नैराश्यामुळे टिकटॉक स्टारने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारी ही टिकटॉक स्टार १८ वर्षांची होती. टिकटॉक या अॅपवर तिचे खूप फॉलोअर्स होते. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, तिच्या आत्महत्येनंतर सूसाइड नोट मिळाली नसून टिकटॉकवर बंदी आणल्यामुळे नैराश्यात येऊन तिने हे पाऊल उचलल्याचं समजतंय.

चुलत भावाला ही तरुणी तिच्या रुममध्ये मृतावस्थेत आढळल्यानंतर पोलिसांना त्याबद्दलची माहिती देण्यात आली. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून ती नैराश्यात असल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. सरकारने ५९ चिनी अॅप्सवर बंदी आणली आणि यामध्ये टिकटॉक या अॅपचाही समावेश आहे. हा अॅप बंद झाल्याने तरुणीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचं त्यांनी सांगितलं.

नैराश्यामुळे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची अनेक प्रकरणं सध्या समोर येत आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतनेही नैराश्यामुळे आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य आणि नैराश्य यांविषयी अधिकाधिक जनजागृती व्हावी अशी मागणी अनेक कलाकारांकडून होतेय.