छत्तीसगडच्या सुकमा जिल्हय़ात सुरक्षा दलाने रविवारी पहाटे केलेल्या कारवाईत चार महिला नक्षलवादी ठार झाल्या. महिनाभरात नक्षलग्रस्त बस्तर भागातील कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या १४ झाली आहे.
विशेष कृतिदल, दंतेवाडा जिल्हय़ातील राखीव दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाने संयुक्तरीत्या ही कारवाई केली. सुकमा-दंतेवाडा सीमेवरील गदिरा भागात नक्षलवाद्यांचा विभागीय कमांडर आयतू याच्यासह नक्षलवाद्यांचा गट असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात दोन तास चकमक सुरू होती. आयतू याच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला. जखमी झालेल्या आयतू याला त्याच्या सहकाऱ्यांनी घटदाट जंगलात नेले. या कारवाईत नक्षलवाद्यांच्या वेशात असललेल्या चार महिला ठार झाल्या, असे बस्तरचे पोलीस महानिरीक्षक एस. आर. पी. कल्लुरी यांनी सांगितले.