निवडणुकीतील वाढता खर्च लक्षात घेता २०१९ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक जगातील सर्वात महागडी ठरेल असा दावा अमेरिकामधील तज्ज्ञानं केला आहे. लवकरच लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर होणार आहे. त्याआधीच राजकीय पक्षाकडून प्रचाराचा नारळ फुटला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत ६.५ बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त पैसे खर्च होईल असा दावा मिलन वैष्णव यांनी केला. वैष्णव कार्गी इन्डॉवमेंट फॉर इंटरनॅशनल थिंक टँकच्या दक्षिण आशिया विभागाचे संचालक आहेत. वैष्णव यांच्या दाव्यानुसार, २०१६ मध्ये अमिरेकित झालेल्या निवडणुक खर्चापेक्षा भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा खर्च जास्त असणार आहे. त्यामुळे ही जगातील सर्वात महागडी निवडणूक ठरणार आहे.

२०१६ मध्ये अमिरेकित झालेल्या निवडणुकीत ६.५ बिलियन डॉलर्सचा खर्च आला होता. तर २०१४ मध्ये भारतातील लोकसभा निवडणुकीत ५ बिलियन डॉलर्सचा खर्च झाला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत ६.५ बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त पैसा खर्च होईल असा दावा करण्यात वैष्णव यांच्याकडून करण्यात आला आहे. जर हा दावा खरा ठरला तर २०१९ लोकसभा निवडणुक जगातील सर्वात महागडी निवडणूक ठरेल.

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांचा आणि उमेदवारांचा खर्च ५० ते ६० हजार कोटी रुपयांपर्यंत पोचण्याची शक्‍यता भारतातील बिगर सरकारी संस्था व ‘थिंग टॅंक सर्वेक्षण सेंटर फॉर मीडिया स्टडीज’ने प्रसिद्ध केला होता. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चात ५५ ते ६० टक्के वाढ, तर राजकीय पक्षांच्या खर्चात २९ ते ३० टक्के वाढ होईल, असा अंदाज या अहवालात व्यक्त केला आहे.

येत्या निवडणुकीत भाजपा आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार टक्कर होईल. सत्ताधारी आणि विरोधरकांमधील संघर्ष अटीतटीचा असेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च होईल, असा कयास त्यांनी व्यक्त केला. येत्या निवडणुकीचा निकाल काय असेल, याची कल्पना नाही. मात्र ही निवडणूक जगातील सर्वात महागडी असेल, याबद्दल शंका नाही,’ असं वैष्णव म्हणाले.