जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्य़ातील नागरी वस्त्यांवर आणि भारतीय सीमेवर पाकिस्तानने जोरदार गोळीबार करून तोफगोळ्यांचाही मारा केला. पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात दोन जण जखमी झाले. पाकिस्तानकडून सलग दुसऱ्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.

सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तान रेंजर्स यांच्यात महासंचालक पातळीवर झालेल्या चर्चेनंतर शस्त्रसंधीचे उल्लंघन थांबले होते, मात्र शुक्रवारपासून पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानच्या रेंजर्सनी केलेल्या हल्ल्यात शाळेची बस, एक मिनी बस आणि एका ट्रॅक्टरचे नुकसान झाले. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या हल्ल्यास चोख प्रत्युत्तर दिले. शुक्रवारी सायंकाळी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेवरील मांगू चाक ठाण्यावर केलेल्या गोळीबारात एक नागरिक ठार झाला तर अन्य दोन जण जखमी झाले. शुक्रवारी रात्री पाकिस्तानच्या रेंजर्सनी सीमा सुरक्षा दलाच्या ठाण्यांवर जोरदार हल्ला चढविला. त्याला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. सुजनपूर, मावा, भाटी आणि बोबिया या गावांवर तोफांचा जोरदार मारा करण्यात आला.