उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. विष्णूप्रयाग परिसरातील हाथी पर्वत भागात भूस्खलन झाल्याने जवळपास १५ हजार लोक अडकले आहेत. चार धाम यात्रेला सुरुवात झाल्याने उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली आहे. मात्र भूस्खलन झाल्याने हजारो भाविक अडकले आहेत.

चामोली जिल्ह्यातील जोशीमठ भागापासून ९ किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. या भागातील १५० मीटर परिसरात भूस्खलन झाले आहे. यासोबतच हृषिकेश-बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्गावरील ६० मीटर भागाचे भूस्खलनामुळे नुकसान झाले आहे. मात्र यामध्ये कोणत्याही भाविकाला दुखापत झालेली नाही.

‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले असून संपूर्ण स्थितीचा आढावा घेत आहेत. भूस्खलनामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रस्त्यावर पडलेल्या ढिगाऱ्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यावरील मातीचा ढिगारे हटवून वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत,’ अशी माहिती चामोलीच्या पोलीस अधीक्षक तृप्ती भट यांनी दिली.

घटनास्थळी पोहोचलेल्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या अधिकाऱ्यांनी भूस्खलनाचे प्रमाण मोठे असल्याचे सांगितले आहे. भूस्खलनामुळे रस्त्यावर निर्माण झालेले ढिगारे पूर्णपणे हटवण्यासाठी किमान दोन दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे बद्रिनाथकडे जाणारी वाहतूक पूर्ववत होण्यास वेळ लागणार आहे.