वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करण्याच्या वेडापायी एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. दिल्लीतील मंडी हाऊस परिसरात मित्रांबरोबरच्या मोटरसायकल शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात त्याचे दोन मित्र जखमी झाले आहेत. त्यांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील कॅनॉट प्लेस ते मंडी हाऊसदरम्यान सोमवारी रात्री गाजी, लक्ष्य आणि हिमांशू (वय – २४) या तिघांनी मोटरसायकल शर्यत लावली. वाऱ्याच्या वेगानं हे तिघेही मोटरसायकली पळवत होते. लेडी इरविन कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ ते आले असता हिमांशू याचं मोटरसायकलवरील नियंत्रण सुटलं. मोटरसायकलसह तो कॉलेजच्या भिंतीवर जाऊन आदळला. यात जखमी झालेल्या हिमांशूचा मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात हिमांशूच्या एका मित्राने घातलेल्या हेल्मेटमधील कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विवेक विहारमध्ये राहणाऱ्या हिमांशूनं अनेक वाहनांना ओव्हरटेक केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. मंडी हाऊस परिसरात तो आला. त्यावेळी त्याचं मोटरसायकलवरील नियंत्रण सुटलं आणि रस्त्यालगतच्या भिंतीवर जाऊन जोरानं आदळला. यात त्याचा मृत्यू झाला. हिमांशू आणि त्याचे मित्र रात्री पार्टीहून परतत होते. त्यावेळी त्यांनी शर्यत लावली. लक्ष्यच्या हेल्मेटवर कॅमेरा लावण्यात आला होता. त्यात ही घटना कैद झाली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त बी. के. सिंह यांनी दिली.