टेक्सासमध्ये खत प्रकल्पात झालेल्या स्फोटातील बळींची संख्या १४ वर पोहोचली आहे. अमेरिकेच्या तपास आणि मदतकार्य पथकाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे.वेस्ट फर्टिलायझर कंपनीत स्फोट होऊन दोन दिवस उलटून गेले असून तेथील नागरिक अद्यापही या स्फोटानंतर उद्भवलेल्या स्थितीच्या विळख्यात आहेत. त्यामधून सावरण्यासाठी त्यांना बराच कालवधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्फोटानंतर लागलेली आग आटोक्यात आणताना अग्निशमन दलाचे स्वयंसेवी कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. स्फोटामुळे प्रकल्पाच्या छतालाही आग लागली आणि ज्वाळा हवेत पसरल्या आणि त्यामुळे प्रकल्पाचे अतोनात नुकसान झाले आहे. स्फोटामुळे २.१ क्षमतेचा भूकंपही झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे स्फोटामुळे अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. या स्फोटामुळे किती लोक विस्थापित झाले ते सांगता येणे कठीण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.