एका महिलेचा पाठलाग करणाऱ्या तीन जणांना दिल्लीमधील खान मार्केट परिसरामध्ये पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेले तिन्ही जण पंजाब बाग परिसरामध्ये राहणाऱ्या या महिलेचा दिवसभर पाठलाग करत होते. मात्र पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन त्यांना अटक केल्यानंतर त्या तिघांनी आपण डिटेक्टीव्ह असल्याची माहिती पोलिसांना दिली. विशेष म्हणजे महिलेच्या पतीनेच आपल्याला तिच्यावर पाळत ठेवायला सांगितल्याचेही त्यांनी कबूल केले. संबंधित महिलेच्या पतीला तिच्या चारित्र्यावर संक्षय असल्याने त्याने या खाजगी डिटेक्टीव्हला तिचा पाठलाग करुन माहिती गोळा करण्यास सांगितली होती असं पोलीस तपासात या तिघांनी सांगितले आहे.

या प्रकरणात नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त मधुर वर्मा यांनी अधिक माहिती दिली. संबंधित महिलेने तुघलग रोड पोलीस स्थानकांमध्ये केलेल्या तक्रारीनुसार तीन जणांना महिलेचा पाठलाग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये हेमंत अग्रवाल (२८), बाबार अली (१९) आणि अमित (२२) यांचा समावेश आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार हेमंत यांची पूर्व दिल्लीमधील शाहदरा येथे एक खाजगी डिटेक्टीव्ह एजन्सी चालवतात. तर बाबार आणि अमित हे दोघे हेमंत यांच्यासाठी काम करतात. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार महिलेने केलेल्या तक्रारीमध्ये सर्व प्रकार सोमावारी घडल्याचे म्हटले आहे. ही महिला घरागुती सामान विकत घेण्यासाठी आणि तिच्या मैत्रिणींना भेटण्यासाठी पंजाब बाग परिसरातील घरातून बाहेर पडली. दुपारी अचानक ती कनोट प्लेस परिसरात असताना तीन जण आपला सकाळपासून पाठलाग करत असल्याचे तिच्या लक्षात आले. ‘तिघेजण आपला पाठलाग करत असल्याचे समजल्यानंतर मी घाबरले. मात्र या तिघांनी अगदी चाणक्यपुरीमधील एका हॉटेलमध्येही जिथे माझ्या मैत्रिणीला मी भेटायला गेले होते तिथेही माझा पाठलाग केला,’ असं त्या महिलेने पोलिसांना सांगितले.

हॉटेलमधून निघाल्यानंतरही हे तिघेजण आपला पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलेने तिच्या नातेवाईकांना फोन केला. त्यानंतर काही वेळामध्ये खान मार्केट परिसरामध्ये त्या महिलेचे नातेवाईक तिच्या मदतीला पोहचले. तेव्हा महिलेने आरडाओरड करुन या तिघांना पकडण्याचा प्रयत्न केला. बाजारामधील स्थानिक दुकानदारांच्या मदतीने या तिघांनाही पकडण्यात आले. त्यानंतर एका दुकानदाराने पोलिसांना फोन केल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सर्वांना ताब्यात घेतले.

अटक करुन या तिघांबरोबर त्या महिलेलाही चौकशीसाठी पोलिस स्थानकात नेण्यात आले. चौकशी दरम्यान या तिघांनीही आपण प्रायव्हेट डिटेक्टीव्ह असल्याची माहिती देताना या महिलेच्या पतीनेच तिच्यावर नजर ठेवण्यासाठी पैसे दिल्याचे सांगितले. पोलिसांनी लगचेच महिलेच्या पतीला पोलिस स्थानकामध्ये बोलवून घेतले. पतीने पोलिसांसमोर या तिघांनी केलेले दावा खरा असल्याचे सांगत चारित्र्याच्या संक्षय आल्याने आपणच या तिघांना पत्नीचा पाठलाग करण्यास सांगितल्याची कबुली दिली.