लिफ्टच्या लोखंडी दरवाजामध्ये डोकं अडकून एका २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. दिल्लीच्या सीमापुरी इंडस्ट्रीयल भागात शनिवारी ही दुर्देवी घटना घडली. डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे या युवकाचा मृत्यू झाला. मृत युवकाची ओळख पटली असून पुनीत त्याचे नाव आहे. लिफ्टच्या देखभालीत दुर्लक्ष झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंदवला आहे.

दोन महिन्यापूर्वी पुनीत येथे नोकरीला राहिला होता. इंडस्ट्रीयल युनिटमध्ये पुनीत लिफ्ट ऑपरेटरचे काम करायचा. इंडस्ट्रीयल युनिटमध्ये लागणाऱ्या वस्तूची ने-आण करण्यासाठी या लिफ्टचा उपयोग व्हायचा. युनिटमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी लिफ्ट व्यवस्थित काम करत नसल्याची तक्रार मालकाकडे केली होती असे जवाहर सिंह(४७) यांनी पोलिसांना सांगितले.

लिफ्ट आपोआप चालू-बंद व्हायची. आम्ही ही गोष्ट मालकाच्या कानावर घालून त्याला सुरक्षेसाठी उपयोजना करण्यास सांगितले होते. पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. लिफ्ट ऑपरेट करण्याचे बटन बाहेरच्या बाजूला होते. त्यामुळे लिफ्ट चालू किंवा बंद करण्यासाठी मान बाहेर काढावी लागायची.

घटना घडली त्यावेळी पुनीत लिफ्टच्या आतमध्ये होता. त्याला पहिल्या मजल्यावर कच्चा माल आणण्यास सांगितले होते. लिफ्ट चालू करताना त्याचे डोके बाहेर होते. त्याने बटण दाबण्याआधीच लिफ्ट आपोआप चालू झाली. त्यामुळे पुनीतचे डोके दरवाजा आणि लोखंडी ग्रिलमध्ये अडकले. पुनीतच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.