काबुल येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या दोन घटनांमध्ये २० जण ठार झाले आहेत. तर चार पत्रकारांसह १२ जण जखमी झाले आहेत. स्पोर्ट्स क्लबच्या आतमध्ये एक स्फोट झाला आणि त्यानंतर काही वेळाने स्पोर्ट्स क्लबच्या बाहेर दुसरा स्फोट झाला, अशी माहितीही मिळते आहे. पहिला स्फोट झाला त्याचवेळी काही पत्रकार आणि सुरक्षा कर्मचारी या कचाट्यात सापडले. पुढील महिन्यात याठिकाणी निवडणुका होणार आहेत. अशात झालेली ही घटना दहशत पसरवण्यासाठीच आहे अशीही चर्चा रंगली आहे.

स्पोर्ट्स क्लबच्या आतमध्ये एक बॉम्बस्फोट झाला. या घटनेत एकजण ठार झाला तर तीनजण जखमी झाले. त्यानंतर दुसरा बॉम्बस्फोट स्पोर्ट्स क्लबच्या जवळ झाला ज्यामध्ये इतर लोक मारले गेले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

पहिला स्फोट झाल्यावर या ठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आले होते. ज्यानंतर काही वेळातच दुसरा स्फोट झाला अशीही माहिती समोर येते आहे. स्फोटाची पहिली घटना समोर आली तेव्हाच या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी काही प्रसारमाध्यमांचे काही प्रतिनिधी आले होते. या घटनेचे वार्तांकन करत होते तेव्हाच दुसरा स्फोट झाला त्यामुळे प्रतिनिधी आणि त्यांच्यासोबत असलेले कॅमेरामनही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.