साप चावल्याने नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला तरीही या गोष्टीकडे शिक्षकाने दुर्लक्ष केलं असा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. या प्रकरणी या मुलीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर वर्ग शिक्षिकेला निलंबित करण्यात आलं आहे. शाळा प्रशासनाने या घटनेकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप या मुलीच्या पालकांनी केला आहे. केरळमधल्या वायनाड जिल्ह्यातील सुलतान बाथेरी मध्ये ही घटना घडली. या घटनेनंतर पालकांचा उद्रेकही शाळेमध्ये पाहण्यास मिळाला. या मुलीच्या संतप्त नातेवाईकांनी शाळेतील कार्यालयात तोडफोड केली. तसेच शिक्षकांनाही इजा पोहचवण्याचा प्रयत्न केला. एस शेहाला असे साप चावल्याने मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

या मुलीच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शेहाला जेव्हा वर्गात बसली होती तेव्हा तिच्या पायाला इजा झाली होती. ही इजा साप चावल्यासारखी असू शकते असे वर्ग शिक्षकांना सांगितले गेले मात्र शिक्षकाने याकडे दुर्लक्ष केले. साधी काहीतरी जखम झाली आहे असे शिक्षकांनी सांगितले आणि आपले शिकवणे सुरुच ठेवले. मात्र या दुर्लक्षामुळेच शेहाला या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या घटनेनंतर काही टीव्ही चॅनल्सचे प्रतिनिधीही या शाळेत आले होते. या शाळेतलीही शेहालाचा वर्ग ती बसली होती ती जागा या सगळ्या गोष्टींचं चित्रण त्यांनी कॅमेरात केलं असंही मुलांनी सांगितलं.

या मुलीचा पाय निळसर पडू लागला तेव्हा तिला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र कोझिकाडे येथील मेडिकल कॉलेजमध्ये पोहचण्याआधीच या मुलीचा मृत्यू झाला. बुधवारी ही घटना घडली. हिंदुस्थान टाइम्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे. या सगळ्या घटनेनंतर मुलीच्या आई वडिलांनी आणि इतर पालकांनी शाळेच्या भिंतींना अनेक तडे गेले आहेत तसेच अनेक ठिकाणी भोकं पडली आहेत अशीही तक्रार केली. यामधूनच साप आला असावा आणि तो मुलीला चावला असावा मात्र शाळा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं असाही आरोप मुलीच्या आई वडिलांनी केला. शाळेच्या भिंतींची आणि आवाराला लागून असलेल्या भिंतीची डागडुजी करण्यात यावी यासाठी अनेकांनी विनंती केली. अनेकांनी तक्रारीही केल्या. मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलं.

दरम्यान या शाळेचे मुख्याध्यापक पी मोहन यांनी हे सांगितले की, ” या मुलीला रुग्णालयात घेऊन जाण्यास उशीर झाला नाही. तसेच शाळेने या मुलीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होतो आहे त्यातही तथ्य नाही.”

राहुल गांधींनीही घेतली दखल

या घटनेची दखल काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही घेतली आहे. वायनाडचे खासदार राहुल गांधी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये या मुलीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करा असंही सांगितलं आहे.

वायनाडच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही या प्रकरणी सविस्तर अहवाल मागवला आहे. या मुलीला साप चावल्यानंतर सुमारे चाळीस मिनिटं तिच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असा आरोप होतो आहे.