ग्रेनफेल टॉवरच्या आगीत ६ जणांचा मृत्यू, ७४ जखमी

पश्चिम लंडनमध्ये ‘ग्रेनफेल टॉवर’ या २४ मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा मृत्यू झाला असून, ७४ जण जखमी झाले आहेत. गेल्या तीन दशकांतील ब्रिटनमधील आगीची ही सर्वाधिक भीषण दुर्घटना आहे.

लॅटीमेर रोडवरील लँकेस्टर वेस्ट इस्टेटमध्ये असलेल्या ग्रेनफेल टॉवरला बुधवारी पहाटे आग लागली. त्या वेळी इमारतीतील १२० सदनिकांमध्ये ६०० जण होते. काही क्षणांतच आगीचे लोळ उठले आणि एकच हाहाकार उडाला. रहिवाशांनी स्वत:च्या बचावासाठी धावाधाव केली. अग्निशमन दलाचे २०० जवान, ४० गाडय़ा आणि २० रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आगीत होरपळून सहा जणांचा मृत्यू झाला असून, ७४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यात २० जणांची प्रकृती गंभीर आहे. आगीची भीषणता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.

आगीत इमारतीचा बहुतांश भाग खाक झाला आहे. या अग्नितांडवामुळे अनेक जण इमारतीत अडकून पडले. इमारतीच्या नवव्या मजल्यावरून खाली सोडलेल्या बाळाला रहिवाशांनी झेलून वाचविल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. ‘‘ही अभूतपूर्व आणि सर्वात भीषण दुर्घटना आहे. माझ्या २९ वर्षांच्या सेवाकाळात या तीव्रतेची दुर्घटना मी पाहिली नाही,’’ असे लंडन अग्निशमन दलाचे प्रमुख डॅनी कॉटन यांनी सांगितले.

‘‘मी आगीतून सुदैवाने सुखरूप बाहेर पडलो. मी आगीत माझ्या सर्व वस्तू गमावल्या याचे दु:ख नाही. पण अनेक लोक भीषण आगीमुळे इमारतीतून बाहेरच पडू शकले नाहीत,’’ असे आगीतून वाचलेल्या एका रहिवाशाने सांगितले. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठय़ा साहसाने जास्तीतजास्त रहिवाशांना वाचविल्याचे नमूद करत पॉल माँकर या रहिवाशानेही भीषण आगी अंगाचा थरकाप उडविणारी होती, असे सांगितले.

आगीचे कारण गुलदस्त्यात

इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागून नंतर ती सर्वत्र पसरली, अशी आधी चर्चा होती. मात्र तिसऱ्या किंवा चौथ्या मजल्यावरील सदोष शीतकपाटाला आग लागून ती नंतर पसरली, अशीही चर्चा सुरू झाली. मात्र आगीचे निश्चित कारण समजण्यासाठी आणखी अवधी लागेल, असे पोलिसांनी सांगितले.

नवव्या मजल्यावरून खाली सोडलेले बाळ झेलले

लंडन : आगीत अडकलेल्या एका हतबल महिलेने बाळाला वाचविण्यासाठी त्याला नवव्या मजल्यावरून खाली सोडले. खाली असलेल्या एका व्यक्तीने प्रसंगावधानता दाखवत बाळ झेलल्याने ते बचावले. ” आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या इमारतीत इतर रहिवाशांमध्ये एक बाळही होते. बाळाला वाचविण्यासाठी एक महिला मदतीची याचना करत होती. महिलेने बाळाला वाचविण्यासाठी त्याला नवव्या किंवा दहाव्या मजल्यावरून खाली सोडले. खाली असलेल्या एका व्यक्तीने बाळाला झेलून त्याचे प्राण वाचविले”, असे समिरा लॅमराणी या प्रत्यक्षदर्शीने सांगितले. दुसऱ्या एका घटनेत एका महिलेने आपल्या पाच वर्षांच्या मुलाला पाचव्या किंवा सहाव्या मजल्यावरून खाली सोडल्याचे झारा या प्रत्यक्षदर्शीने सांगितले.