करोना विषाणूच्या संक्रमणापासून इतरांना धोका निर्माण होऊ नये म्हणून स्वतःला क्वारंटाइन (अलगीकरण) करुन घेणं हे सर्वात प्रभावी उपाय आहे. मात्र, अशा प्रकारे क्वारंटाइन करताना ज्यांच्या घरात स्वतंत्र खोली नाही अशा गरीब जनतेसमोर नवी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे पश्चिम बंगालमधील ७ मजुरांना चक्क झाडावरच स्वतःच्या रहाण्याची सोय करणं भाग पडलं आहे.

पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातील रहिवासी असलेले ७ मजूर तामिळनाडूची राजधानी चेन्नईत रोजगारानिमित्त गेले होते. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूही रुग्ण सापडल्याने त्यांनी आपल्या मूळगावी जाण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी त्यांनी याबाबत डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करुन घेतली. डॉक्टरांनी त्यांना १४ दिवांसाठी होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला. मात्र, गावातल्या घरी स्वतंत्र खोलीची व्यवस्था नसल्याने या सर्वांना चक्क १४ दिवस गावाजवळील झाडांवर राहावं लागत आहे. झाडाच्या फांद्यांना कपडे बांधून या ग्रामस्थांनी झोपण्यासाठी किंवा बसण्यासाठी व्यवस्थित जागा निर्माण केली आहे.

यां मजूरांपैकी एक बिजॉयसिंह लाया म्हणाले, “आम्ही चेन्नईहून परतलो आहोत. बऱ्हाणपूर येथून एका वाहनातून आम्ही प्रवास करुन गावी आलो. इथं आम्ही व्यवस्थित आहोत. डॉक्टरांनी आम्हाला १४ दिवसांसाठी घरातच स्वतंत्र राहण्याचा सल्ला दिला. मात्र, आमच्या घरांमध्ये स्वतंत्र खोली नाही. त्यामुळे गावातील लोकांनी आम्हाला झाडावर रहण्यास सुचवलं.”

“त्यानुसार आम्ही झाडावर राहण्याचा निर्णय घेतला. सध्या आम्ही झाडावर आरामशीर राहत आहोत आणि सर्व प्रकारच्या नियमांचही पालन करीत आहोत. सकाळी आम्हाला इथंच नाष्ता बनवतो. त्यानंतर दुपारी आणि रात्री जेवणासाठी भात शिजवतो. पिण्यासाठी पाणी देखील येथे उपलब्ध आहे. झाडावरचं आमच्याकडं स्टोव्ह आणि पाणी देखील आहे. याच्या मदतीनं आम्ही जेवण बनवतो.