2G स्पेक्ट्रम घोटाळ्यामध्ये ए राजा व कणिमोळी यांच्यासह सगळ्यांची निर्दोष मुक्तता झाल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर या संदर्भातल्या बातम्यांना उधाण आलं आहे. परंतु, सगळ्यात जास्त चर्चा रंगतेय ती एका शक्यतेची ती म्हणजे आता भाजपाचे धुरंधर नेते अमित शाह व नरेंद्र मोदी तामिळनाडूमध्ये पाळंमूळं रोवण्यासाठी डीएमकेशी युती करतात का याची!

ए. राजा व कणिमोळी यांच्याविरुद्ध आरोप का सिद्ध करता आले नाहीत, तपास नीट का झाला नाही, चौकशीत खरे दोषी का सापडले नाहीत, सगळेच कसे निर्दोष सुटले अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या असून काहीजणांनी याची संगती भाजपा – डीएमकेच्या युतीच्या संभाव्यतेशी लावली आहे.

तामिळनाडूमध्ये भाजपाचं अस्तित्व शून्य आहे. एआयडीएमकेशी संबंधितांवर आयकर खात्याच्या धाडी पडणं, नरेंद्र मोदींनी करूणानिधींची भेट घेणं, 2G मध्ये राजा व कणिमोळी यांना क्लीन चीट मिळणं… याची संगती २०१९ मध्ये तामिळनाडूमध्ये भाजपाची डीएमकेशी युती होण्याच्या शक्यतेशी लावण्यात येत आहे.

डीएमकेचे नेते आरोपमुक्त झाल्यामुळे भाजपाचा युती करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे काही जणांनी ट्विट केले आहे. किंबहुना त्यासाठीच राजा व कणिमोळी यांच्यावरील ठपका दूर केल्याचा कयास काही जण व्यक्त करत आहेत. मोदींच्या कंपूनं अत्यंत धूर्तपणे ही चाल खेळली असून काही दिवसांनी लोकं 2G घोटाळा विसरून जातील आणि भाजपा तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश करती झालेली असेल असे काही जण म्हणत आहेत.

[jwplayer LWwwlhFu]

१.७६ लाख कोटी रुपये गेले कुठे हे शोधण्यासाठी कोर्टाच्या अध्यक्षतेखाली एखादी अत्यंत कार्यक्षम समिती नेमावी आणि विनोद राय यांच्या मार्गदर्शनाखाली याचा छडा लावावा असं मतही व्यक्त करण्यात आलं आहे. सीबीआय ही अत्यंत अकार्यक्षम यंत्रणा असून महत्त्वाच्या प्रकरणाचा छडा लावण्यात ती अपयशी ठरल्याचा ठपकाही काही जणांनी ठेवला आहे.
परंतु, अनेकांचा सूर मात्र, ही भाजपा – डीएमकेच्या युतीची पूर्वतयारी असा आहे.