24 January 2021

News Flash

शोधमोहीम : ऑपरेशन काझीरंगा

मी माझ्या वरिष्ठांना काम पूर्ण केल्याचा आणि टीम सुरक्षित परत आल्याचा रिपोर्ट दिला.

कॅप्टन डॉ. नितीन सोनजे

त्या वेळी माझे पोस्टिंग आसाममध्ये होते, तो काळ होता १९९९ चा. त्या काळात आमच्याकडे कोणी पाहुणे आले की आम्ही काझीरंगाचे जंगल आणि तेथील गेंडे दाखवायला घेऊन जायचो. खरे तर फिरण्याचे जंगल आणि प्रत्यक्ष राखीव जंगल यात जमीन-अस्मानाचा फरक होता. महापुरापासून गेंडय़ांचे संरक्षण व्हावे म्हणून आमच्या रेजिमेंटने तेव्हा मोठे मोठे मातीचे बांध (बंड) बांधले होते. ब्रह्मपुत्रेला पूर येईल तेव्हा काझीरंगाच्या जंगलातले प्राणी त्या मातीच्या बांधावर चढतील आणि त्यांचे प्राण वाचतील, हा त्यामागचा उद्देश.

मला आठवते, १९९९ सालचा पावसाळा सुरू होण्यापूर्वी मला एक अत्यंत गोपनीय ऑपरेशन करण्याची संधी मिळाली होती. ते ‘ऑपरेशन उल्फा’ म्हणजे भारत-भूतान सीमेवर जाऊन किंबहुना भूतानच्या प्रदेशात जाऊन उल्फा अतिरेकी भारतात कसे व कोणत्या मार्गाने प्रवास करतात, त्यांच्या प्रवासाचा वेळ काय असतो, ते किती मोठय़ा समुदायात येतात, याची माहिती काढून आणण्याची जबाबदारी होती. हे काम ८-१० दिवसांत संपवून मी माझ्या रेजिमेंटमध्ये परतलो. त्या दिवशी रात्री आठच्या सुमारास जवळपास २५० किलोमीटरचा प्रवास करून आम्ही परत आलो होतो. मी माझ्या वरिष्ठांना काम पूर्ण केल्याचा आणि टीम सुरक्षित परत आल्याचा रिपोर्ट दिला. वरिष्ठांनी मला शाबासकी देऊन आराम करण्यास सांगितले. त्यानंतर मी माझ्या रूमवर आलो. तेव्हा माझी पत्नी बाळंतपणासाठी गावाकडे असल्याने मी तेव्हा एकटाच राहत होतो. रूमवर येऊन माझे बेडिंग न उघडता तसेच ठेवून अंघोळ करून तयार होऊन रात्री साडेनऊ वाजता आमच्या ऑफिसर्स मेसमध्ये जेवायला गेलो.

जेवणापूर्वी मी सॉफ्ट ड्रिंक्सचा ग्लास भरून घेतला आणि तेवढय़ात आमच्या मेसमधील मुलाने मला सांगितले की, ‘साहब, आपको कमांडिंग ऑफिसर साहब ने जल्दी बुलाया हैं।’ मी नुकताच त्यांच्याकडून आलो होतो. मी हातातला ग्लास तसाच ठेवून पुन्हा गेलो. त्यांनी मला आदेश दिला. ‘भारतीय हवाई दलाचे एक विमान ट्रेनिंगदरम्यान आकाशातच पेटले आहे. त्यातील शिकाऊ वैमानिकाने (हवाई दलाचे एक अधिकारी) खाली उडी मारली असावी अथवा त्याचा विमानात जळून मृत्यू झाला असावा. हे विमान काझीरंगाच्या जंगलात कुठे तरी कोसळले असावे नाही तर हवेतच जाळून खाक झाले असावे. त्या विमानाच्या वैमानिकाला शोधायचे आहे. इतर काही बटालियन शोधमोहिमेवर गेल्या होत्या; परंतु त्यांना पूर्ण अपयश आले आहे. नितीन.. तुला काझीरंगाच्या जंगलात बांध बांधायच्या कामामुळे त्या भागाची माहिती आहे. हे काम तुलाच करायचे आहे. उद्या सकाळी पाच वाजता जायचे आहे.’ कुठे जायचे, कोणाला रिपोर्ट करायचे, किती लोक लागतील, सोबत काय काय साहित्य, यंत्रसामग्री लागेल याचे सविस्तर चर्चावजा आदेश झाले. रात्री १०.०० वाजता (रात्री १०.३० वाजता लाइट ऑफ परेड असते त्यापूर्वी) मी रेजिमेंटमध्ये जाऊन संबंधितांना सकाळी ४.४५ ला तयार राहण्याचे आदेश देऊन आलो. जी टीम माझ्याबरोबर ‘ऑपरेशन उल्फा’मध्ये होती त्याव्यतिरिक्त इतरांना बरोबर घेण्याच्या सूचना मी दिल्या.

माझ्या आदेशामध्ये, काझीरंगाच्या मुख्य जंगलात लीच म्हणजे जळूचे प्रमाण किती आहे व त्यापासून बचाव करण्यासाठी मीठ कसे उपयोगी आहे, ते कसे व किती घ्यायचे, याच्या विशेष सूचना दिल्या. त्यानंतर रात्री १०.४५ वाजता मी मेसमध्ये येऊन जेवून झोपलो. ठरल्याप्रमाणे सकाळी ४.४५ वाजता मी रिपोर्ट घेतला आणि आमच्या कमांडिंग ऑफिसर साहेबांना आम्ही जात असल्याचा रिपोर्ट इंटरकॉमवरून दिला. फौजफाटा व यंत्रसामग्री घेऊन आम्ही काझीरंगाच्या मुख्य जंगलात आमच्या बेसकॅम्पला पोहोचलो. एकच नदीवजा नाला आम्ही तब्बल सात वेळा वेगवेगळ्या दिशांनी ओलांडला होता. आजूबाजूला घनदाट जंगल, त्यामध्ये सर्व प्रकारची हिंस्र श्वापदे. उल्फा अतिरेक्यांचा त्रास वेगळाच. कुठे आणि कसे जायचे, काय करायचे, काहीच कळत नव्हते. फक्त एकच माहीत होते- विमानाचे अवशेष अथवा वैमानिकाला शोधायचे. त्या काळी काही आजच्यासारखे जीपीएस वगैरे नव्हते. आम्हाला आर्मीत मॅप रीडिंग शिकवले होते. त्याचा उपयोग करून दिशा शोधायची होती.

*  ऑपरेशनचा पहिला दिवस

७० जवान आणि अधिकाऱ्यांची फौज घेऊन मी तैनात होतो. आदल्या दिवशी जवळच असलेल्या वस्तीवरच्या एका घरात राहणाऱ्या ज्येष्ठांना विनंती करून त्यांची दोन मुले जंगलात रस्ता दाखवण्यात मदत व्हावी म्हणून बरोबर घेतली होती. त्या मोबदल्यात त्या घरातील लोकांना साखर, चहा पावडर व दूध पावडर असा शिधा दिला होता. प्रत्यक्ष ऑपरेशनला निघायच्या आधी. जिथे जायचे आहे त्या भागाची टेहेळणी करणे व माहिती घेणे असा कार्यक्रम असतो. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मी व माझे सैनिक सहकारी निघालो. सोबत ‘क्राझ’ नावाचे रशियन बनावटीचे वाहन (ज्यातून बुलडोझरसारखे वाहन घेऊन जातात) बरोबर घेऊन निघालो. त्यामध्ये आम्ही आमचे सर्व साहित्य टाकले व प्रत्येकाच्या हातात फक्त एके-४७ बंदुका होत्या. जंगलात सर्व प्रकारची श्वापदे व उल्फा अतिरेक्यांचा हल्ला होण्याची शक्यता असल्यामुळे, प्रत्येक सेक्शन कमांडरला अशा आणीबाणीच्या प्रसंगी गोळी झाडण्याचे आदेश त्यांच्याच स्तरावर घ्यावे, असे आदेश मी दिले.

आम्हाला जंगलात जाऊन आपले काम करून संध्याकाळी परत येणे आवश्यक होते. जंगल इतके दाट होते की, भर दुपारीसुद्धा पाच मीटर अंतरावरचे दिसत नव्हते. घनदाट झाडी, उंच वाढलेले गवत, डासांचे साम्राज्य, हिंस्र पशूंचा केव्हा हल्ला होईल याची माहिती नाही, उल्फा अतिरेक्यांची शक्यतासुद्धा नाकारता येत नव्हती आणि जळू तर पाचवीलाच पुजलेले. अशा परिस्थितीत एकच आधार होता आणि तो म्हणजे यापूर्वी उल्लेख केलेली नदी, जिचे रूपांतर आता एका नाल्यामध्ये झालेले होते. आम्ही त्या नदीच्या उगमाच्या दिशेने निघालो होतो. त्या नदीचा उगम हा काही दगडधोंडय़ांतून नव्हता तर तो मातीतूनच होता. त्या भागात औषधालाही दगड मिळायचा नाही. अशा या नाल्याच्या एका काठावरून आम्ही आमचे ‘क्राझ’ घेऊन जात होतो. जळूचा अनुभव जवळपास सर्वानाच आला होता. जळू म्हणजे माणसाचे रक्त शोषणारा प्राणी. एकदा मानवी शरीराला त्याने पकडले की त्याची पूर्ण भूक भागेपर्यंत सोडत नाही. शेवटी तो जळू फुग्यासारखा फुगून नंतर फुटतो व रक्त गार लागले की कळते आपल्याला जळू चावला आहे. त्याला त्याची भूक भागण्याच्या अगोदर सोडायचा एकच उपाय.. तो म्हणजे त्याच्या तोंडाला मीठ लावणे. असो.

क्राझ नाल्याच्या बाजूने चालवून नेत असताना ते एका ठिकाणी पुढे जाण्याऐवजी नाल्याच्या दिशेने खाली घसरायला लागले आणि आमचे ‘ऑपरेशन क्राझ’ सुरू झाले. प्रयत्न करूनही आमचे क्राझ काही पुढे जात नव्हते अधिकाधिक खाली घसरत होते. मूळ काम बाजूला राहून हे दुसरेच काम सुरू झाले होते. शेवटी त्या पथकाचा कमांडर म्हणून मी क्राझचा चार्ज घेतला आणि स्वत: चालकाच्या जागेवर बसलो. क्राझचालकाच्या कॅबिनमध्ये एक विंच असतो. त्याचा उपयोग एखादे वाहन ओढण्यासाठी होतो. मी त्याचा आधार घेतला. विंच ऑपरेटरला माझ्याशेजारी बसवले. विंचचा लोखंडी दोर समोर एका झाडाला बांधला, विंच ऑपरेटरला सूचना दिली की वाहन सुरू करून गिअर टाकून थोडे जागेवरून हलताच विंच ओढायचा, जेणेकरून वाहन योग्य रीतीने पुढे जाईल. मी गिअर टाकला, क्लच एकदम सोडला, त्याने विंच ओढला आणि घडले वेगळेच. ते झाड उपटून आले व क्राझ आणखीच नाल्याच्या बाजूने खाली घसरला.. आता काय? वाहन नाल्यात पलटी होण्याचा धोका खूपच वाढला होता आणि असे झाले तर आमची ‘कोर्ट ऑफ एन्क्वायरी’ ठरलेली होती. मी आता वेगळीच शक्कल लढवली व विंचच्या रोपच्या साहाय्याने दोन झाडे एकत्र बांधली व पुन्हा तीच पद्धत वापरली. सर्व सहकारी सांगत होते, धोका खूप आहे, वाहन नाल्यात उलटले तर काय? मी वेळ आल्यावर वाहन सोडून उडी मारेन, असे त्यांना सांगितले. पण हा प्रयत्न यशस्वी झाला. आमचा क्राझ पुढे गेला आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला.

*  ऑपरेशनचा दुसरा दिवस

पहिल्या दिवशीच संध्याकाळी मी आमच्या कमांडिंग ऑफिसर व ऑपरेशन कमांडर यांना परिस्थितीचा अहवाल दिला. तो अर्थातच, ऑपरेशन क्राझ वगळता. संध्याकाळी निरोप आला की हेलिकॉप्टर मिळण्यासाठी आणखी एक दिवस लागेल आणि दुर्घटनेला जास्त दिवस झालेले असल्याने उद्याच (म्हणजे तिसऱ्या दिवशी) ऑन फूट ऑपरेशनला जावे लागणार आहे, असे दोन निरोप आल्याने मी मात्र द्विधा मन:स्थितीत होतो. त्यातच तिसरा निरोप आला की, ऑपरेशन कमांडर स्वत: तिसऱ्या दिवशी सकाळी ५.०० वाजता कॅम्पच्या ठिकाणी पोहोचून आम्हाला पुढची दिशा देणार. मनाची तयारी झाली, ७२ तासांच्या ‘स्वयं निर्भर ऑपरेशन’ची. हे एक कठीण असे ऑपरेशन असते, ज्यामध्ये बाहेरून कोणतीही मदत मिळणार नसते. ७२ तास पुरेल इतका कोरडा शिधा पाणी, सोबत घ्यावे लागते, पण खायला, झोपायला मिळेल की नाही याची खात्री नसते, शस्त्रपुरवठय़ासह काहीही मदत मिळणार नसते. मी सर्व आदेश दिले आणि तयारी करून आम्ही सर्व जण झोपी गेलो.

ऑपरेशनचा तिसरा दिवस

हा प्रत्यक्ष ऑपरेशनचा दिवस होता. एका दिवसाचे दोन वेळचे जेवण तयार करून घेतले, उरलेल्या दोन दिवसांसाठी पुरेल व टिकेल असे वेगळ्या पद्धतीचे म्हणजे दशम्या, पुऱ्या असे जेवण घेतले. सोबत पाण्याची बाटली होतीच. कमी वजनाचे अंथरूण पांघरूण (जर झोपायला मिळाले तर लागेल म्हणून), एक जास्तीच युनिफॉर्म, सॉक्स, डासांपासून बचाव करण्यासाठी क्रीम, जळूपासून बचावासाठी मीठ इत्यादी वैयक्तिक साहित्य घेतले. सोबत एके-४७ बंदूक, पुरेसा दारूगोळा, ऑपरेशन पूर्ण झाल्यावर संदेश देण्यासाठी स्मोक कॅण्डल घेतली. मी कमांडर असल्याने माझ्याकडे जंगलाच्या या भागाचा नकाशा, पेन, पेन्सिल, दिशादर्शक म्हणून कंपास, बायनाक्युलर घेतला. माझ्या सोबतीला रेडिओ ऑपरेटर होता, त्याच्याकडे संदेश वहनासाठी रेडिओ होता, तो एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर सेट केला की संदेश वहनाचे काम होते. तो संपर्काचा एकमेव मार्ग होता. वस्तीतली दोन मुले सोबत होतीच. आम्ही आमचे ऑपरेशन कमांडर येण्याची वाट पाहात होतो. ते पहाटे पाच वाजता पोहोचले. मी त्यांना रिपोर्ट दिला त्यानंतर त्यांनी आमच्या सर्व जवानांना प्रोत्साहित करण्यास सुरुवात केली. त्यांनी ऑपरेशनची पाश्र्वभूमी सांगितली. सर्वाचा उत्साह वाढवून प्रेरणा दिली. मला आजही त्यांचे ते काही शब्द आठवतात..‘मेरे बहादुर जवानो, जिस पायलट को आपको ढुंढना है, मान लो वो पायलट आप में से किसी का बेटा होता, किसी का भाई होता तो क्या आप उसको ऐसे ही छोड देते? उसे नही धुंडते? उसे साथ में नही ले जाते? आप ऐसे बहादुर रेजिमेंट के जवान हो जो इस ऑपरेशन को सफल करके ही वापस आयेंगे. क्या आप इस ऑपरेशन को सफल करोगे?’ सर्व जवानांनी एकाच आवाजात उत्तर दिले , ‘हा.. साहब.’ त्यानंतर मला आदेश झाले – ‘टेक ओव्हर’ मी प्रथेप्रमाणे पुन्हा रिपोर्ट दिला आणि ऑपरेशनला जाण्याची आज्ञा मागितली. आम्ही एकाच आवाजात घोषणा केली ‘हर हर महादेव’ आणि सर्व ताकदीनिशी कार्यावर निघालो.

माझे सर्व साहित्य त्या मुलांकडे दिले. ती दोन मुले म्हणजे आमच्या भाषेत सिव्हिलिअन.. आमचे वाटाडे! म्हणून पुढे ते, त्यांच्या मागे मी, माझ्या मागे माझे जेसीओ (अधिकारी) व त्यांच्या मागे माझे सर्व जवान, असे आम्ही निघालो. त्या मुलांवर पूर्ण विश्वास ठेवणे चुकीचे होते म्हणून मी त्या नाल्याच्या संदर्भाने जायचे ठरवले. तोच  आमच्यासाठी एकमेव संदर्भ होता, किमान जंगलात चुकल्यावर त्या संदर्भाने आम्ही परत येऊ शकणार होतो. आम्ही त्या नदीचे- नाल्याचे मूळ शोधूनही पुढे निघालो होतो. दुपारचे साधारण १२ वाजले असतील, तो नाला संपलेला होता, शोधूनही त्याचे काही अवशेष दिसत नव्हते. पाच मीटर अंतरावरचे स्पष्ट दिसत नव्हते, डासांचे  साम्राज्य पसरलेले होते. आमचे दुपारचे जेवण झाल्यामुळे पाणी संपलेले होते, आजूबाजूला पाण्यासाठी कोणताही स्रोत दिसत नव्हता.

आमच्या जवानंना फक्त त्या वैमानिकाला अथवा त्या जळालेल्या विमानाच्या अवशेषांना शोधायचे एवढेच माहिती होते, त्याची प्रत्यक्ष स्थिती फक्त मलाच माहीती होती. विमान कोसळल्याचा तो नववा दिवस होता. वैमानिकाने ते हवेत उडवल्यावर थोडे प्रशिक्षण झाल्यावर त्या वैमानिकाचा त्यांच्या एटीसीसोबत असलेला संपर्क तुटला होता आणि पुढे काय व कसे झाले याची कोणालाही काहीही कल्पना नव्हती. अशा परिस्थिती त्या वैमानिकाचे काय झाले असेल, वैमानिक जिवंत असेल का? असल्यास कसा असेल? जर दुर्दैवाने हुतात्मा झाला असेल तर त्याच्या पार्थिवाचे काय झाले असेल? त्याने पॅराशूट वापरून उडी मारली असेल तर तो एखाद्या झाडाला अडकून तर पडला नसेल ना? खाली पडून आणखी काही झाले नसेल ना? श्वापदांची तर शिकार झाला नसेल ना? असे नानाविध प्रश्न मनात घर करत होते. विमान ज्या ठिकाणी जळले होते त्या ठिकाणांचे अक्षांश व रेखांश खूपच ढोबळमानाने मिळालेले होते.

अशातच एक वेगळेच संकट आले. गांधील माश्यांचा हल्ला. ती दोन मुले पुढे  गेली, त्यांच्या मागे मी होतो, त्या मुलांचा धक्का लागला की माझा लागला माहिती नाही; पण ते गांधील माश्यांचे पोळे उठले. त्यांनी सरळ माझ्यावरच हल्ला केला. ३५-४० माश्या तोंडावर व हातावर बसल्या. मी अक्षरश: त्या माश्या हाताने ओढून काढल्या. त्यातल्या काही माश्या पूर्णपणे निघाल्या तर काही तुटून आल्या. त्यांचे काटे माझ्या शरीरात घुसले होते. काही क्षणातच माझे तोंड आणि हात सुजले. पूर्ण अंगाची लाही लाही सुरू झाली. लहान असताना एकदा अशीच एक गांधील माशी चावली होती तेव्हा आईने तिथे मातीचा चिखल करून लावला होता. आता चिखल करायला आमच्याकडे पाणी नव्हते. त्याला एक पर्याय होता.. तो शिवाम्बुचा ..अन् ती ही, स्वत:चीच.. तो ही पर्याय वापरला पण तो इतक्या मर्यादित स्वरूपाचा होता की बस्स. मग आमच्या काही जवानांनी झाडपाला आणून त्याचा रस लावला; पण आग आणि फुग्यासारखी तोंडाची सूज काही कमी होईना, शेवटी सर्वानी सल्ला दिला मी परत जावे. पण अपयश पचवणे त्या वेदनांपेक्षा फार त्रासदायक होते. म्हणून मी निर्णय घेतला, ऑपरेशन पूर्ण करायचेच! आम्ही तसेच पुढे  निघालो.

तो वैमानिक शहीद झालेला असण्याची शक्यता अधिक होती. जिवंत असण्याची शक्यता अवघी एकच टक्का होती. पार्थिव मिळणार म्हटल्यावर त्याची नऊ दिवसांत काय अवस्था झाली असणार? ते पूर्ण कुजून गेले असणार! त्याचा वास येत असणार, हे माहीत होते. दुपारी आमच्या नाकाने ऑपरेशन  संपन्न होणार असा संदेश दिला. एका बाजूने कुजलेला वास येऊ लागला. काही अंतर चालून जातो तसा वास जास्तच येऊ लागला. ऑपरेशन पूर्ण होणार, अशी चिन्हे दिसू लागली. जवळ गेलो तर.. ते वैमानिक त्यांच्या खुर्चीत बसलेले, डोक्यावर हेल्मेट, खुर्चीला सीट बेल्ट, मान एकदम सरळ, जसे काही ते विमान उड्डाण करण्याच्या तयारीतच बसले आहेत. त्यांची ती खुर्ची खाली चिखलात रुतलेली,  आजूबाजूला माश्या घोंघावत होत्या, दरुगधी येत होती आणि ते वैमानिक मात्र शहीद झाले होते. अशा अवस्थेत ऑपरेशन पूर्ण झाले. परंतु आमच्यापुढे यक्षप्रश्न होता ऑपरेशन सफल झाल्याचा संदेश कसा देणार? रेडिओला रेंज नसल्याने आम्ही कोणत्याही संदेशाची देवाणघेवाण करू शकत नव्हतो. ऑपरेशन सफल झाल्याचा संदेश मी स्वत: ऑपरेशन  कमांडर यांना देणे गरजेचे होते, परंतु माझी अवस्था गांधील माश्या चावल्याने खूपच बिकट झाली होती. तशाही परिस्थितीत मी माझ्या जवानांना  हेलिपॅड तयार करायच्या सूचना दिल्या, कारण त्या शहिदाचे पार्थिव एअर अ‍ॅम्ब्युलन्सनेच न्यावे लागणार, याची मला खात्री होती आणि हेलिपॅड तयार करणे हे आमचेच म्हणजे आर्मी इंजिनीअर्सचे काम होते. मी माझ्या रेडिओ ऑपरेटरला घेऊन जवळच्या टेकडीवर चढलो. तिथे आम्हाला थोडी रेंज मिळाली व आम्ही ऑपरेशन पूर्ण झाल्याचा संदेश देऊ शकलो. अपेक्षेप्रमाणे हेलिपॅड तयार करायचे आदेश ऑपरेशन कमांडर यांनी दिले.

काम पूर्ण होण्यास साधारणत: एक तास लागेल, असे त्यांना सांगितले. मी हेलिपॅड असलेल्या ठिकाणचे अक्षांश व रेखांश दिले. त्यानंतर मला थोडा वेळ त्या टेकडीवरच थांबण्याची सूचना मिळाली. त्याप्रमाणे काही वेळातच मला सांगण्यात आले की, एअर अ‍ॅम्ब्युलन्स लवकरच दाखल होईल, तिला हेलिपॅडवर उतरण्यासाठी मार्गदर्शन करावे, त्यासाठी माझ्याकडे स्मोक कॅण्डल होत्याच. मी काही विश्वासू सहकाऱ्यांबरोबर रेडिओ ऑपरेटरला टेकडीवरच थांबण्यास सांगून हेलिपॅडच्या ठिकाणी आलो. काही वेळानंतर आकाशात एअर अ‍ॅम्ब्युलन्स दिसू लागली. त्याप्रमाणे मी जागा दाखवण्यासाठी स्मोक कॅण्डल जाळल्या. एअर अ‍ॅम्ब्युलन्सचे आगमन होताच वैद्यकीय तज्ज्ञांनी येऊन पुढील कार्यवाही सुरू केली आणि माझे मिशन यशस्वी झाले. एअर अ‍ॅम्ब्युलन्सने त्या शहिदाचे पार्थिव तेथून घेऊन गेले. एकीकडे काम फत्ते झाल्याचा आनंद होता, तर दुसरीकडे ते वैमानिक शहीद झाल्याची वेदना.. यात मी माझ्या गांधील माश्यांमुळे झालेल्या वेदना काही काळ विसरूनच गेलो.

७२ तासांच्या ऑपरेशनच्या तयारीने गेलेलो आम्ही अवघ्या १४ तासांत काम फत्ते करून आमच्या बेसकॅम्पला परत आलो. मला असह्य़ वेदना  होत होत्या. तिथे डॉक्टर असूनही उल्फा अतिरेक्यांच्या धाकाने आम्हाला काही औषधोपचार मिळण्याची शक्यता कमी आहे, असे रस्त्यात भेटलेल्या वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले, तथापि मी प्रयत्न करण्याचे ठरवले. बंदुकीच्या धाकावर, आम्ही त्या डॉक्टरला झोपेतून उठवून त्याच्याकडून दोन पेनकिलर गोळ्या घेतल्या. चौथ्या दिवशी दुपारी काम फत्ते करून आम्ही आमच्या रेजिमेंटला पोहोचलो. आता मात्र अंगाची लाही लाही माझ्या सहनशीलतेच्या बाहेर गेली होती. पुढचे १० दिवस मी मिलिटरी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये अ‍ॅडमिट राहिलो. तिकडे माझ्या मुलाचा जन्म झाला. त्याच्या जन्माच्या वेळेस मला पत्नीबरोबर राहायचे होते. माझे स्वप्न, स्वप्नच राहिले..

(शब्दांकन – प्रा. डॉ. अनुश्री खैरे, संगमनेर) esponse.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2020 1:23 am

Web Title: operation kaziranga zws 70
Next Stories
1 लाट ओसरते आहे.. ..पण काळजी घ्यायलाच हवी
2 शेतकरीकोंडी : पर्याय आहे, पण..
3 दुसऱ्या लाटेची भीती
Just Now!
X