीने हजर राहून या श्रीमंत कैद्यांना जास्त वेळ आपल्या नातेवाईकांना भेटता येईल यासाठी तिचा खटाटोप असे. त्या बदल्यात ती कैद्यांच्या नातेवाईकांना विविध कारणं सांगून आपल्या घरी मनीऑर्डर करण्यास लावे, अशा वावडय़ा उठवून मृत्युपश्चात मंजुळाची बदनामी करण्याचा विचित्र प्रयत्न घडला.

कारागृह विभागात अनेक र्वष कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मंजुळाच्या बदनामीचे हे प्रयत्न हाणून पाडले गेले. मंजुळाविरोधात अशा प्रकारच्या तक्रारी ना येरवडय़ात आल्या, ना भायखळयात आल्या. उलटपक्षी येरवडय़ात असताना मंजुळाला दरमहा १५०० रुपये भत्ता किंवा मजुरी मिळत होती. ज्या सहकैद्यांचे नातेवाईक भेटीस येत नसत त्यांच्यासाठी ती स्वत:चे पसे खर्च करत होती. तिचे पसे तुम्ही घ्या आणि तिच्या नावे एफडी करा किंवा योग्य तिथे गुंतवा, अशी विनंती येरवडयातील अधिकाऱ्यांनी अनेकदा मंजुळाच्या भावंडांना केली होती.

दुसरीकडे जेजे रुग्णालय आणि कारागृह यांच्यात जुना वाद आहे. उट्टं काढण्यासाठी रुग्णालयाने चुकीचा, अतिरंजित शवचिकित्सा अहवाल दिला, ही थिअरी जिरवण्याचा प्रयत्न झाला. बेताल वर्तणुकीमुळे आधी आर्थररोड आणि आता भायखळा कारागृह प्रशासनाला जेरीस आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या आमदार रमेश कदम यांनीही डाव साधलाच. त्यांची बहीण भायखळा कारागृहात बंद आहे. मंजुळा हत्येचा मीही साक्षीदार असल्याचा दावा करत गुन्हे शाखेने आपलाही जबाब नोंदवून घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मंजुळाला कोणताही आजार नव्हता. शवचिकित्सेत तिच्या फुफुस्सात पाणी आढळलं. मृत्यूनंतर तिला सहकैद्यांनी बेशुद्ध समजत पाणी पाजण्याचा प्रयत्न केला होता.

पुण्यातून मुंबईत आल्यानंतर शेटय़े कुटुंबीय मे महिन्यात मंजुळाला भेटले. तेव्हा तिने आपल्या भावंडांना पुन्हा येरवडय़ाला जाता येईल का, अशी विचारणा केली होती. हत्येआधी दोन दिवसांपूर्वी तिने कारागृह बदलून मिळावं यासाठी तोंडी अर्ज केला होता. १२ र्वष येरवडय़ात निमूटपणे राहिलेली मंजुळा दोनच महिन्यांमध्ये भायखळा कारागृहाला का कंटाळली असावी, ही बाब विचार करायला भाग पाडणारी आहे.

अंदाज असा की इथे आल्यापासून मंजुळाची लोकप्रियता वाढत होती. ती इथल्या भ्रष्टाचाराविरोधात, सहकैद्यांच्या न्याय, हक्कासाठी आवाज उठवते, हे लक्षात येताच कारागृहातल्या अधिकाऱ्यांना विशेषत जेलर पोखरकरला ती खटकू लागली. मंजुळा अशीच सुटली तर कारागृहात आपली दहशत राहाणार नाही, तसं झालं तर अर्थार्जनाचे सर्व मार्ग बंद होतील, या भीतीतून तर मंजुळाची हत्या झालेली नाही ना, याचा तपास सध्या सुरू आहे. जेवण, सॅनिटरी नॅपकीन, नातेवाईकांना भेटण्याची वेळ किंवा संधी, न्यायालयात सुनावणीसाठी पाठवण्यासाठीची विनंती यावरून प्रत्येक कारागृहात हाणामाऱ्या होतात. पण मंजुळाला झालेली मारहाण हेतूपुरस्सर आणि डूख ठेवून केली गेली. दोन अंडी आणि पाच पावांचा हिशोब हे फक्त निमित्त आहे, असं निरीक्षण पुढे येतंय.

कारागृह कोणतंही असो भायखळा, आर्थररोड किंवा तिहार, इथे गुन्हा काय, वय काय यापेक्षा कारागृहात कोण आधी आलं ते महत्त्वाचं ठरतं. जो आधी आला त्याचाच हुकूम चालणार, हा कैद्यांमधला अलिखित नियम. वर्षांनुवर्ष कारागृहात राहणाऱ्या कैद्यांकडून हुकुमत गाजवण्याचा प्रयत्न होतो. मंजुळा वॉर्डन होती. येरवडय़ात तिच्या शब्दाला मान होता. पण भायखळयात येताच चारचौघांमधला अपमान, टोमणे आणि मारहाण हा अपमान, धक्का मंजुळा पचवू शकत नव्हती. त्यामुळेच ती बदली मागत असावी.

मंजुळा हत्याकांडाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय. गुन्हे शाखेने पोखरकरसह सर्व आरोपींना अटक केली आहे. आता त्यांच्या चौकशीतून मंजुळाच्या मृत्यूचं नेमकं कारण, त्यापुढे मागे घडलेल्या अनेक छोटय़ा मोठय़ा गोष्टी बाहेर पडू शकतील. जाता जाता मंजुळाने सहकैद्यांचं भलंच केलं, असं म्हणावं लागेल. मंजुळा मृत्यूनंतर भायखळा कारागृहात आलेल्या महिला आयोगाने सहकैद्यांशी मनमोकळा संवाद साधला. या संवादातून मंजुळावर घडलेला अत्याचार समोर आलाच. त्यासोबत विविध विषय, अडचणी, तक्रारीही समोर आल्या. पहिल्यांदाच आयोगाला उपरती झाली की राज्यभरातील कारागृहांमध्ये बंद असलेल्या महिला कैद्यांच्या तक्रारी आपल्यापर्यंत येत नाहीत. या पुढे महिला कैद्यांच्या तक्रारी आपल्यासमोर याव्यात यासाठी यंत्रणा उभी करण्याचा निर्णय आयोगाने घेतलाय. तक्रारींचा योग्य निपटारा होतो की नाही, यावरही आयोग देखरेख ठेवणार आहे. या माध्यमातून महिला कैद्यांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झालीये.

मंजुळाच्या मृत्यूने अपुरी कारागृहं, चार िभतींआड चालणारा भ्रष्टाचार, नियमांचं उल्लंघन, अपुरं पोलीस मनुष्यबळ, कैद्यांचे हक्क आदी बाबींवर पुन्हा चर्चा सुरू झालीय.
जयेश शिरसाट – response.lokprabha@expressindia.com