जगात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे देशातही करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. शुक्रवारीही देशातील करोनाग्रस्तांच्या संख्येत एका दिवसातील सर्वात मोठी वाढ झाली. शुक्रवारी देशात ५७ हजार करोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली. दरम्यान, केवळ जुलै महिन्यात भारतात ११.१ लाख करोनाबाधित आढळले असून १९ हजार १२२ जणांना करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात करोनाबाधितांच्या संख्येत २.८ टक्क्यांनी वाढ झाली. जून महिन्याच्या अखेरिस देशात करोनाबाधितांची संख्या ४ लाखांच्या वर होती. तर दुसरीकडे जून महिन्याच्या तुलनेत मृतांची संख्यादेखील १.६ टक्क्यांनी वाढली आहे. जून महिन्याच्या अखेरिस करोनामुळे झालेल्या मृतांची संख्याही ११ हजार ९८८ इतकी होती. जुलै महिन्यात करोनानं इतका वेग पकडला की अखेरच्या १५ दिवसांमध्ये तब्बल ७.३ लाख रुग्णांची नोंद करण्यात आली. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत ही संख्या जवळपास दुप्पट आहे.

सलग चौथ्या दिवशी ५० हजार रुग्ण

शुक्रवारी भारतात ५७ हजार १५१ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. सलग चौथ्या दिवशी देशात करोनाबाधितांच्या संख्येनं ५० हजारांचा टप्पा ओलांडला. शुक्रवारी करोनामुळे तब्बल ७६६ जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे करोनामुळे सलग चौथ्या दिवशी ७५० पेक्षा अधिक रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. शुक्रवारी मिळालेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशात ३६ हजार ५५१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. तर शुक्रवारच्या आकडेवारीनुसार देशात १० लाख ९५ हजार ६४७ जणांनी करोनावर मात केली आणि सध्या देशात ५ लाख ६४ हजार ५८२ अॅक्टिव्ह केसेस आहेत.