अफगाणिस्तानात काबूल येथे स्पेनच्या दूतावासाला तालिबानने काल वेढा घातला होता त्याची अखेर आज झाली, त्यात एकूण सहा जण ठार झाले असून त्यात अफगाणिस्तानचे चार पोलीस व स्पेनचे दोन नागरिक यांचा समावेश आहे. चार हल्लेखोर दहशतवादीही यात मारले गेले. दहशतवादी व सुरक्षा जवान मिळून एकूण ११ जण या हल्ल्यात ठार झाले.

अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी सांगितले की, तालिबानने स्पेनच्या दूतावासाला वेढा घातला व त्यात सुरक्षा दलांनी शर्थीची झुंज दिली. तालिबानशी शांतता चर्चा काही आठवडय़ातच सुरू होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
काबूलच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख फरिदून ओबैदी यांनी सांगितले की, चार अफगाणी पोलीस व दोन परदेशी नागरिक तसेच चार हल्लेखोर या दहशतवादी हल्ल्यात ठार झाले आहेत.
स्पेनचे दोन पोलीस मारले गेल्याचे माद्रिद येथे तेथील सरकारने सांगितले असून काल अत्यंत गर्दीच्यावेळी स्पॅनिश दूतावासात स्फोट घडवून आणण्यात आला. स्फोटानंतर धुराचे लोट आकाशात दिसत होते. स्फोटांचे अनेक आवाज रात्रीनंतरही ऐकू आले. दूतावासातील सुरक्षा रक्षकांना आधीच दोन जणांना गोळ्या मारल्याचे दिसले होते. दरम्यान शेवटचे चार हल्लेखोर शनिवारी सकाळी मारले गेले. शुक्रवारच्या हल्ल्याची जबाबदारी तालिबानने घेतली असून परदेशी अतिथिगृह हे लक्ष्य होते असे म्हटले आहे.