उपमुख्यमंत्र्यांचाही समावेश

कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीत जगदीश शेट्टर मंत्रिमंडळातील १२ मंत्र्यांना पराभवाचा तडाखा बसला असून त्यामध्ये उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांचाही समावेश आहे.

ईश्वरप्पा यांना शिमोगा मतदारसंघातून पराभवाचा फटका बसला. ईश्वरप्पा हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते आणि त्यांच्याकडे ग्रामीण विकास तसेच पंचायत राज आणि महसूल खात्याचीही जबाबदारी होती. ईश्वरप्पा यांना पाच हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे या निवडणुकीत ते तिसऱ्या स्थानावर फेकले गेले असून त्यांना पराभवाची धूळ चारण्यासाठी येडियुरप्पा यांनी कंबर कसली होती.

मावळत्या मंत्रिमंडळातील उद्योगमंत्री मुरुगेश आर. निरानी हेही बिळगी मतदारसंघात काँग्रेसचे जे. टी. पाटील यांच्याकडून ११ हजार मतांनी पराभूत झाले आहेत. शेट्टर यांच्या मंत्रिमंडळातील जे अन्य मंत्री पराभूत झाले त्यांमध्ये व्ही. सोमण्णा (विजयनगर), बी. एन. बचेगौडा (अनेकल), सोगादू शिवण्णा (तुमकूर), एस. के. बेळ्ळुब्बी (बसवणा बागेवाडी), कलाप्पा बंडी (रोण), एस. ए. रवीन्द्रन (दावणगिरी, उत्तर), एस. ए. रामदास (कृष्णराजा) आणि आनंद आस्नोतीकर (कारवार) या मंत्र्यांचा समावेश आहे.

भाजप पराभवाच्या गर्तेत सापडला असला तरी काँग्रेसलाही या निवडणुकीत काही धक्के बसले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रिपदाचे दावेदार जी. परमेश्वर हे तुमकूर जिल्ह्य़ातील कोरटगिरी मतदारसंघातून जनता दल (सेक्युलर) उमेदवार पी. आर. सुधाकरलाल यांच्याकडून १८ हजारांहून अधिक मतांनी पराभूत झाले, तर भद्रावती मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आणि माजी हवाई उड्डाणमंत्री सी. एम. इब्राहिम हे तिसऱ्या स्थानी फेकले गेले.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे जी. परमेश्वरप्पा (कोरटगिरी) यांनाही पराभवाची धूळ चाखावी लागली. आपल्या पराभवाला काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.