देशात गेल्या एका दिवसात आणखी तीन लाख २३ हजार १४४ जणांना करोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या एक कोटी ७६ लाख ३६ हजार ३०७ वर पोहोचली आहे, तर करोनातून बरे होण्याच्या प्रमाणात आणखी घट झाली असून ते ८२.५४ टक्क्यांवर आले आहे, असे मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

गेल्या २४ तासांत करोनामुळे आणखी २७७१ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या एक लाख ९७ हजार ८९४ वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपेक्षा करोनाची लागण होणाऱ्यांच्या संख्येत किंचित घट झाली आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या २८ लाख ८२ हजार २०४ वर पोहोचली असून हे प्रमाण एकूण बाधितांच्या १६.३४ टक्के इतके आहे. तर करोनातून बरे होण्याचे प्रमाण ८२.५४ टक्क्यांपर्यंत घसरले आहे.

देशात आतापर्यंत एक कोटी ४५ लाख ६५ हजार २०९ जण करोनातून बरे झाले आहेत, तर मृत्युदरात घट होऊन तो १.१२ टक्क्यांवर आला आहे. गेल्या २४ तासांत करोनामुळे २७७१ जणांचा मृत्यू झाला, त्यामध्ये ५२४ जण महाराष्ट्रातील आहेत. तर आतापर्यंत एक लाख ९७ हजार ८९४ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ६५ हजार २८४ जण महाराष्ट्रातील आहेत, असेही आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.