देशात गेल्या चोवीस तासांत करोनाच्या ५२ हजार ५० रुग्णांची नोंद झाली असून ८०३ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण करोना रुग्णांची संख्या १८ लाख ५५ हजार ७४५ वर पोहोचली असून ३८ हजार ९३८ जणांचे मृत्यू झाले आहेत. ५ लाख ८६ हजार २९८ रुग्ण उपचाराधीन असून १२ लाख ३० हजार ५०९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. ही संख्या उपचाराधीन रुग्णांपेक्षा दुपटीने जास्त आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ४४ हजार ३०६ रुग्ण बरे झाले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

देशभरात आत्तापर्यंत २ कोटींहून अधिक नमुना चाचण्या करण्यात आल्या असून गेल्या २४ तासांत ६.६ लाख चाचण्या झाल्या. सध्या देशात १० लाख लोकांमागे सरासरी १५ हजार ११९ चाचण्या केल्या गेल्या आहेत. गोवा, दिल्ली, त्रिपुरा, जम्मू-काश्मीर, तमिळनाडू आदी २४ राज्यांमध्ये हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही अधिक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

टाळेबंदी लागू झाल्यानंतर २५ मार्चनंतर पहिल्यांदाच मृत्युदर २.१० टक्कय़ांवर आला आहे. १७ जून रोजी मृत्युदर ३.३६ टक्के, ११ जुलै रोजी १.६७ टक्के होता. देशातील संसर्ग दर ८.८९ टक्के असून पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, पश्चिम बंगाल, कर्नाटक आदी राज्यांमध्ये हा दर १० टक्कय़ांपेक्षा कमी आहे. फक्त गेल्या आठवडय़ांतील आकडेवारीनुसार संसर्गदर ११ टक्के होता, अशी माहिती भूषण यांनी दिली. ज्या राज्यांमध्ये संसर्ग दर जास्त आहे तिथे अधिकाधिक नमुना चाचण्या करून रुग्णांना तातडीने उपचार करणे गरजेचे आहे. देशाच्या नव्या भागांमध्ये कोरानाचा प्रादुर्भाव होत असला तरी अजूनही १० राज्यांमध्येच ८२ टक्के रुग्ण आढळले असून ५० जिल्ह्यांमध्ये ६६ टक्के रुग्ण आहेत, असेही भूषण यांनी सांगितले.

तीन लशींवरील संशोधन प्रगतिपथावर

देशातील तीन लशींवरील संशोधन प्रगतिपथावर असून भारत बायोटेक आणि झायडस कॅडिला लशींच्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. ऑक्सफर्ड लशीसाठी सीरम इन्स्टिटय़ूटला परवानगी देण्यात आली आहे. या लशी मानवी वापरासाठी योग्य असल्याचे सिद्ध झाल्यानंतर प्राधान्यक्रम व वितरण, दळणवळण, साठवणूक आणि लस देण्यासंदर्भातील प्रशिक्षण या चार मुद्दय़ांवर सविस्तर विचार करावा लागेल, असे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले.

‘पीएम केअर’मधून ५० हजार कृत्रिम श्वसन यंत्रे

देशातील तीन कंपन्यांकडून ६० हजार कृत्रिम श्वसन यंत्रे खरेदी केली जात आहेत. त्यापैकी १८ हजार यंत्रांचे दोन महिन्यांत विविध राज्यांतील ७०० रुग्णालयांना वाटप केले आहे. ५० हजार यंत्रे ‘पीएम केअर’ निधीतून तयार केली जाणार असून त्यासाठी २ हजार कोटींची तुरतूद केली आहे. उर्वरित यंत्रांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. आयात कृत्रिम श्वसन यंत्राची किंमत १० ते २० लाख रुपये असून देशी बनावटीच्या यंत्राचा निर्मिती खर्च ४ लाखांपर्यंत आहे. प्रत्येक यंत्रामध्ये जीपीएस यंत्रणा असल्याने यंत्राचा वापर कुठे केला जात आहे हे समजू शकते, असे भूषण यांनी सांगितले.

महाराष्ट्रात १६ हजार जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात मंगळवारी दिवसभरात करोनामुळे ३०० जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत १६ हजार जण दगावले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या घटली आहे. राज्यात ७ हजार ७६० नव्या रुग्णांचे निदान झाले. राज्यात आतापर्यंत ४ लाख ५७ हजार करोनाचे रुग्ण आढळले आहेत. यापैकी तीन लाख रुग्ण बरे झाले आहेत. दिवसभरात १२ हजार ३२६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एका दिवसात सर्वाधिक रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. राज्यात सध्या १ लाख ४१ हजार उपचाराधीन रुग्ण असून त्यापैकी पुणे जिल्ह्य़ात ३८ हजाकर ३९७ रुग्ण आहेत. २४ तासांत पुण्यात १२९६, पिंपरी-चिंचवडमध्ये ५८५ रुग्ण आढळले.