आयसीस या दहशतवादी संघटनेने अपहरण केलेल्या ३९ भारतीयांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. राज्यसभेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. चार वर्षांपुर्वी मोसुलमधून या भारतीयांचं अपहरण झालं होतं. या भारतीयांमध्ये मजुरांची संख्या जास्त होती. यामधील अनेकजण पंजाबमधील होते. आयसीसने २०१४ मध्ये मोसुलचा ताबा घेतल्यानंतर या सर्व भारतीयांचं अपहरण करुन ओलीस ठेवलं होतं. भारतीय मोसुलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच आयसीसने त्यांचं अपहरण केलं होतं.

2014 मध्ये इराकमधील मोसूल भागातून जून महिन्यात आयसिस या दहशतवादी संघटनेने 40 भारतीयांचं अपहरण केलं होतं. या 40 जणांपैकी एकटा हरजीत मसीहची सुखरुप सुटका झाली होती. मात्र या 39 भारतीयांबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नव्हती. त्यावेळी परराष्ट्रमंत्र्यांनी भारतीयांना इराकमधील कारागृहात बंद केलं असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमधील ३१ जण पंजाब, चौघे हिमाचल आणि बाकीचे बिहारमधील आहेत.

सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीप्रमाणे, ‘सोमवारी त्यांना ३८ भारतीयाचं डीएनए सॅम्पल जुळले असल्याची माहिती मिळाली, तसंच ३९ व्या भारतीयाचं डीएनए ७० टक्के जुळलं आहे’. यासोबत सर्व भारतीयांचे मृतदेह लवकरात लवकर भारतात आणले जातील असंही त्यांनी सांगितलं आहे. त्या बोलल्या की, ‘जनरल व्ही के सिंग इराकला जाणार आहेत आणि सर्व भारतीयांचे मृतदेह मायदेशी आणतील. इराकहून मृतदेह घेऊन उड्डाण करणारं विमान सर्वात आधी अमृतसरला, त्यानंतर पाटणा आणि नंतर कोलकाताला जाईल’.

सुरुवातीला इराकमधून अपहरण झालेले भारतीय जिवंत असल्याचा दावा सरकारने केला होता. सुषमा स्वराज यांनी अपहृत भारतीयांच्या नातेवाईकांची भेटही घेतली होती. शोध घेण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करु, असं आश्वासनही त्यांनी दिलं होतं. व्ही के सिंग यांना इराणी अधिका-यांनी भारतीयांना एका रुग्णालयाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलं होतं, नंतर त्यांना एका फार्ममध्ये काम करायला लावलं. यानंतर त्यांना कारागृहात बंद करण्यात आलं अशी माहिती सुषमा स्वराज यांनी दिली होती. दरम्यान काँग्रेसने केंद्र सरकारवर नागरिक कारागृहात आहेत सांगत कुटुंब आणि देशाची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे.