राजस्थानमध्ये पाच वर्षांची एक लहान मुलगी आपल्या आजीसोबत नातेवाईकांच्या घरी चालत निघाली होती. मात्र, रणरणतं ऊन, कच्चा रस्ता आणि पाण्याचा एक थेंबही न मिळाल्यानं या चिमुकलीचा जीव गेला. तिच्या आजीलाही हे ऊन सहन झालं नाही त्यामुळे तिही बेशुद्ध पडली. तिला दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे.

राजस्थानमधल्या जालोर जिल्ह्यातल्या रानीवाडा भागातली ही घटना आहे. एक वृद्ध महिला आपल्या पाच वर्षांच्या नातीसोबत आपल्या नातेवाईकांकडे जायचं म्हणून पायी निघाली होती. जवळपास १२ किलोमीटरचा रस्ता होता. मात्र, टळटळीत दुपार, प्रखर ऊन आणि कच्च्या रस्त्यावर पाण्याचा एक थेंबही न मिळाल्याने या पाच वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या वयस्क महिलेलाही उन्हाचा त्रास झाल्याने तीही बेशुद्ध अवस्थेत आहे.


आणखी वाचा- कसला विकास? अभ्यासासाठी या पोरांना करावं लागतं ट्रेकिंग… पाहा Study From Hills चे फोटो

ह्या दोघींना असं तापलेल्या जमिनीवर पडलेलं पाहून शेजारुन जाणाऱ्या एका युवकाने गावच्या सरपंचांना फोन केला. सरपंच पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले आणि या वृद्धेला रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं. चौकशीत हे समोर आलं की सिरोहीमधल्या रायपूर गावातून ह्य़ा दोघी निघाल्या होत्या. त्या सलग नऊ तास चालत होत्या, त्यांनी सात किलोमीटरचं अंतर पार केलं होतं. मात्र उन्हाचा तडाखा या दोघींनाही सहन झाला नाही आणि त्या चिमुरडीने प्राण सोडले.

या महिलेला शुद्ध आल्यावर तिने सांगितलं की, तहानेमुळे दोघीही बेशुद्ध झालो होतो. पण काही वेळाने हलक्या पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे माझा जीव वाचला. लॉकडाउनमुळे सध्या येण्याजाण्याची कोणतीही सोय नसल्याने रायपूर ते डुंगरी हा २२ किलोमीटरचा प्रवास करण्याऐवजी या महिलेने १५ किलोमीटरचा शॉर्टकट निवडला होता. सकाळी ८ वाजता या दोघींनी चालायला सुरुवात केली. तेव्हा वातावरण थंड होतं, मात्र दुपारपर्यंत पारा ४५ अंशांवर पोहोचला होता.