तामिळनाडूतील अण्णाद्रमुकच्या (एआयएडीएमके) १८ आमदारांना अपात्र ठरविणाचा विधानसभा सभापतींचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांच्या सत्ताधारी सरकारला दिलासा मिळाला आहे. तामिळनाडू विधानसभेत विश्वास मतापूर्वी २२ ऑगस्ट २०१७ रोजी १८ आमदारांना अन्नाद्रमुकचे बंडखोर नेते टीटीवी दिनाकरण यांच्यासोबत गेल्याबद्दल अपात्र घोषित करण्यात आले होते.

२०१७ मध्ये अपात्र घोषित केल्यानंतर १८ आमदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी झाली. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सथ्यानारायणन यांच्या खंडपीठाने विधानसभा सभापतींचा निर्णय कायम ठेवत १८ आमदारांना अपात्र ठरविले आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा पर्याय अपात्र आमदारांना आहे.

या निर्णयानंतर मद्रास उच्च न्यायालयाच्या एआयएडीएमकेच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून या निर्णयाचे स्वागत केले.

हा धर्माचा विजय आहे. गुन्हेगार आणि फसवणूक करणाऱ्यांना कार्टाने लगावलेली चपराक आहे. आम्ही जिंकणार होते हे आम्हाला माहित होतं अशी प्रतिक्रिया तामिळनाडू विधानसभेचे उपसभापती पी.व्ही जयरामन यांनी दिली.

या निर्णयाचा आम्हाला फटका बसलेला नाही. हा एक अनुभव आहे. आम्ही परिस्थिती हाताळू, अशी प्रतिक्रिया टीटीव्ही दिनकरन यांनी न्यायालयाच्या निर्णयावर व्यक्त केली आहे. ज्या १८ आमदारांना अपात्र ठरविण्यात आले आहे; त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असेही त्यांनी म्हटले आहे.