आसामच्या फकरुद्दीन अली अहमद वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या २४ तासांत तब्बल ८ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. बुधवार रात्रीपासून हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे.

२ ते ४ दिवसांची पाच बालके ही बुधवारी रात्री दगावली होती. तर इतर तीन जणांचा गुरुवारी मृत्यू झाला. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे एकाच रुग्णालयात इतक्या मोठ्या संख्येने बालकांचे मृत्यू होऊनही रुग्णालय प्रशासनाने डॉक्टरांची आणि रुग्णालयातील स्टाफची बाजू घेत यात त्यांचे दृर्लक्ष किंवा चूक नसल्याचे म्हटले आहे. बालकांचे मृत्यू होण्यामागे त्यांचे वजन कमी असल्याचे कारण त्यांनी सांगितले आहे.

या वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य तथा रुग्णालयाचे मुख्य अधीक्षक डॉ. दिलीप कुमार दत्ता यांनी सांगितले की, जन्मावेळी वजन कमी असणे हे बालकांच्या मृत्यूमागील महत्वाचे कारण असते. या मृ्त्यूंमागेही हेच कारण असून त्यात डॉक्टरांचा दोष नाही. मृत्यू झालेल्या सर्व बालकांना नवजात गर्भधारणा देखभाल युनिट (एनआयसीयू) मध्ये ठेवण्यात आले होते. यातील काही बालकांचे वजन अडीच किलो इतके होते. तर एका बालकाचे वजन हे केवळ एक किलो इतके असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. दत्ता म्हणाले, रुग्णालयात दररोज याच कारणामुळे १ ते २ नवजात बालकांचे मृत्यू होतच असतात. बुधवारी आणि गुरुवारी या संख्येत वाढ झाल्याने याची चर्चा होत आहे. त्याचबरोबर राज्याच्या आरोग्यमंत्री हिमंता बिस्वास शर्मा यांनी देखील रुग्णालय प्रशासनाला क्लिनचीट दिली आहे. वैद्यकीय शिक्षण संचालकांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही देण्यात आल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे ऑगस्ट महिन्यांत ऑक्सिजनच्या पुरवठ्याअभावी ३० मुलांचा मृ्त्यू झाल्याने देशभरात खळबळ उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची चर्चा सुरु आहे.