आसामच्या नागरी सेवा आयोगाच्या परीक्षेत उमेदवारांकडून नोकरी मिळवून देण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी ११ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. भाजपप्रणित सर्बानंद सोनोवाल यांच्या सरकारने आजपर्यंत केलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे. हे सर्व अधिकारी २०१३ च्या बॅचमधील आहेत. आसामच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतून या अधिकाऱ्यांना बुधवारी पहाटे ताब्यात घेण्यात आले. याशिवाय, आगामी काही दिवसांत आणखी १४ अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून विशेष पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. त्यासाठी काही दिवसांपूर्वी २५ संशयित अधिकाऱ्यांच्या हस्ताक्षराचे नमूने न्यायवैद्यक शाळेत पाठवण्यात आले होते.

अखेर आज न्यायवैद्यक शाळेकडून याबद्दलचा अहवाल सादर करण्यात आल्यानंतर आरोपी अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. हे सर्वजण आसाम नागरी सेवा आणि आसाम पोलीस सेवा दलातील अधिकारी आहेत. आसाममध्ये तरूण गोगोई यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसचे सरकार असताना हा घोटाळा झाला होता. २००८ मध्ये काँग्रेसकडून राकेश कुमार यांची आसाम लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर २०१३ मध्ये राकेश कुमार यांना आयोगाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र, हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर नोव्हेंबर २०१६ मध्ये राकेश कुमार पॉल यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान आज अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये सबिरा इम्रान, जयंत कुमार दास, हेमंता हिलोल साकिया, हर्ष ज्योती बोरा, पल्लबिका सर्मा, दिपंकर खानीकर, हिमांग्शू चौधरी, अनिरुद्ध रॉय, देबाजित बोरा, अमरजित दास आणि सुदिप्ता गोस्वामी भारद्वाज यांचा समावेश आहे.