आंध्रप्रदेशात वाळूची कमतरता, बांधकाम व्यवसाय ठप्प

श्रीनिवास जनयाला, हैदराबाद

आंध्रप्रदेश सरकारच्या नवीन वाळू-खाण धोरणामुळे वाळूची कमतरता निर्माण झाल्याने  बांधकाम व्यवसाय परिणाम झाला असून गेल्या ४-५ महिन्यात ३० लाख कामगारांचा रोजगार बुडाला आहे.

एका नळ जोडणी कामगाराने (प्लंबर)  आत्महत्या करण्यापूर्वी चित्रफित तयार केली. ही चित्रफित सोमवारी  व्हायरल झाल्याने गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले. गुंटूर येथील पोलेपल्ली व्यंकटेश या बांधकाम कामगाराने २ ऑक्टोबरला आपल्या निवासस्थानी गळफास घेतला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या चित्रफितीत व्यंकटेश म्हणतो की, तो ३-४ महिन्यांपासून बेरोजगार आहे. त्यामुळे तो आर्थिक संकटात आहे.

आतापर्यंत राज्यात अशाप्रकारची तिसरी आत्महत्या आहे. त्यांच्या कुटुंबीयांना या आत्महत्या वाळुच्या कमतरतेमुळे बांधकाम व्यवसाय ठप्प झाल्याने होत असल्याचा दावा केला आहे.

गुंटुर जिल्ह्य़ातील संगम जगलरलमुडी येथील सी. नगब्राह्माजी (३४) याने २५ ऑक्टोबरला स्वत:च्या घरी गळफास घेतला होता. त्याच दिवशी या जिल्ह्य़ातील पी. व्यंकटराव या बांधकाम कामगाराने सुद्धा गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी सत्तेत येताच मे २०१९ ला जुन्या सरकारचे वाळू धोरण रद्द केले होते.