सिलिकॉन व्हॅलीतील एका उद्योजकाने जो कुणी माणसाचे आयुर्मान १२० वर्षे करून दाखवणारे गुपित शोधून काढेल त्याला १० लाख डॉलर पारितोषिक देण्याची घोषणा केली आहे. गेली अनेक वर्षे वैज्ञानिक माणसाचे आयुर्मान वाढवण्याचे प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे वैज्ञानिकांनी हे आव्हान स्वीकारले असून तारुण्याचा झरा म्हणजेच आयुर्मान वाढवणारे गुपित शोधून काढण्यासाठी १५ वैज्ञानिक पथकांनी या स्पर्धेत भागही घेतला आहे.
निधी व्यवस्थापक व पारितोषिकाचे पुरस्कर्ते जून यून यांनी सांगितले की, २५ ते २६ या वयात माणसे मरण्याची शक्यता ०.१ टक्के असते. वैज्ञानिकांनी आता जीवनाचे कोडे सोडवावे व माणसाचे आयुर्मान १२० वर्षांपर्यंत करून दाखवावे असे खुले आव्हान यून यांनी दिल्याचे द गार्डियन या वृत्तपत्राने म्हटले आहे.
वैज्ञानिकांना उत्तेजन देण्यासाठी यून यांनी १० लाख डॉलरचा पॉलो अल्टो दीर्घायुष्य पुरस्कार गेल्या वर्षी जाहीर केला होता.
 जो आधी उंदराची आयुमर्यादा ५० टक्क्य़ांनी वाढवेल त्यासाठी हा पुरस्कार जाहीर केला होता. वार्धक्य रोखणारे संशोधन पुरस्कृत करणारे यून हे काही एकटे नाहीत.
गुगलनेही २०१३ मध्ये कॅलिफोर्निया लाइफ कंपनी स्थापन करून आयुमर्यादा वाढवण्यासाठी मानवी जीवशास्त्रात हस्तक्षेप करण्याची योजना आखली होती. २०१४ मध्ये अमेरिकी जीवशास्त्रज्ञ व तंत्रज्ञ क्रेग व्हेंटर यांनी दीर्घायुष्य साध्य करण्यासाठी एक्स प्राइज फाउंडेशनचे पीटर डायमंडिस यांच्यासह ह्य़ूमन लाँजिव्हिटी इनकार्पोरेशनची स्थापना केली होती. या कंपनीने १० लाख मानवी जनुक संकेतावलींचा माहिती साठा गोळा करण्याचे ठरवले असून त्याची संकेतावली २०२० पर्यंत सादर केली जाईल, आरोग्यदायी दीर्घायुष्य हा या कंपनीचा हेतू आहे. तो स्तुत्यही आहे कारण एखादी व्यक्ती लुळीपांगळी होऊन खूप जगली तर त्यात काही आनंद नाही.