निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सहा जणांचा तेलंगणामध्ये मृत्यू झाला आहे. निजामुद्दीन येथे झालेल्या या एका कार्यक्रामामुळे दिल्लीमध्ये सध्या भितीचं वातावरण आहे. या धार्मिक कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एकाच एमारतीतील २४ जण करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आले आहे. या कार्यक्रमाला हजारो लोकांची उपस्थिती होती. सध्या परिसरातील अनेकांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांकडून निजामुद्दीनमधील हा परिसर सील करण्यात आला आहे. तसेच शेकडो लोकांच्या टेस्ट केल्या आहेत. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यापैकी २०० जणांना करोनाची लागण झाल्याची भिती वर्तवण्यात येत आहे.

दिल्लीच्या लोकनायक हॉस्पिटलमध्ये सध्या करोनाचे १७४ रुग्ण दाखल आहेत. यापैकी १६३ जण हे निजामुद्दीनमधील आहेत. रविवारी ८५ जणांना दाखल करण्यात आलं. तर सोमवारी ३४ जण दाखल झाले. घटनेचं गांभीर्य ओळखून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मैलानाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मरकजच्या मौलानांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊन असतानाही मोठा धार्मिक कार्यक्रम आयोजित केला आणि त्याची परनावगीही न घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

सध्या संपूर्ण निजामुद्दीन परिसर सील करण्यात आला आहे. या परिसरात तबलीग़-ए-जमातीचं मुख्य केंद्र आहे. तर त्याला लागूनच निजामुद्दीन पोलीस स्टेशन आणि त्याशेजारीच ख्वाजा निजामुद्दीन औलिया यांचा दर्गा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ते लोकांमधील लक्षण ओळखून त्यांना हॉस्पिटलमध्ये क्वॉरंटाइन होण्यास पाठवले आहे.