करोनाचा विषाणू हवेतून पसरत असल्याच पुरावे मिळाले असल्याचा दावा ३२ देशांतील २०० वैज्ञानिकांनी केला असून त्याचे सूक्ष्म कणही माणसाला करोनाबाधित करूशकतात. हा विषाणू हवेतील सूक्ष्म कणांत मिसळून पसरतो, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी हा दावा जागतिक आरोग्य संघटनेला कळवला आहे. कोविड १९ विषाणू हा शिंका व कफाच्या कणातून पसरतो, असे आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे होते. दी न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे, की जगात संसर्गाची ठिकाणे वाढत असून लोक बार, रेस्तराँ, कार्यालये, बाजारपेठा, कॅसिनो येथे जाऊ लागल्याने त्याचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. घरे, कार्यालये या सारख्या बंदिस्त जागातील हवेत हा विषाणू फिरत राहतो तसेच आजूबाजूच्या लोकांना बाधित करतो असे वैज्ञानिकांच्या आताच्या दाव्यात म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या २३९ वैज्ञानिकांनी जागतिक  आरोग्य संघटनेला खुले पत्र पाठवले असून त्यात म्हटले आहे की, सूक्ष्म कणांतूनही करोनाची बाधा होत आहे. त्यामुळे आता जागतिक आरोग्य संघटनेने त्यांच्या शिफारशीत बदल करावा. एका वैज्ञानिक नियतकालिकात हे पत्र प्रसिद्ध केले जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आतापर्यंत असे म्हटले होते, की करोना विषाणू हा कफ, शिंका यांच्या कणातून पसरतो. २९ जूनच्या सुधारित शिफारशीत जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते, की करोनाचा हवेतून प्रसार हा जर वैद्यकीय प्रक्रियात काही कण किंवा थेंब निर्माण होत असतील तर शक्य असतो. त्यात हे कण पाच मायक्रॉनपेक्षा कमी व्यासाचे असावे लागतात. आरोग्य संघटनेने आतापर्यंत मास्क चा वापर, सामाजिक अंतर, हात साबणाने धुणे हे जे प्रतिबंधात्मक उपाय सांगितले आहेत, ते तो विषाणू हवेतून पसरत नाही हे गृहीत धरून सांगितले आहेत.

एन ९५ मास्क गरजेचे

दी न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे, की जर करोनाचा विषाणू हवेतून पसरतो हे खरे असेल, तर ज्या घरांमध्ये हवा खेळती नाही तेथे तो जास्त धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे घरातही मास्क वापरणे गरजेचे आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना एन ९५ मास्क  देणे गरजेचे आहे. शाळा, दवाखाने, निवासस्थाने व कार्यालये येथे हवा खेळती राहिली पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेचे तांत्रिक प्रमुख डॉ. बेनेडेटा अलेग्रझी यांनी म्हटले आहे, की करोनाचा विषाणू हवेत पसरत असल्याबाबतचे हे पुरावे खात्रीशीर नाहीत. हवेतून प्रसार शक्य असला, तरी ठोस पुरावे मिळालेले नाहीत.

विषाणूवाहक कण हवेत तरंगतात

करोनाचे विषाणू असलेले कण शिंका व कफानंतर हवेत तरंगू शकतात का, या प्रश्नावर तज्ज्ञांचे मत असे, की त्यातील लहान कण तरंगत जाऊन व्यक्तीच्या श्वासात येऊन संसर्ग करूशकतात. ते कण जड असल्याने खाली पडतात व कुठल्या तरी पृष्ठभागावर पडून तेथे स्थिर राहतात, हे नेहमीच खरे नाही. शिवाय हे कण २३ फुटांपर्यंत प्रवास करूशकतात, हे आधीही अनेक वैज्ञानिकांनी सांगितले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेवर टीका

* तज्ज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या कार्यपद्धतीवर टीका केली असून वैज्ञानिक पुराव्यांत त्यातील वैद्यकीय भागाला जास्त महत्त्व दिले जात असल्याचे म्हटले आहे.

* नवे पुरावे असतील तर विचार करू – स्वामिनाथन

* जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले, की करोना विषाणू हवेतून पसरतो यावर नवीन पुरावे असतील, तर त्याचा विचार केला जाईल. प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. जेव्हा जागतिक आरोग्य संघटनेला पत्रकार किंवा वैज्ञानिक आव्हान देतात, तेव्हा ते आम्ही गांभीर्याने घेत असतो.