चाळीसहून अधिक भाविकांना राजस्थानच्या बुंदी जिल्ह्य़ातील एका मंदिरात घेऊन जाणारी बोट बुधवारी सकाळी चंबळ नदीत बुडाल्याने किमान ११ जण मृत्युमुखी पडले. तीन जण अद्याप बेपत्ता आहेत, तर २२ भाविकांची सुटका करण्यात आली.

तीसहून अधिक भाविकांना बुंदी जिल्ह्य़ाच्या इंदरगड भागातील कमलेश्वर मंदिरात घेऊन जाणारी बोट सकाळी पावणेनऊच्या सुमारास गोत्रा खेडय़ाजवळ चंबळ नदीत बुडाली. हे भाविक कोटय़ाच्या खटोली- इटावा भागातील होते. बोट ज्या ठिकाणी बुडाली, तेथे नदीची खोली सुमारे ४० ते ४५ फूट होती. एसडीआरएफ व एनडीआरएफ यांनी बचावकार्य सुरू केले आहे.

या दुर्घटनेत किमान ११ जण मरण पावले असून, बेपत्ता असलेल्या तिघांचा शोध सुरू आहे, तर २० जणांची सुटका केली, अशी माहिती जिल्हाधिकारी उज्ज्वल राठोड यांनी दिली. बोट कमजोर असल्याने दुर्घटना घडल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याचे ते म्हणाले.