स्वस्तात विमानसेवा पुरवणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सने विमान खरेदीची विक्रमी ऑर्डर दिली आहे. एअरबस कंपनीकडे इंडिगोने 300 विमानांची ऑर्डर दिली आहे. ही ऑर्डर कोणत्या एका विमानकंपनीने एअरबसला दिलेली सर्वात मोठी ऑर्डर असल्याचं म्हटलं जात आहे. ‘ए-320 निओ फॅमिली’च्या तब्बल 300 विमानांची ऑर्डर देऊन इंडिगोने या क्षेत्रातील खरेदीचा नवा विक्रम आपल्या नावे केलाय. विमान खरेदीचा व्यवहार अंतिम टप्प्यात असून यात एअरबसच्या ‘ए 321 एक्सएलआर’ या नवीन विमानाचाही समावेश आहे. या ऑर्डरमध्ये ए-320-निओ, ए-321-निओ आणि ए-321-एक्सएलआर या विमानांच्या खरेदीचा समावेश आहे.

ही ऑर्डर मिळाल्यानंतर इंडिगोकडे एकूण 730 ‘ए-320 निओ फॅमिली’  एअरक्राफ्ट असतील. यापूर्वी इंडिगोने 2005 ते 2015 च्या काळात तीन टप्प्यांमध्ये 530 एअरबस विमानांची ऑर्डर दिली होती. भारतातील विमानचालन क्षेत्रात जलद विकासाची अपेक्षा असल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिल्याचं इंडिगोने म्हटलं आहे. याद्वारे ग्राहकांना आणखी स्वस्त दरात सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच इतर योजनांची पूर्तता कंपनीकडून केली जाईल. हा तब्बल 33 अब्ज डॉलरचा (जवळपास 2.31 लाख कोटींचा) व्यवहार असू शकतो. याद्वारे शेअर बाजारातील आपले स्थान भक्कम करण्याचाही कंपनीचा प्रयत्न असेल.

याबाबत बोलताना, “ही ऑर्डर ऐतिहासिक आहे. एअरबस कंपनीला कोणत्या एका एअरलाइनकडून मिळालेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रात जलद विकास होण्याची अपेक्षा आम्हाला आहे. आम्ही ग्राहकांना अजून स्वस्त दरात सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच इतर योजनांची पूर्तता करणार आहोत”, असे इंडिगोचे सीईओ रोनोजॉय दत्त म्हणाले. ‘इतकी मोठी ऑर्डर देण्यामागे सेवा विस्तार करण्याची आवश्यकता’ हे देखील कारण असल्याचं दत्त यांनी यावेळी सांगितलं.