पर्यटनाला उत्तेजन शक्य

अरुणाचल प्रदेशातील सुबानसिरी जिल्ह्य़ात पांगे खोऱ्याच्या प्रदेशात फुलपाखरांच्या ५० विविध प्रजाती दिसून आल्या आहेत. तीन दिवसांच्या झायरो फुलपाखरू परिषदेत ही माहिती देण्यात आली. भूतान ग्लोरी हे फुलपाखरू येथे दिसले असून सहभागी संशोधकांनी त्याची छायाचित्रे घेतली आहेत. ऑक्टोबर हा झायरो येथे फुलपाखरांच्या निरीक्षणाचा काळ असला, तरी आता बराच उशीर झाला आहे कारण हवामानात बदल झाला आहे. नुगनूझायरो येथे ही परिषद आयोजित केली होती, त्यात नागालँड, आसाम व सिक्कीमचे संशोधक त्यात सहभागी झाले होते. झायरो खोरे हे फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे.
कैसर-ए-हिंदच्या छायाचित्रणाने हे खोरे प्रथम प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर गेल्या वर्षीपासून तेथे झायरो फुलपाखरू परिषद सुरू झाली. परिषदेचे समन्वयक गोगोई यांनी सांगितले, की या भागात कैसर-ए-हिंद, भूतान ग्लोरी व ब्राऊन गोरगॉन ही तीन फुलपाखरे आढळतात. झायरो खोऱ्याला या तीन फुलपाखरांमुळे महत्त्व आले आहे. बटरफ्लाय अँड मोथस ऑफ सिक्कीम या संघटनेचे अध्यक्ष नवागला भुतिया यांनी सांगितले, की पूर्व हिमालयातील फुलपाखरांचा अधिवास जपण्यासाठी आपण मदत करू. सम्राट सेनगुप्ता यांनी फुलपाखरांच्या छायाचित्रणाबाबत काही युक्तया सांगितल्या. आसाममधील सेवन लुकचे संवर्धक पलाश गोस्वामी व बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे निगुलजोलाल खोंगसाय या वेळी उपस्थित होते. या भागातील जैवविविधता मोठी असून झायरो येथील नुगनूझायरो ही गैरसरकारी संस्था तेथे काम करीत आहे.
ईशान्येकडील फुलपाखरू परिषद बोरनाडी वन्यजीव अभयारण्यात आसाममध्ये होत आहे, तेथे नुगनूझायरोचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. झायरो येथे पुढील वर्षीही फुलपाखरू परिषद घेण्यात येणार आहे. या भागात पर्यटन सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.