आंध्र प्रदेश सरकारने यंदाच्या खरिपाच्या हंगामात सात जिल्ह्य़ांतील १९६ महसूल मंडळांना दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले आहे. दुष्काळ पाहणीसाठी नियुक्त केलेल्या समितीने केलेल्या शिफारशी व जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेले अहवाल याची तपासणी केल्यानंतर १९६ महसूल मंडळांना दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. श्रीकाकुलम, प्रकासम, नेलोर, चित्तूर, कडप्पा, अनंतपूर व कुर्नूल जिल्ह्य़ांमधील ही महसूल मंडळे आहेत. यांपैकी बहुसंख्य दुष्काळग्रस्त मंडळे रायलसीमा भागातील कुर्नूल, कडाप्पा, चित्तूर आणि अनंतपूर येथील तर उर्वरित तटवर्ती जिल्ह्य़ातील आहेत. निकषांप्रमाणे मदतकार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यंदा नेहमीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाली आहे.