जयपूर येथे स्थानिक पातळीवर आयोजित करण्यात येत असलेल्या राजपुताना टी-२० लीगमध्ये फिक्सिंग केल्याच्या आरोपावरुन, २०११ च्या विश्वविजेत्या भारतीय खेळाडूची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटवर पुन्हा एकदा फिक्सिंगचे काळे ढग जमा होताना दिसत असल्याची चर्चा क्रीडा विश्वात सुरु झालेली आहे.

राजपुताना प्रिमीअर लीग ही स्पर्धा बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या रडावर गेल्या वर्षापासून होती. या लीगमधील सामन्यांचं निओ स्पोर्ट्स या वाहिनीवर थेट प्रक्षेपणही करण्यात येत होतं. सध्या राजस्थान पोलिसांचा सीआयडी विभाग या लीगच्या आयोजकांची सखोल चौकशी करत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना या लीगमधून फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य सुत्रधाराची ओळख पटलेली आहे. या सुत्रधाराचे भारताकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळलेल्या खेळाडूशी संबंध असल्याचं बोललं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार भारताकडून वन-डे, कसोटी आणि टी-२० या तिन्ही प्रकारात क्रिकेट खेळलेला हा खेळाडू या स्पर्धेतील काही सामन्यांमध्ये हजर होता.

या लीगमधील अंतिम सामन्यात एका गोलंदाजाने चक्क ८ वाईड बॉल टाकल्यानंतर, बीसीसीआयला राजपुताना प्रिमीअर लीगच्या आयोजनाबद्दल संशय आला होता. यानंतर भ्रष्टाचारा विरोधी पथकाच्या सल्ल्यानंतर बीसीसीआयने राजस्थान पोलिसांना या क्रिकेट स्पर्धेची चौकशी करण्याची विनंती केली होती. यानंतर राजस्थान पोलिसांनी जयपूरमधील ४ हॉटेलवर छापा टाकत १४ जणांना ताब्यात घेतलं. या १४ संशयितांनी राजपुताना प्रिमीअर लीगच्या आयोजक, खेळाडू, पंचांशी संपर्क साधल्याचं समोर आलं. याचसोबत पोलिसांनी केलेल्या छापेमारीत रोखरक्कम, मोबाईल फोन, वॉकी-टॉकी, लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी अटक केलेले आरोपी सध्या जामीनावर असून सध्या हे प्रकरण राजस्थान पोलिसांच्या सीआयडी विभागाकडे आहे.

पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असून, दोषी व्यक्तींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन राजस्थान पोलिसांच्या सीआयडी विभागाचे अतिरीक्त महासंचालक पंकज कुमार सिंह यांनी म्हटलं आहे. मात्र विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील खेळाडूच्या सहभागाबद्दल कोणतीही माहिती देण्यासाठी नकार दिला आहे. त्यामुळे राजस्थान पोलिस या प्रकरणी नेमकी काय कारवाई करतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.