गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी झालेल्या विचित्र अपघातात तीन पाकिस्तानी कमांडोंचा मृत्यू झाला. ‘द हिंदू’ने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी पहाटे हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर गुजरात तटरक्षक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा यंत्रणेच्या दोन कमांडोजना सुखरूप वाचवले. मात्र, आणखी तीन कमांडोजना वाचवण्यात अपयश आले. तटरक्षक दलाचे जवान याठिकाणी दाखल होण्यापूर्वीच तीन कमांडोंचे मृतदेह पाण्यावर तरंगत होते. तर आणखी एक कमांडो बेपत्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गुजरातच्या जखाऊ बंदरापासून ७० सागरी मैल अंतरावर (नॉटिकल माईल्स) सोमवारी पहाटे पाकिस्तानी सागरी सुरक्षा यंत्रणेच्या बोटींच्या (पीएमएसए) ताफ्याने भारताच्या सागरी हद्दीत प्रवेश करत तब्बल डझनभर मच्छिमारी नौका पकडल्या. या मच्छिमारी नौका पुन्हा कराचीच्या दिशेने ओढून नेताना हा अपघात घडला. यावेळी पीएमएसएची एक बोट भारतीय मच्छिमारी नौकेवर जोरात आदळली आणि पाण्यात उलटली. या सगळ्या प्रकारानंतर तटरक्षक दलाकडून कमांडोजचे मृतदेह पाकिस्तानच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानकडूनही भारताच्या मच्छिमारी नौका सोडून देण्यात आल्या.