रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे या ना त्या कारणाने कायमच चर्चेत असतात. जागतिक राजकारणामधील सर्वात प्रभावशाली व्यक्तीमत्वांपैकी एक असणारे पुतिन हे त्यांच्या राजकराणाबरोबरच जीवनशैलीसाठीही ओळखले जातात. मागील वर्षीच अध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध जिंकणाऱ्या पुतिन यांचे जागतिक राजकारणातील वजन सतत वाढताना दिसत असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र ते अगदी तरुण आहेत. नुकताच याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला तो सोची येथील इंडोअर स्टेडियममध्ये.

सोची येथील इंडोअर स्टेडियममध्ये रशियाच्या राष्ट्रीय ज्युडो संघाबरोबर पुतिन यांनी सराव केला. ज्युडोमध्ये फिफ्थ डॅन ब्लॅकबेल्ट असणारे पुतिन या व्हिडीओमध्ये त्यांच्यापेक्षा वयाने तरुण असणाऱ्या खेळाडूंबरोबर सराव करताना दिसत आहेत. धावणे, कोलांट्या उड्या मारणे, ज्युडोचे डावपेच खेळतानाचा ६६ वर्षीय राष्ट्राध्यक्षांचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र या सरावादरम्यान पुतिन यांच्या बोटाला छोटी दुखापत झाली.

पुतिन हे राष्ट्रीय संघातील खेळाडूंबरोबर सराव करत असताना आधी त्यांनी नतालिया कुझ्युतिनाबरोबर सराव केला. रिओ डी जेनेरो येथे २०१८ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करणारी रशियन ज्युडो खेळाडू नतालियाहीने पुतिन यांना मॅटवर पाडल्यानंतर पुतिन यांनी तिला आपल्या डावपेचात अडकवत मॅडवर पाडल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या बेसलन मुद्रानोव याच्याबरोबर डावपेचाचा सराव करत असताना पुतिन यांच्या बोटाला दुखापत झाली. बेसलनने त्यांना मॅटवर पाडल्यानंतर ते आपल्या बोटाकडे पाहत प्रशिक्षकांकडे गेले आणि त्यांनी झालेल्या दुखापतीबद्दल त्यांचा सल्ला घेतल्याचे ‘टेलिग्राफ’च्या वार्ताहाराने सांगितले.

या सरावानंतर या दुखापतीबद्दल बोलताना पुतिन यांच्या प्रवक्त्यांनी ही दुखापत गंभीर नसून तो खेळाचा एक भाग असल्याचे सांगितले. याआधीही अनेकदा पुतिन यांनी राष्ट्रीय ज्युडो संघाबरोबर सराव केला आहे. विशेष म्हणजे बोटाला दुखापत झाल्यानंतरही त्याच दिवशी पुतिन आइस हॉकीचा सामनाही खेळले.

पुतिन हे नेहमीच वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून आपण तंदरुस्त असल्याचे दाखवत असतात. अगदी आइस हॉकिपासून ते कराटेपर्यंत अनेक खेळ खेळताना पुतिन यांचे व्हिडीओ युट्यूबवर उपलब्ध आहेत. अनेकदा पुतिन यांनी ज्युडो हा खेळ हे आपलं पहिलं प्रेम असल्याचं म्हटलं आहे. २००४ साली पुतिन यांनी ज्युडो खेळाबद्दल लिहिलेलं ‘ज्युडो: हिस्ट्री, थेअरी, प्रॅक्टीस’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.

ज्युडोबरोबर पुतिन यांनी कराटेमध्ये 8th डॅन ब्लॅक बेल्टपर्यंत प्रशिक्षण घेतले आहे. याबरोबरच ते तायक्वांदोमधील सर्वात वरची रँक म्हणजेच 9th डॅन ब्लॅक बेल्टची परिक्षाही उत्तीर्ण झाले आहेत.