जर भारतीय अर्थव्यवस्थेतील सुस्ती कायम राहिली तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या या वर्षात आपल्या ३० ते ४० हजार कर्मचाऱ्यांना कमावरुन कमी करु शकतात, अशी भीती इन्फोसिसचे माजी चीफ फायनान्शिअल ऑफिसर (सीएफओ) मोहनदास पै यांनी व्यक्त केली आहे.

आयटी क्षेत्रात प्रत्येक पाच वर्षांनंतर हजारो लोकांच्या नोकऱ्या या प्रकारे जातात. कारण, पाच वर्षांत आयटी क्षेत्रात मोठे बदल होत असतात आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना नोकऱ्यांतून काढले जाते, असे पै यांनी म्हटले आहे. जेव्हा कोणतीही इंडस्ट्री पूर्ण सक्षम होते तेव्हा मध्यम स्तरावर काम करणारे अनेक लोक आपल्या पगाराच्या तुलनेत कंपनीला नवं काही देऊ शकत नाहीत. याच कारणामुळे जगात प्रत्येक क्षेत्रात अनेक जणांना आपली नोकरी गमवावी लागते, असे त्यांनी म्हटले आहे. नवभारत टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

जेव्हा एखादी कंपनी विकसित होत असते तेव्हा कर्मचाऱ्यांना बढती मिळत असते तसेच त्यांच्या पगारातही वाढ होत असते अशा परिस्थितीत कंपनीला यामुळे फारसा फरक पडत नाही. मात्र, जेव्हा कंपनीचा विकास थांबतो तेव्हा व्यवस्थापनाला यावर विचार करणे भाग पडते. अशा परिस्थितीत मध्यम आणि वरच्या पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गरजेपेक्षा जास्त पगार मिळत असतो त्यांच्यावर नोकरी जाण्याचे संकट ओढवते.

पै पुढे म्हणतात, आयटी क्षेत्रात होत असलेल्या बदलांमुळे प्रत्येक पाच वर्षांनी ही स्थिती येत असते. जर कोणाला अधिक पगार मिळत असेल तर त्याला त्या हिशोबाने काम करावे लागते. जर तो याबाबत पिछाडीवर राहिला तर त्याला आपली नोकरी गमवावी लागते. असे असले तरी आयटी क्षेत्रातील ज्या लोकांची नोकरी जाईल त्यांच्याकडे दुसऱ्या संधी देखील उपलब्ध असतात. मात्र, त्यासाठी त्यांना काळाप्रमाणे अपडेट रहावे लागते.