पूर्व लडाखच्या नियंत्रण रेषेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरु असताना सोमवारी रात्री गलवाण खोऱ्यात संघर्ष झाला. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले पण चीनच्या बाजूलाही मोठे नुकसान झाले आहे. चीनने अजूनपर्यंत हे मान्य केले नसले तरी यूएस न्यूज वेबसाइटने या संघर्षात ३५ चिनी सैनिक ठार झाल्याचे म्हटले आहे. यामध्ये एक वरिष्ठ अधिकारी सुद्धा आहे.

आणखी वाचा- सीमेवर भारताबरोबर आणखी संघर्ष नको – चीन

अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने यूएस न्यूज वेबसाइटने हे वृत्त दिले आहे. अमेरिकेच्या विश्लेषणानुसार, आपले सैनिक मारले गेले हे चीन मान्य करणार नाही कारण ते हा आपल्या सैन्यदलाचा अपमान समजतात. एएनआयने ४३ चिनी सैनिक या संघर्षात ठार झाल्याचे म्हटले आहे.

घटनास्थळी काल रात्री चिनी हेलिकॉप्टरच्या फेऱ्या वाढल्या होत्या. त्यावरुन चीनच्या बाजूलाही मोठी जिवीतहानी झाल्याचे स्पष्ट होते.

आणखी वाचा- गलवाण खोरे संघर्षात चिनी सैन्याचा कमांडिंग ऑफिसर ठार

“घटनास्थळावर स्ट्रेचरवरुन चिनी सैनिकांना नेण्यात येत होते तसेच रुग्णवाहिकेच्या फेऱ्या सुद्धा सुरु होत्या” असे सूत्रांनी सांगितले. “या संघर्षामध्ये सहभागी असलेल्या सैनिकांनी चीनच्या बाजूलाही नुकसान झाल्याचे सांगितले. त्यांचे नेमके किती नुकसान झाले ते लगेच स्पष्ट करता येणार नाही. पण ४० पेक्षा जास्त चिनी सैनिक मारेल गेले आहेत” अशी एएनआयच्या सूत्रांची माहिती आहे.