श्रीलंकेतील 100 शहरांनी सिगारेट विक्रीवर बहिष्कार टाकला आहे. देशाला तंबाखूमुक्त करण्याच्या दृष्टीने या 100 शहरांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, लोकांना धुम्रपानामुळे होणारं नुकसान सांगण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत लोकांना जागरुक करत शिक्षित करण्यात येत आहे. याचा परिणाम असा झाला की, अनेक शहरांमधील दुकान मालक आणि व्यवसायिकांनी सिगारेटची विक्री बंद केली.

जाफना येथील 22, मतारा येथील 17 आणि कुरुनेगाला येथील 16 शहरांनी सिगारेट विक्रीवर बहिष्कार टाकण्याच्या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे. सध्या 107 शहरं या मोहिमेत सहभागी असल्याची माहिती स्थानिक वृत्तवाहिनीने दिली आहे.

आरोग्य मंत्री रजीता सेनरत्ने यांनी आकडेवारीवर समाधान व्यक्त करत हा आकडा 2019 पर्यंत 200 वर जाईल अशी आशा व्यक्त केली आहे. श्रीलंकन सरकार गेल्या काही काळापासून धुम्रपान रोखण्यासाठी तसंच सिगारेटच्या विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

यासाठी त्यांनी तंबाखूवरील कर 90 टक्क्यांपर्यंत वाढवला होता. तसंच सिगारेटच्या पाकिटावर धोक्याची सूचना देणाऱ्या फोटोची जागा 80 टक्के ठेवण्याचा आदेश दिला होता. शाळेपासून 100 मीटर अंतरावर सिगारेट विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे. सोबतच सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानावर बंदी जाहीर केली आहे. 2020 पर्यंत सरकार तंबाखूच्या उत्पादनावर बंदी आणण्याचा विचार करत आहे.