20 February 2019

News Flash

नामशेष होण्याचा धोका!

सगळीकडेच पाणथळ जागांवर अतिक्रमणे सुरू आहेत. त्याचा पर्यावरणाच्या समतोलावर परिणाम होतो आहे.

विदर्भात जंगल मोठय़ा प्रमाणात, पर्यायाने वन्यप्राणीही मोठय़ा प्रमाणात आणि त्याच वेळी पाणथळांची संख्या अधिक असल्याने स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाणही अधिक, पण आता हळूहळू पाणथळांवरील अतिक्रमण, प्रदूषण यामुळे स्थलांतरित पक्ष्यांनीही पाठ फिरवायला सुरुवात केली आहे.

सगळीकडेच पाणथळ जागांवर अतिक्रमणे सुरू आहेत. त्याचा पर्यावरणाच्या समतोलावर परिणाम होतो आहे. विदर्भही त्याला अपवाद नाही.

निसर्ग आणि पर्यावरणात होणाऱ्या बदलांचे वैज्ञानिक संकेत देणाऱ्या विदेशी पक्ष्यांचे स्थलांतरण अलीकडच्या काळात धोक्यात आले आहे. कारण या पक्ष्यांचा अधिवास असलेल्या पाणथळ जागा (वेटलॅण्ड) धोक्यात आल्या आहेत. विकासाच्या नावाखाली होणारे औद्योगिक, मानवी वस्तींचे अतिक्रमण, प्रदूषण या सर्व गोष्टी पाणथळ जागांसाठी धोकादायक ठरल्या आहेत. नदी, तलाव, किनारपट्टीचे खाऱ्या पाण्याचे सरोवर, खारफुटीचे प्रदेश, कुजून रूपांतरित झालेल्या पदार्थाच्या जमिनी, प्रवाळ खडक आणि कृत्रिम जलाशय, मिठागरे, सांडपाण्याचे तलाव आणि कालव्याचा समावेश पाणथळांमध्ये होतो. पाणथळे विपुल जैवविविधतेस आधार देतात. तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या लाखो लोकांच्या उपजीविकेवर परिणाम करतात. पाण्याचे शुद्धीकरण, पुरांचा बंदोबस्त, किनारपट्टीच्या भागात धुपीचे नियंत्रण, सूक्ष्म हवामानाचे नियंत्रण, रमणीय भूप्रदेशाचे सौंदर्य वृद्धिंगत करण्याचे काम करतात. मात्र, पाणथळांचे अस्तित्वच आज धोक्यात आले आहे.

हे टाळण्यासाठी वातावरणातील बदल आणि पर्यावरण संवर्धन या विषयी जागृत असणे आवश्यक आहे. त्याकरिता विज्ञानाशी जुळवून घेऊन त्याचा सखोल अभ्यास करण्याची जबाबदारीसुद्धा आपली सर्वाची आहे. पाणथळ जागा हा त्याचाच एक भाग आहे. हा केवळ पर्यावरणाचा नव्हे तर आपल्या जीवनाचाही एक भाग आहे. लुप्त होत चाललेली पाणथळे वाचवण्याची गरज आज निर्माण झाली आहे.

अतिथंड प्रदेशात जलाशये गोठल्यामुळे अन्नाचा शोध, सुरक्षित हवामान आणि घरटी बांधण्यासाठी पक्ष्यांचे स्थलांतरण घडून येते. गेल्या काही वर्षांत मात्र विदेशी पक्ष्यांच्या स्थलांतरण चक्रात होणारे बदल दखल घेण्यासारखे आहेत. एवढेच नव्हे तर स्थानिक पक्ष्यांसाठीसुद्धा पाणथळे राहिलेली नाहीत आणि जी आहेत ती पक्ष्यांसाठी योग्य नाहीत.

विदर्भात जंगल मोठय़ा प्रमाणात, पर्यायाने वन्यप्राणीही मोठय़ा प्रमाणात आणि त्याच वेळी पाणथळांची संख्या अधिक असल्याने स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाणही अधिक, पण आता हळूहळू पाणथळांवरील अतिक्रमण, प्रदूषण यामुळे स्थलांतरित पक्ष्यांनीही पाठ फिरवायला सुरुवात केली आहे.

विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यत पाणथळांची संख्या अधिक, परिणामी या ठिकाणी येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या आणि वैविध्यसुद्धा अधिक आहे. मात्र, या ठिकाणी होणारी मानवी ढवळाढवळ त्यांच्यासाठी मारक ठरत आहे. या पक्ष्यांचे अधिवास असणाऱ्या ठिकाणांवर गैर कृषी प्रकल्पांना मान्यता मिळू लागल्याने त्यांच्या अधिवासात त्यांना हवी असणारी शांतता भंग होत आहे. विदर्भातील या अनेक जलाशयांवर मासेमारीसाठी परवाने दिले गेले आहेत, पण क्षमतेपेक्षाही अधिक प्रमाणात मासेमारी होत असल्याने विदेशी पक्ष्यांनी या जलाशयांकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. मासेमारीकरिता या पाणथळांमध्ये मत्स्यबीज टाकले जाते आणि त्यानंतर मत्स्यबिजांच्या प्लास्टिकच्या पिशव्या तशाच टाकून दिल्यामुळे त्या पक्ष्यांसाठी धोक्याच्या ठरत आहेत. तलाव आणि नदीच्या पाण्यात वाढत जाणारे प्लास्टिक व रसायनांचा धोका पाणथळांचा दर्जा दिवसेंदिवस घसरण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.

विदर्भातली अनेक पाणथळ जागांची मूळ स्थिती बदललेली आहे. पाऊस कमी पडण्याचे कारण तर आहेच, पण त्याचबरोबर शहरालगतच्या पाणथळ जागांवर विकास प्रकल्पांचे अतिक्रमण मोठय़ा प्रमाणावर वाढत चालले आहे. हे कमी आहे म्हणून की काय मनुष्यवस्तीचे अतिक्रमणही वाढत आहे. पाणथळ जागांना धरून नवनवे प्रकल्प उभे राहत आहे. गोंदिया जिल्ह्यतील नवेगावबांधच्या तलावाने कोणे एके काळी सारसनगरी अशी ओळख निर्माण केली होती. मात्र, त्याचे नैसर्गिक रूप जतन करण्याऐवजी या पाणथळ जागेवर आडवेतिडवे बांध बांधून मुंबईच्या धर्तीवर चौपाटी तयार करण्याचा घाट घातला जात आहे. सारस पक्ष्यांनी केव्हाच या पाणथळावरून ‘एक्झिट’ घेतली आहे, पण आहे त्या पक्ष्यांचे वास्तव्यसुद्धा उडवून लावण्याचा प्रयत्न होतो आहे.

अमरावती जिल्ह्यतील नल-दमयंती सागर, केकतपूर, दस्तापूर, शेवती, सूर्यगंगा, घातखेड, पोहरा, मालखेड, सावंगा, इंदला, राजुरा, छत्री तलावांवर सोनटिटवा, तनई, राजहंस, गजरा, परी, सरग, चिमणशेंद्रय़ा, लहान टिटवा, पानटिवळा, मोठा पानलावा, छोटा टिटवा, जलरंक, तपकिरी डोक्याचा कुरव, गंगा पानलावा, शेंडी बदक आदी पक्षी येतात. तर मेळघाट व पोहरा-मालखेड राखीव जंगलात कृष्ण थिरथिरा, नीलय, राखी डोक्याची लिटकुरी, वरटी पाखरू आदी रानपक्षी हजेरी लावतात. यवतमाळ जिल्ह्यतील निळोना व दारव्हा तालुक्यांतील शिंदी अंतरगाव येथील तलावावर राजहंस, कृष्णढोक तर वाशीम जिल्ह्यातील महान पिंजर, एकबुर्जी तलावावर राजहंससारखे पक्षी हजेरी लावतात. गोंदिया, भंडारा, नवेगाव आणि अकोला जिल्ह्यतील काटेपूर्णा, यवतमाळ जिल्ह्यतील अरुणावती, इसापूर, बेंबळा प्रकल्पातील पाणथळांवरसुद्धा स्थलांतरित पक्षी येतात. असे वैविध्य इथे एकाच ठिकाणी बघायला मिळते. यावरून इतर ठिकाणांची कल्पना करता येते.

पण आता सगळीकडे ऱ्हासपर्व सुरू झाले आहे. नागपूर जिल्ह्यतील पाणथळ जागांवर स्थानिकांनी मासेमारी आणि शेती करून अतिक्रमण केले आहे. अंबाझरीचा तलाव म्हणजे एकेकाळी पक्ष्यांसाठी नंदनवन होते. अनेक दुर्मीळ स्थलांतरित पक्ष्यांची नोंद या तलावावर झाली आहे, पण मासेमारीच्या अतिरेकाने या पाणथळ जागेला विळखा घातला आहे. शहर आणि परिसरात ५०च्या आसपास अशा पाणथळ जागा आहेत ज्या ठिकाणी स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांचे वैविध्य आढळते. हिंगणा परिसरातील काही पाणथळ जागांवर आणि इतरही अनेक तलावांवर अवैधरीत्या देशी दारू तयार केली जाते.  सुराबर्डीसारख्या रमणीय परिसरातील पाणवठय़ांवर नको ते धंदे सुरू आहेत. तर काही तलावांवर वर्षभर मासेमारांचे जाळे पसरलेले आहेत. अवैध मासेमारी, अवैध धंदे आणि अवैध शेती अशा नानाविध कारणांनी पाणथळ जागा विळख्यात घेतल्या आहेत. भविष्यात त्यांची काळजी घेतली नाही, तर ही पाणथळे नामशेष होण्याचाच धोका अधिक आहे.
राखी चव्हाण – response.lokprabha@expressindia.com

First Published on February 2, 2018 1:06 am

Web Title: vidarbha wetland shrinking