News Flash

पुरणपोळी

पुरणपोळी हा अनेकांचा आवडता पदार्थ. सण आले की पुरणपोळी करण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू होते.

पुरणपोळी हा अनेकांचा आवडता पदार्थ. सण आले की पुरणपोळी करण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू होते. गरमागरम तव्यावरून डायरेक्ट ताटात आलेली, स्वादिष्ट पुरणाने टम्म फुगलेली आणि साजूक तुपात थबथबलेली पुरणपोळी खाण्याची मजा काही औरच असते. कोण किती पुरणपोळ्या खातो यावर घराघरांत पजाही लागतात.

पुरणपोळी या गोड पदार्थातून फक्त आध्यात्मिकच नव्हे तर आयुष्य कसे जगावे असा मोलाचा संदेशही मिळतो. पुरणपोळीच्या अगदी मधोमध भरपूर प्रमाणात गोड पुरण असते. आणि काठाकाठांवर कमी पुरण असल्याने पुरणपोळी ही मध्यभागी जास्त गोड आणि काठाकाठांवर कमी गोड किंवा कधी कधी बेचव लागते. पुरणपोळी खाताना प्रथमच अधाशासारखे मधला भाग खाऊन टाकला तर शेवटी उरलेले कमी गोड काठ आपल्याला खावे लागतात. लक्ष न देता निष्काळजीपणे खाल्ल्यास गोड पुरणाचा भाग लवकर संपून जातो आणि उरतो तो पुरण कमी असलेला किंवा अजिबात नसलेला बेचव भाग. तो खाताना आपले तोंडही बेचव होते आणि मनातल्या मनात किंवा प्रत्यक्षपणे आपल्याकडून पुरणपोळी बनवणाऱ्या व्यक्तीच्या पाक कौशल्याचाही उद्धार होतो. त्यामुळे त्या व्यक्तीचे मन खट्ट होते. असे होण्यापेक्षा आधीच जरा संयमी राहून पुरणपोळीचे काठ प्रथम खावेत. उद्देश एकच की आता जरी हे गोड लागत नसले तरी मध्यभागी पोहोचेपर्यंत स्वादिष्ट, गोड असे पुरण आपल्याला खायला मिळेल.  काठावरची पुरणपोळी प्रथम खाऊन मग मध्यभागाची पुरणपोळी खाल्ल्याने आपल्याला अवीट अशा गोडीचा आनंद मिळतो. मध्यभागाचे ते सुमधुर पुरण तोंडात जाताच आपल्या तोंडातून पुरणपोळी बनवणाऱ्या व्यक्तीसाठी ‘वा! काय मस्त पुरणपोळी बनवली आहे’ असे प्रशंसात्मक उद्गार बाहेर पडतात. पुरणपोळीच्या चवीने आपल्याला दिलेला आनंद आपण आपल्या प्रशंसात्मक उद्गारांतून दुसऱ्याला देत असतो.

आपले आयुष्यही या पुरणपोळी सारखेच असते. अडचणी, अपेक्षाभंग, अपमान, दु:ख यांनी आपले आयुष्य भरले आहे असे वाटत असले तरी त्यात प्रेम, यश, प्रसिद्धी, आध्यात्मिक सुख, आनंद, समाधान या गोष्टी असतात; परंतु पुरणपोळी खाण्याबाबत करत असलेल्या चुकीसारखेच  आपण आयुष्यातील आनंद, प्रेम, यश, प्रसिद्धी, सुख, समाधान हे आधी उपभोगून टाकतो. हे सगळे उपभोगण्याची घाई, अट्टहास आपण करतो. आणि मग आयुष्याच्या शेवटी उरते ते अपेक्षाभंग, दु:ख, अपमान एव्हढेच. मग आपण एकतर आपल्या आयुष्याला किंवा स्वत:लाच दोष देत राहतो, किंवा आपल्या चुका, अपमान, दु:ख इत्यादींचे खापर दुसऱ्यावर फोडतो. पण दुसऱ्यावर हे खापर फोडताना आपण हे बघत नाही की जो अधाशीपणा आपण पुरणपोळी खाताना करत राहिलो तीच असंयमी वृत्ती आपण आयुष्यात दाखवली आहे. सुखामागे अंधपणे धावताना आपण निष्काळजीपणा केला. आयुष्याची पुरणपोळी खाताना आपणच हलगर्जीपणा केला आणि आपल्या अपयशाचे खापर आयुष्यावर किंवा इतरांवर फोडत राहिलो. आपल्या जबाबदाऱ्या आपण विसरत गेलो. अशा वेळी मग ‘उम्रभर तू यहीं गलती करता रहा, धुल चेहरे पर थी और आइना साफ़ करता रहा’ असेच म्हणावे लागते. आयुष्यातील दु:खांना, समस्यांना आपण तोंड न देता भ्याडासारखे पाठ दाखवून पळून गेलो. सुख उपभोगण्याच्या हव्यासेत आपण समस्या सोडवल्याच नाहीत. आयुष्याची सुमधुर अशी पुरणपोळी आपल्याला खाताच आली नाही.

आयुष्याची पुरणपोळी तिच्या माधुर्यासकट खायची असेल तर आधी त्यातील समस्यारूपी काठ खायला हवेत. ज्याप्रमाणे कमी गोड असलेले काठ अगोदर खातो त्याप्रमाणे आपल्या समस्या आधी सोडवायला हव्या. आपल्यासमोरील प्रश्नांना, अपेक्षाभंगांना आत्मपरीक्षणाद्वारे सोडवायला हवे. रुसवे, फुगवे, अपमान, नातेसंबंध इत्यादींमधला कमी गोडपणा, बेचवपणा आधी संपवायला हवा. समोरच्याच्या चुका माफ करायला हव्या. हे सगळे केल्यानंतर उरेल ते म्हणजे फक्त प्रेम, यश, कीर्ती यांनी काठोकाठ भरलेले गोड पुरणरूपी आयुष्य. मग फक्त आणि फक्त प्रेम, यश, कीर्ती यांचे आयुष्यातील सुमधुर पुरण खाण्यास निश्चितच मजा येईल. आयुष्याच्या पुरणपोळीवर मग आनंद आणि समाधानाचे तूप टाकून, ती थबथबलेली पुरणपोळी खाण्यात प्रत्येकालाच आनंद मिळेल. तेव्हाच आयुष्याची ही पुरणपोळी यशस्वीपणे खाता येईल.
औषेय कुळकर्णी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2015 1:11 am

Web Title: puran poli
टॅग : Diwali,Recipe
Next Stories
1 खाणे आणि मस्त जगणे..!
2 कुर्ती नव्या स्टाइलची..
3 ऑनलाइनच्या आक्रमकतेत, भविष्याची बीजं..
Just Now!
X