पाकिस्तानच्या झिआरत घर डोंगराळ प्रदेशात असलेली संगमरवराची खाण कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता २६ वर पोहोचली आहे. अद्यापही सात जण बेपत्ता असून गुरुवारी त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू होते, असे वृत्त येथील माध्यमांनी दिले आहे.

अफगाणिस्तानच्या सीमेजवळ खैबर-पख्तुन्वा प्रदेशात संगमरवराच्या सहा खाणी सोमवारी रात्री कोसळल्या. या दुर्घटनेत जखमी झालेल्या चार जणांचा बुधवारी मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २६ वर पोहोचली. ठार झालेल्यांमध्ये बहुसंख्य खाणकामगार आहेत.

खाण कोसळली तेव्हा तेथे जवळपास ४५ कामगार काम करीत होते, असे वृत्त ‘डॉन’ने दिले आहे. खैबर-पख्तुन्वा सरकारने मृतांच्या नातेवाईकांना नऊ लाख रुपयांची तर जखमींना एक लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे.