गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील कोचिंग सेंटर मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. एकीकडे राज्यात करोनाचं संकट गहिरं होत असताना कोचिंग सेंटर मालकाकडून करोनाच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन केलं जात होतं. पोलिसांनी कोचिंग सेंटरवर धाड टाकली असताना तब्बल ५५० हून अधिक विद्यार्थी तिथे असल्याचं समोर आलं. हा प्रकार पाहून पोलीसही संतापले.

रविवारी पोलिसांकडून ही धाड टाकण्यात आली. यावेळी पोलिसांनी कोचिंग सेंटरचे मालक ३९ वर्षीय जयसुख यांना अटक केली अशी माहिती राजकोटचे पोलीस अधीक्षक बलराम मीना यांनी दिली आहे. पोलिसांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याने अटक करण्यात आली असून विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात आलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

आणखी वाचा- “मोदींचा हिंदुत्ववाद, विज्ञानासंदर्भातील अनास्थेमुळे करोनाविरुद्धची देशाची लढाई आणखीन कठीण झाली”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जयसुख कोचिंग सेंटर आणि हॉस्टेल चालवत होता. जवाहर नवोदय विद्यालय आणि बालचंदी सैनिक स्कूलच्या प्रवेश परीक्षेसाठी तो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत होता.

“माहिती मिळाल्यानंतर आम्ही परिसरात छापा टाकला तेव्हा तिथे ९-१० वयोगटातील ५५५ विद्यार्थी क्लास घेत असल्याचं दिसलं. या मुलांनी मास्क घातलेला नव्हता ना सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात होतं. करोनामुळे राज्य सरकारने खासगी शिकवणीवर बंदी घातलेली असतानाही हे सेंटर सुरु होतं,” अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक जे एच सिसोदिया यांनी दिली आहे.

आणखी वाचा- “करोनाची दुसरी लाट चीनमुळे; मोदींनी आव्हान दिल्यामुळेच केला व्हायरल हल्ला”

अटक होण्याआधी जयसुख याने पत्रकारांशी बोलताना विद्यार्थी १५ मे च्या आधीपासूनच पालकांच्या संमतीन हॉस्टेलमध्ये राहत असल्याचा दावा केला.