‘मुंबई-नाशिक-नागपूर’, ‘मुंबई-पुणे-हैदराबाद’चा समावेश

नवी दिल्ली : अति वेगवान (हायस्पीड) आणि सेमी-हायस्पीड कॉरिडॉरसाठी रेल्वेने देशातील ६ मार्ग निश्चित केले असून, त्यात महाराष्ट्रातून जाणाऱ्या दोन मार्गाचा समावेश आहे.

हे नवे ६ मार्ग निश्चित करण्यात आल्याची माहिती देतानाच, या मार्गाबाबतचा एक विस्तृत अहवाल एका वर्षांच्या आत तयार केला जाईल, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष वाय.के. यादव यांनी बुधवारी सांगितले. हे नवे मार्ग सध्या बांधकाम सुरू असलेल्या मुंबई- अहमदाबाद हायस्पीड मार्गाला जोडले जाणार आहेत.

हायस्पीड कॉरिडॉरवर गाडय़ा ताशी कमाल ३०० किलोमीटरहून अधिक वेगाने धावू शकतात; तर सेमी- हायस्पीड कॉरिडॉरवर त्यांचा कमाल वेग ताशी १६० किलोमीटरहून अधिक असू शकतो.

या ६ कॉरिडॉरमध्ये दिल्ली- नॉयडा- आग्रा- लखनऊ- वाराणसी (८६५ किमी) आणि दिल्ली- जयपूर- उदयपूर- अहमदाबाद (८८६ किमी) यांचा समावेश असल्याचे केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वीच्या पत्रकार परिषदेत यादव यांनी सांगितले.

याशिवाय, मुंबई- नाशिक- नागपूर (७५३ किमी), मुंबई- पुणे- हैदराबाद (७११ किमी), चेन्नई- बंगळूरु- मैसुरू (४३५ किमी) आणि दिल्ली- चंडीगड- लुधियाना- जालंधर- अमृतसर (४५९ किमी) हे इतर कॉरिडॉर आहेत.

‘आम्ही हे ६ कॉरिडॉर निश्चित केले असून, त्यांच्याबाबतचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) एका वर्षांत तयार केला जाईल. यात जमिनीची उपलब्धता, अलाइनमेंट आणि तेथील वाहतुकीची क्षमता यासह या मार्गाच्या सक्षमतेचा अभ्यास केला जाईल. या बाबींचा अभ्यास झाल्यानंतर, हे हायस्पीड कॉरिडॉर असतील की सेमी- हायस्पीड यांचा निर्णय आम्ही घेऊ,’ असे यादव म्हणाले. मुंबई- अहमदाबाद हा भारताचा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल, अशीही माहिती यादव यांनी दिली.