भारतात २००५ ते २००८ या कालावधीत झालेल्या बॉम्बस्फोटांचा सूत्रधार आणि सध्या आयसिसमध्ये सामील झालेला अबू रशिद सीरियात ठार झाला. सीरियातील इदलिब येथे अबू रशिदचा मृत्यू झाल्याचे समजते.

अबू रशिद हा मूळचा उत्तर प्रदेशमधील आझमगडचा रहिवासी होता. पूर्वी मुंबईतील एका नेत्रचिकीत्सा रुग्णालयात काम करणारा अबू रशिद दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आला. सुरुवातीला तो काही वर्षे इंडियन मुजाहिद्दीनमध्ये काम करत होता. मात्र, इंडियन मुजाहिद्दीनविरोधात भारतातील सुरक्षा यंत्रणांनी मोहीम सुरु करताच तो पाकिस्तानमध्ये पळाला. तिथून तो अफगाणिस्तानमध्ये गेला आणि तिथेच तो आयसिसमध्ये सामील झाला.

मे २०१६ मध्ये आयसिसने एक व्हिडिओ जाहीर केला होता. यामध्ये अबू रशिदचा देखील समावेश होता. व्हिडिओत रशिदने भारत सरकारला धमकी दिली होती. मुस्लिमांवर होणाऱ्या अन्यायाचा बदला घेऊ अशी धमकी त्याने दिली होती. अबू रशिद  मुंबईतील एक व दिल्लीतील तीन बॉम्बस्फोटांप्रकरणी वाँटेड होता.