पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षांचे १०७ आमदार लवकरच भाजपात दाखल होणार आहेत, असा खळबळजनक दावा भाजपा नेते मुकुल रॉय यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. यामध्ये तृणमुल काँग्रेस, काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या आमदारांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.


मुकुल रॉय म्हणाले, भाजपात दाखल होणाऱ्या या विरोधी पक्षातील आमदारांची आमच्याकडे यादी देखील तयार असून ते आमच्या संपर्कात आहेत.

सध्या कर्नाटक आणि गोव्यामध्ये भाजपाने विरोधी पक्षांच्या आमदारांना आपल्याकडे वळवण्याची खेळी केली आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांतील राजकीय परिस्थितीत प्रचंड उलथापालथ झाली आहे. यानंतर मध्य प्रदेश आणि राजस्थानातही भाजपा अशीच खेळी खेळणार असल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी माध्यमांमधून सुरु होते. त्यानंतर आता पश्चिम बंगालमधून हे नवे वृत्त आल्याने खळबळ उडाली आहे.

कर्नाटक सरकारमधील काँग्रेस-जेडीएसच्या १० आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर येथे निर्माण झालेला राजकीय पेच आणि त्यानंतर भाजपाने सरकार स्थापनेसाठी केलेला दावा या पार्श्वभूमीवर भाजपा राज्यांच्या राजकारणात जाणीवपूर्ण अनैतिक व्यवहार करीत असल्याचा आरोप नुकताच विरोधी पक्षांनी केला होता. त्यासाठी काँग्रेससह तृणमुल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीएम आणि तेलगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात निदर्शने केली होती.